डॉ. विजय कदम
भारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने उफाळली आहे. तिची भीषणता रोजच वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही लाट उसळण्याचे सर्वात महत्वाचे कारण सरकार पातळीवरील अक्षम्य निष्काळजीपणा आहे. त्यामुळे लोकांच्या हलगर्जीपणाकडेही दुर्लक्ष केले गेले. पहिल्या लाटेला अनुभव नसतानाही कठोरपणे हाताळून यश मिळवले गेले. पण काहीसं यश मिळताच कोरोनावर मात केल्याचा गवगवा करण्याच्या नादात पुढील तयारीकडे दुर्लक्ष झाले.
कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर पसरलेलं आहे. कोरोनाला एक वर्ष झाला तरी, अद्याप हे संकट गेलेलं नाही. दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. जेव्हा कोरोनाची पहिली लाट देशात आली तेव्हा सर्वात कठोर लॉकडाऊन हे भारतात लावण्यात आले होते. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात विषाणू संसर्ग वाढणे खूप धोकादायक ठरेल या हेतूनेच कठोर पावलं उचलली गेली. त्या लॉकडाऊनमध्ये काही त्रुटी होत्याही, त्यामुळे नुकसानही झालं, पण त्यामुळेच कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसली. संसर्गाचा दर कमी होत होता. पण आपल्याच चुकांमुळे तो पुन्हा उफाळला
कोरोना पुन्हा का उफाळला?
- जसं जसं लॉकडाऊन शिथिल होत गेलं, सरकार आणि नागरिक आपल्या दैनंदिन कामात व्यग्र आणि बेफिकीर होऊ लागले.
- तज्ज्ञांनी इशाराही दिला होता की, संसर्गाची दुसरी लाट उसळल्यास सरकारच्या कार्यप्रणालीतील अनास्थेमुळे आणखी मोठे संकट उभे ठाकेल आणि तेच संकट समोर आलं आहे.
- मृत्यूचे प्रमाण अद्याप कमी असले तरी ते वाढत आहे. इतक्या मोठ्या देशात लसीकरण करने अवघड असले तरी हे काम हळू हळू होत आहे.
- रुग्णालयात बेड सुद्धा अपुरे पडत आहेत.
उत्सवीपणा आणि सत्तास्पर्धा भोवतेय…
- कोरोना संकट गेले नसतानाच भारतात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत.
- धार्मिक आयोजनांसाठी जमणारी गर्दी हे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यासाठी सुपिक परिस्थिती तयार करत आहेत.
- निवडणुकीच्या प्रचारासाठी बिना मास्क फिरणाऱ्या नेत्यांमुळे सामान्य जनतेत कोरोना सुरक्षेविषयी चुकीचे संदेश जात आहेत.
- प्रचारसभांमधील गर्दी कुंभमेळ्याच्या गर्दीसारखीच धोका वाढवणारी ठरत आहे.
- त्यात पुन्हा कोणत्याही उपाययोजनेकडे राजकारणविरहित दृष्टीने पाहिले जात नसल्याने त्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर मर्यादा येत आहेत.
भारतात कोरोनाची लाट भीषण का होत आहे?
- तज्ज्ञ विषाणूचा नवा स्ट्रेन समजण्याचा प्रयत्न करीत आहेत, तो ओळखता न आल्याने उपाययोजनेला मर्यादा आहेत.
- एक महिना महत्वाचा, तरच समजेल आपण कोणत्या प्रकाराशी लढत आहोत.
- लाटेच्या संसर्गाचे स्वरूप भिन्न भिन्न असू शकते, उपाययोजनाही तशीच भिन्न लागेल.
- पुढचा एक महिना महत्वाचा असेल, त्यात विषाणूच्या कोणत्या प्रकाराशी लढत आहोत ते लक्षात येईल.
- त्यातही पुन्हा थोडं नियंत्रण मिळाले, आपण ४ ते ६ आठवड्याच्या प्रयत्नांनंतर यश मिळवले, की परत निष्काळजीपणाने वागतो, त्यामुळे संकट अजून वाढते.
- लसीकरणाची गती वाढविली नाही तर लोकसंख्येच्या ७०% लोकांच्या लसीकरणास खूप वेळ लागेल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनच्या बाजूने नाहीत. तसेच ते टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीटने दुसरी लाट जिंकण्याचा सल्ला देत आहेत.
- त्याचबरोबर केंद्रातील अधिकारी, सत्ताधारी नेते राज्य सरकार आणि जनतेच्या वागणुकीला दोष देत आहेत.
- या विषाणूचा संसर्ग ३० ते ५० कोटींना लोकांना झाला असेल, परंतु याचा अर्थ असा की अद्याप ८० ते ९० कोटी लोकांना संसर्ग झालेला नाही. सर्वात मोठी चिंता करण्याचे कारण हे आहे.
भारताची परिस्थिती इटली, ब्राझिल, अमेरिकेपेक्षा वाईट
- भारतातात दोन तृतियांश लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.
- जर कोरोनामधील मृत्यूचे प्रमाण ४५ ते ७५ वर्षांच्या लोकसंख्येमध्ये मोजले गेले तर इटली, ब्राझील आणि अमेरिकेपेक्षा परिस्थिती अधिक वाईट दिसेल.
(डॉ. विजय कदम हे वैदयकीय क्षेत्राप्रमाणेच सामाजिक क्षेत्रातही सजगतेने कार्यरत आहेत.)