डॉ. संदीप आडके / व्हा अभिव्यक्त!
३० सप्टेंबर१९९३ ला भारतातील अतिशय मोठा ६.२ रिक्टर स्केलचा भूकंप महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावी सकाळी ३.५६ ला झाला. यामध्ये लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील ५२ गावे क्शतीग्रस्त झाली. जवळपास तीस हजार लोक जखमी झाले व अंदाजे नऊ हजार लोक दगावले. घटनास्थळी वैद्यकीय मदत करण्यासारखे काहीच विशेष नव्हते आणि पहाटे पाच वाजल्यापासूनच जवळच असलेल्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये या जखमींचे जथे मिळेल त्या वाहनाने येऊ लागले. त्यावेळेला अस्थीरोग विभागाच्या युनिट२मध्ये मी रजिस्ट्रार म्हणून कार्यरत होतो. सुरुवातीला आम्हाला काय झाले हे माहीतच नव्हते;पण काही वेळात भूकंप झाल्याचे कळल्यानंतर मी माझ्या युनिट इन्चार्ज डॉ. के पी डागा यांना त्वरित बोलवून घेतले. दुसरे युनिट इन्चार्ज डॉ. व्ही एम अय्यर व डॉ. वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेजचे डीन व इतर सर्व विभागातील लोकांनी एक त्वरित ॲक्शन प्लॅन तयार केला. यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही आपत्ती व्यवस्थापनाचा आमच्यापैकी कुणालाही अनुभव नव्हता तरीसुद्धा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मधील सर्वच विभागाच्या डॉक्टर्स व शिकावु डॉक्टर्स,नर्सिंग स्टाफ व इतर विभागातील सर्वांनी अत्यंत प्रामाणिकपणे व जीव ओतून पहिल्या दिवसापासून चोवीस तास काम केले आणि ते जवळपास पुढे सहा महिने केले.आम्ही फार्मा आणि वैद्यकीय इम्प्लांट देणाऱ्या कंपन्यांना मदत मागितली.सद्भावना सेवादलाच्या श्री दिव्यकांत गांधी यांनी रूग्णांसाठी रक्त ,खाण्यापिण्याची सोय ,झुणका भाकरीचे स्टॉल्स इतर काही एनजीओ बरोबर त्वरित सुरू केले.
पोलीस,दूरसंचार विभाग व प्रशासनाने एक माहिती केंद्र तात्काळ उघडले. संध्याकाळपर्यंत फक्त सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ४६० रुग्ण भरती झाले. आधीच्या इतर रुग्णांना घरी पाठवून यांची सोय करण्यात आली. सोलापुरातील नामांकित वाडिया,अश्विनी,रेल्वे,चिडगुपकर अशा हॉस्पिटल मध्ये सुद्धा काही रुग्ण दाखल झाले. सोलापुरात शिकून गेलेल्या बऱ्याचशा सांगली, सातारा, कोल्हापूर वगैरे जिल्ह्यातून डॉक्टर्स स्वतःहून आमच्या मदतीला धावले. पहिल्या दिवसापासून शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या व जवळपास ७५० फ्रॅक्चर्स व इतर शस्त्रक्रिया १० दिवसात दोन शिफ्टमध्ये काम करून ,अस्थिरोग विभागातील २० शिकाऊ डॉक्टर व ४ कन्सल्टंट मिळून केल्या. सांगलीचे अस्थिरोग तज्ञ डॉ. डी जे आरवाडे यांनी रात्रीतून २ अत्यंत अवघड मणक्याच्या शस्त्रक्रिया केल्या.पंधरा दिवसानंतर जर्मनी वरून डॉक्टरांची एक टीम आली पण तोपर्यंत आमच्या सर्व सर्जरी कुठल्याही कॉम्प्लिकेशन्सविना पूर्ण झाल्या होत्या.त्यांनी आमचे कार्य बघून खूप कौतुक केले. त्याकाळी दररोजच आम्हाला रुग्णांना ठेवण्यासाठी पुरेशे बेड नसल्यामुळे जमिनीवर झोपवावे लागायचे ,बाकी अत्याधुनिक सोयीसुविधा तर सोडाच.आम्ही रात्री भूकंपग्रस्तांसाठी लावलेल्या झुणका-भाकर स्टॉलवर जाऊन जेवायचो. सर्व रुग्णांना हॉस्पिटल चे मानसोपचार तज्ञ समुपदेशन करायचे बंगलोरच्या प्रसिद्ध ‘निमहानस’ मधून आलेल्या काही मानसोपचार तज्ञ डॉक्टर्सना चहा ,नाष्टासाठी सुद्धा आमच्या खिशात पुरेसे पैसे नव्हते. त्यावरूनच प्रशासनाने आमची किती मदत केली हे कळून येईल. तरीसुद्धा सर्वांनी अत्यंत माणुसकी आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने हे युद्ध आम्ही जिंकून दाखवलं व त्याचा नाव लौकीक संपूर्ण जगभर झाला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये कोणतीही सरकारी मदत वेळेत पोहोचलीच नाही. विशेष म्हणजे त्यावेळेस ‘महाराष्ट्र सरकारच’ सोलापुरातून चालत होतं,आमच्या सिव्हिल हॉस्पिटल पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर! कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातील अशी पहिलीच घटना असावी. परंतु एकही प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय व्यक्ती आमची केव्हा या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी कधी आला नाही. त्याचा एखादा फोटो सुद्धा तुम्हाला कुठे दिसणार नाही.परंतु सर्व परिस्थिती आटोक्यात आल्यावर व मीडियामध्ये आमच्या कामाचे कौतुक होवु लागल्यामुळे ,बरेचसे नेतेमंडळी व सिनेकलावंत फोटोसेशन साठी येऊ लागली.त्यावेळच्या आमच्या कामाची एकही तक्रार कोठे ऐकण्यास मिळाली नाही. पण आमच्या कामाची दखल प्रशासनाने कधीच घेतली नाही. साधे एक सर्टिफिकेट सुद्धा प्रशासनाला द्यावे वाटले नाही. या भूकंपात मदतीसाठी आलेल्या ट्रक च्या ट्रक सामान लंपास करून काही लोकांनी आपली घरे भरली. तीन वर्षांपूर्वी या भूकंपास पंचवीस वर्षे पूर्ण झाले म्हणून किल्लारी येथे शासनाने मोठा कार्यक्रम घेतला पण त्यात सर्व पक्षाचे लोक आपापसात श्रेय वाटून घेण्यात मशगुल दिसले आणि ज्या सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राने एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरीव काम केले त्यांना सोयिस्कररित्या विसरून गेले.
या किल्लारी भूकंपामुळे केंद्र शासनाने ‘आपत्ती व्यवस्थापन कमिटी’ गठन करून काही प्रोटोकॉल्स तयार केले पण ते आज सुद्धा कागदावरच आहेत त्याची प्रचिती या आठवड्यात झालेल्या गुलाब चक्रीवादळातील अतोनात नुकसानामुळे तसेच नुकत्याच झालेल्या चिपळूण येथील पुरामुळे आलेली आहे. आज सुद्धा शासनाला आपत्ती व्यवस्थापन कशाशी खातात हेच माहित नाही पण आपत्ती व्यवस्थापनामध्ये कसे खाता येते हे मात्र व्यवस्थितरीत्या हि लोक शिकलेली आहेत! याचा दाखला द्यायचा झाला तर कालच महाराष्ट्रातील एका खाजगी संस्थेने कोविड काळात रुग्णांचे सरासरी १ लाख ५५ हजार बिल जास्त करण्यात आल्याचा अहवाल वृत्तपत्रातून छापून आला आहे. याला संबंधित डॉक्टर्स, रुग्णालये जितकी जबाबदार तितकेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे. जेथे कुंपणच शेत खाते तिथे न्याय कुठे मिळणार. आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणजे हम करे सो कायदा व लुटण्यासाठी दिलेले कुरण असेच म्हणावे लागेल.ज्या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलचे २८ वर्षापूर्वीचे मी कौतुक सांगत आहे त्याच सिव्हिल हॉस्पिटलची करोना काळात संबंधितांनी भ्रष्टाचार केल्याची चौकशी लागलेली आहे यापेक्षा लाजिरवाणी कोणती गोष्ट आहे?मला माझ्या लहानपणीचा एक अनुभव प्रकर्षाने आठवतो १९८१ आली रशियन सरकारचा अत्यंत मानाचा ,’सोवियत लँड नेहरू पुरस्कार’ चित्रकलेसाठी मिळवून एक महिन्यासाठी मी रशियात गेलो ,वय होते फक्त ११ वर्ष.पण तो काळ शीतयुद्धाचा होता त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसे वागावे याचे संपूर्ण प्रशिक्षण मला तिथे देण्यात आले होते. आज आपल्याकडे नेहमीच पूर ,अतिवृष्टी दुष्काळ , अपघात , बॉम्ब स्पोट, आग,चेंगराचेंगरी अशा अनेक आपत्ती भारताच्या छोट्या गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत उद्भवत असतात .
२६/११ चे उदाहरण घ्या, तिकडे मुंबई जळत होती आणि इकडे दिल्लीत काही अत्यंत जबाबदार लोक कपडे बदलण्यात व्यस्त होते तेसुद्धा लातूरचेच! तर काहींना यात आपले पद गमवावे लागले. त्यावरूनच ज्या लोकांकडे आपण आपत्ती काळात मदत करतील म्हणून बघतो तीच लोक अशी वागतात. कुठल्याही आपत्तीनंतर आपत्ती पर्यटनाचे दौरे ,पोकळ आश्वासने, मदतीचे फोटोसेशन, खोटे अहवाल आणि प्रचंड भ्रष्टाचार हेच नेहमी आपल्याला दिसून येते. आज सुद्धा कुठल्याही जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेकडे आपत्ती व्यवस्थापनाचा कोणताही ठोस प्लॅन नाही. आमच्यासारख्या आपत्कालीन व्यवस्थापनाचा हा प्रचंड अनुभव असलेल्या डॉक्टरांची त्या प्रशासनाला साधी माहिती सुद्धा नाही हे अत्यंत खेदाने मला सांगायला लागतंय.२८ वर्षांपूर्वी सोलापुरातील होटगी रोड येथील विमानतळावर मोठी विमाने उतरू शकली नसल्यामुळे जगभरातून आलेली मदत आमच्यापर्यंत पोहचू शकली नाही पण त्याचा फायदा काही लुटारूंनी घेऊन आपल्या पुढच्या सात पिढ्यांची कमाई करून ठेवली. आज सुद्धा करोनाच्या काळामध्ये सोलापूरला ऑक्सिजन,औषधे व मेडिकल साधन सामग्री वेळेत मिळू शकली नाही त्यामुळे भारतात करोना मुळे होणाऱ्या मृत्यू व रुग्ण संख्येत सोलापूर तिसऱ्या स्थानावर होते त्याचे कारण म्हणजे सोलापूरचे हे विमानतळ आज सुद्धा मोठ्या विमानांसाठी अत्यंत सुसज्ज असून सुद्धा रनवे समोरील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा चिमणी मुळे बंद आहे. आम्ही प्रशासनाला वर्षभर सांगून सुद्धा प्रशासन राजकारण्यांच्या सांगण्यावरून झोपेचं सोंग घेऊन गप्प आहे. जर २८ वर्षापूर्वी विमानसेवा नसल्यामुळे काय हाल झाले यातून प्रशासनाला काहीही शिकता आले नाही तर यापेक्षा मोठे दुर्भाग्य ते काय ? मग कोणी आपण या भूकंपामध्ये किती चांगल्या पद्धतीने काम केले त्याची कितीही खोटी प्रसिद्धी केली तरी काय उपयोग? प्रत्येक नागरिकाने आपल्या प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाबद्दल त्यांची काय तयारी आहे याचा जाब विचारला तरच यातील भ्रष्टाचार व कागदावरचा पोकळ दिखावा दुर होऊन प्रशासन जागे होईल व इथून पुढे तरी अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना वेळीच मदत मिळेल!