मुक्तपीठ टीम
पनवेलस्थित कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या उघडकीस आलेल्या घोटाळ्यानंतर ग्राहक, ठेवीदारांचे हित जोपासण्यासाठी गेल्या बैठकीत संबंधितांना निर्देश दिले होते. त्याची उत्तम प्रकारे अंमलबजावणी होताना दिसत आहे. राज्य सरकारही याबाबत सकारात्मक आहे. तसेच येत्या १५ दिवसात तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी दिली.
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणाचा मुद्दा लावून धरत सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ संपादक कांतीलाल कडू यांनी पुन्हा एकदा बैठक घेण्याची विनंती डॉ. गोऱ्हे यांना केली होती त्यानुसार आज वेबिनार आयोजित केले होते. त्यामध्ये सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार तज्ज्ञ विद्याधर अनारस्कर, राज्यातील सहकार खात्याचे उपजिल्हा निबंधक आनंद कटके, डॉ. गोऱ्हे यांचे विशेष कार्य अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि कांतीलाल कडू सहभागी झाले होते.
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी ग्राहक, ठेवीदारांचे प्रतिनिधी म्हणून कांतीलाल कडू पुढे आले आहेत. उपसभापती या नात्याने ठेवीदारांच्या हितासाठी आपण संबंधितांशी चर्चा करून निर्देश देत आहोत. येत्या अधिवेशनात कर्नाळा बँकेचा मुद्दा चर्चिला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याकडे आधिच संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याने अधिवेशनात निश्चित त्याचा लाभ होईल. याशिवाय माझ्या माहितीतील दहा ते बारा आमदार हा प्रश्न उपस्थित करतील असे त्या आमदारांनी सांगितले असल्याची माहितीसुद्धा डॉ. गोऱ्हे यांनी सहभागी झालेल्या मान्यवरांना दिली.
सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी सांगितले की, तूर्तास बँक आवसानायात काढणे हा एकमेव पर्याय आहे. संचालकांच्या मालमत्ता विकणे हा द्वितीय भाग आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवीपोटी दिल्या जाणाऱ्या विम्याच्या रकमेनंतर संचालकांच्या ठेवी विकून आलेली रक्कम विमा कंपनीकडे जमा केली जाऊ शकते. मात्र आपण रिझर्व्ह बँकेसोबत बसून दीपक पायघुडे बँक प्रकरणी लावलेल्या निकषांप्रमाणे फिफ्टी-फिफ्टीचा फार्म्युला करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला प्रवृत्त करू शकतो असा त्यांनी दावा केला.
याशिवाय विम्याची रक्कम भरली गेली नाही तर तात्काळच बँकेचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यामुळे ठेवीदारांवर त्याचा फारसा विपरित परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कांतीलाल कडू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, टास्क फोर्सची बैठक लवकरच लागेल त्यामधे कर्नाळा बँकेच्या आवसानायात काढण्याचा मुद्दा मार्गी लावू असे त्यांनी स्पष्ट करून ठेवीदारांना दिलासा दिला.
सविस्तर उहापोह करताना चर्चेत अनिल कवडे, आनंद कटके, कांतीलाल कडू आणि रवींद्र खेबुडकर आदींनी सहभाग नोंदविला.
लेखी शिफारशीनुसार निर्देश देणार
सहकार तज्ज्ञ विद्याधर अनारस्कर हे उद्याच लेखी शिफारस करतील, काही महत्वाचे सल्ले देतील. त्यानुसार राज्य सरकारच्या सहकार खात्याला आपण निर्देश देवून कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळण्यासह, आरोप निश्चितीनुसार दोषींवर कारवाई करण्याचेही आदेश देवू असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
ताईंमुळे सहकार खात्यात नवा अध्याय लिहिला जाईल: कांतीलाल कडू
सहकारातील स्वाहाकारामुळे राज्यात झालेली सहकार खात्याची बदनामी पाहता आणि बँक बुडित निघण्याचे प्रमाण पुरोगामी महाराष्ट्राला कलंक ठरत असताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांसाठी धावून आल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नांनेच ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्याने ताईंमुळे राज्याच्या सहकार खात्यात नवा अध्याय लिहिला जाणार आहे, असा दावा कांतीलाल कडू यांनी बैठकीत करून अनेक प्रश्न उपस्थित केले.
१५ दिवसात दोषारोप पत्र दाखल
महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० अनुसार ८८ प्रमाणे दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे वाटचाल करित असून येत्या १५ दिवसात दोषींवर आरोप निश्चित करून दोषारोप पत्र ठेवले जाईल, अशी माहिती आनंद कटके यांनी दिली.