मुक्तपीठ टीम
रास्त दरात आरोग्य सेवेची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारे वन रुपी क्लिनिक या उपक्रमाचे डॉ. राहुल घुले यांच्या जीवाला धोका आहे. राज्यातील काही राजकीय दलालांपासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार डॉ. राहुल घुले यांनी स्वत: ट्वीटद्वारे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलला मेन्शन करुन आज केली. सायंकाळी ते ट्वीट दिसेनासे झाल्याने या प्रकरणाविषयी अधिकच गूढ निर्माण झाले आहे.
रास्त दरात आरोग्य सेवेची वन रुपी क्लिनिक संकल्पना
डॉ. राहुल घुले हे मूळचे मराठवाड्यातील आहेत. मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एका वेगळ्या उपक्रमावर काम सुरु केले. सामान्य जनतेला रास्त दरात वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या उद्देशाने वन रुपी क्लिनिक या कंपनीची स्थापना केली. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर त्यांनी एक रुपयात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या क्लिनिकची साखळी सुरु केली. त्यावेळीही त्यांना काही राजकीय मंडळींकडून श्रेयवादाच्या हव्यासातून त्रास झाला होता.
कोरोना संकटात चांगलं कार्य
कोरोना संकटास सुरुवात झाल्यापासून डॉ. राहुल घुले यांनी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरळीत आपल्या टीमसह काम सुरु केले. त्याचबरोबर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा भाईंदर या तीन मनपांसह इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कोरोना सेंटरचे काम सुरु केले.या संकट काळात वैद्यकीय कौशल्य असलेले मनुष्यबळ मिळत नसल्याने अडचणीत आलेल्या मनपांना डॉ. घुलेंमुळे मोठाच आधार मिळाला आहे.
मोठ्या राजकीय नेत्यांकडून कौतुक
खासगी रुग्णालयांसारख्या त्यांच्या दर्जेदार आरोग्य सेवेचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जाहीर कौतुक केले आहे. असे असतानाही डॉ. घुले यांना वाईट उद्देशाने काही राजकीय दलाल बराच काळ त्रास देत असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या वर्तुळात होती. त्याबद्दल ते काहींशी त्यांना त्रास देणाऱ्या दलालांबद्दल बोललेही होते. मात्र, आपण झुकणार नाही. चांगली माणसं सोबत असल्याने मी चांगले काम करतच राहणार. अशांच्या दबावाला बळी पडणार नाही, असा निर्धारही ते व्यक्त करत असत. त्यामुळे आजचे त्यांचे ट्वीट खळबळ माजवणारे ठरले.
डॉ. राहुल घुले यांच्या ट्वीटमध्ये काय होतं?
राज्यातील काही राजकीय दलालांमुळे माझ्या जीवाला धोका आहे. पंतप्रधान कार्यालय, मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी लवकरच नावे उघड करेन.
रविवारी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी डॉ. राहुल घुले यांनी केलेल्या ट्विटनंतर खळबळ माजली. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या. मात्र, अचानक संध्याकाळनंतर हे ट्विट दिसेनासे झाले. त्यानंतर त्यांनी ट्विटर अकाऊंट डिलीट करणार असल्याचे जाहीर करणारे ट्वीट करत त्यांना त्यांची पत्नी प्रचंड भीतीच्या दडपणाखाली असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे डॉ. राहुल घुले यांच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल गूढ निर्माण झाले आहे.