डॉ. जितेंद्र आव्हाड / व्हा अभिव्यक्त!
इतके सगळे शोध लागून प्रगती होऊन प्रचंड विकास होऊन देखील शेवटी सगळे विद्वान तुमच्या जुनाट विचाराजवळ येऊन का थांबतात?
जगाला तुमचाच विचार वाचवेल असं सतत जगाला का वाटतं ?
तुमच्याशी वैचारिक मतभेद असणारी विचारधारा तुमच्या पुढे नतमस्तक का होते ?
डावे म्हणतात की, तुम्हाला काही कळत नाही तुम्ही गोंधळलेले होतात ?
उजवे म्हणतात की, तुम्हाला इतर धर्माविषयी प्रेम होतं?
यातलं खर काय ?
तुम्ही नेहमी सत्य बोलायचे अस म्हणतात ते खर आहे का हो ? कारण दिवसभरात आम्ही इतके असत्य बोलतो की, कुणी खरं बोलतं हेच खोट वाटत.
मला खरंच कळत नाही गांधी मी कोणावर विश्वास ठेऊ … या सोशल मेडियाच्या जगात तर तुम्ही इतके बदनाम आहात … कितीतरी माणसं तुमच्यावर इतकी तुटून पडतात की वर्षानुवर्ष तुम्ही त्यांच्या वर केलेल्या अन्याया विरुद्ध त्यानी रणशिंग फुंकलं आहे अस वाटतं… सोशल मीडिया म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का गांधी ?
मी खूप सामान्य आहे निती नैतिकता या मार्गावरुन मला चालता येत नाही. भ्रष्टमार्ग स्विकारल्याशिवाय मला उदरनिर्वाह करता येत नाही . पण, मग तरी मी तुम्हाला जाब विचारतो आहे. बोला उत्तर दया बोला गांधी. अस प्रेमाने आणि करुणेने नका बघू माझ्याकड़े मला नाही सहन होत ते… इतके क्षमाशील असणं बरं नाही गांधी…
द्विराष्ट्र वादाचा सिद्धांत मांडणाऱ्यांची आज पूजा केली जातेय आणि तुम्हांला फाळणीचा गुन्हेगार ठरवला जातंय गांधी… न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा हा देश तुम्हाला देताना तुम्हाला यातना नाही का होत मिस्टर गांधी? इतकं सगळ सहन करून तुम्ही सतत इतके हसतमुख हे सगळं बघून तुम्हाला यातना नाही का होत? की कालच्या ओघात तुम्ही सुद्धा बदललात ?
कसे असता हो तुम्ही….
तुमची हत्या करणाऱ्या नथूरामाला आदर्श मानणारे आज सकाळीच स्वत:ला साबरमतीचे संत म्हणत तुमच्या पुतळ्याला हार घालून आले. हे तुम्ही पाहील असेलचं.
मिस्टर गांधी तुम्ही कसे काय इतके सहनशील आहात हो. नथुरामाने तीन वेळा तुमच्यावर हल्ला केला. पण, तीनही वेळेला मोठ्या मनाने तुम्ही त्याला माफ केलंत. त्याच नथूरामाने अखेरीस तुमचा जीव घेतला. तुम्ही अजून इतके सहनशील, सोशीक, क्षमाशील आहात का? कारण, आता तर केवळ गोमांस घरी ठेवलं या संशयावरून ज्या घरातील एक मुलगा सैन्य दलात देशाची सेवा करतोय त्याच्या बापालाच ठेचून ठार मारलं जातंय. तुम्हांला वाटत नाही का? तुमची सोशीकता हा देश विसरला आहे. मिस्टर गांधी मला उत्तर द्या.
७४ वर्षात इथल्या मुर्दडांच्या प्रमाणे तुमच्या ही संवेदना बोथट झाल्यात.. बोल मिस्टर गांधी.. आज हे प्रश्न तुम्हाला माझ्यासारखे विचारणार आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, की तुम्हाला ठाऊक आहे करुणा आणि अंहिसा हेच शाश्वत सत्य आहे… बोला गांधी
मिस्टर गांधी उत्तर दया…
तुम्हाला गोळ्या मारणाऱ्या नथूरामाला तुम्ही खरच माफ केलत का ओ! भेटला का कधी तुम्हाला तो. तुम्हाला अहो जा हो करावसं वाटतं पण, त्याचे नावही तोंडात घ्यावसे वाटत नाही. कायद्याने ज्याला खुनाच्या आरोपाखाली फाशी दिली, त्या खुनाचे उदात्तीकरण करणारे नाटक आता महाराष्ट्रात सुरु आहेत. हे नाटक बघायला समोर बसलेल्या प्रेक्षकवर्गावर अशी काही मोहिनी घातली जाते की, नाटकामध्ये एक क्षण असा येतो की, नथुराम जेव्हा तुमच्यावर गोळ्या झाडतो तेव्हा संपूर्ण प्रेक्षकवर्ग हा उठून टाळ्या वाजवायला लागतो. होय मिस्टर गांधी हे तुमच्याच देशात घडतंय…
तुम्हांला मारलेल्या बंदुकीतल्या गोळ्या अजूनही संपलेल्या नाहीत. विरोधी विचार ऐकूनच घ्यायचे नाही हे सूत्र आजही भारतात चालू आहे. काल-परवापर्यंत तर या नामर्दांनी ज्यांच्या हातात पुस्तके आहेत अशांनाच गोळ्या मारल्या. आता इथे वृत्तपत्रामध्ये टिका केली कि त्या पत्रकारालाही जेलमध्ये घालण्याची व्यवस्था झालेली आहे. अर्बन नक्षलच्या नावाखाली इथल्या बुद्धीवादी लोकांना ८-८ वर्षे जेलमध्ये ठेवले जात आहे. त्यांना साधी बेल देखील मिळत नाही. तुमच्या काळात इंग्रज तरी बेल द्यायचे. पण, भारतीय संविधान अस्तित्वात असून देखील बेलची व्यवस्था नाही. मिस्टर गांधी तुम्हाला गोळ्या घालताना जसे त्यांचे हात कापले नाहीत…. तसे आज काहीही पाप करताना त्यांचे हात कापत नाहीत. किंबहुना हे पापच पुण्य आहे असे ते समजायला लागलेत. कारण, यांचे मेंदू थिजलेले आहेत. बंदुकीही त्याच आहेत आणि भेजाही तोच आहे.
एका संत संमेलनामध्ये स्वत:ला बाबा म्हणणारा कालीचरण तुम्हाला हरामी म्हणाला हे कळलं का ओ तुम्हाला. आणि नथुरामाने जे केलं ते ह्या देशाच्या भल्यासाठीच केलं अस बोलून मोकळा झाला. हे सगळं हा देश उघड्या डोळ्याने बघतोय. बहुसंख्यांकांना हे पटत नाहीये. पण, दुर्देवाने हे बोलण्याची कोणी हिम्मतच दाखवत नाही. जस तुम्ही एकटे आणि काही जणांना घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरला आहात ब्रिटीशांना न घाबरता. तसे आता इथे लोक बोलायलाही घाबरत आहेत. तर विरोधात उतरायची बात लांबच राहिली.
भेजाही तोच आहे. पण, तरिही एक गोष्ट जी अविवादीत सत्य आहे. ती म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि भारत हे नाव उगारल कि समोरुन… हा तो गांधींचा देश. तुम्हांला अनेकवेळा मारुन सुद्धा ते तुम्हांला कधीच मारु शकणार नाहीत.
टिप : एक गोष्ट तितकीच सत्य आहे. हे कोणाला पटो अगर न-पटो मिस्टर गांधी… तुमच्या मारेकऱ्यांवरती मनापासून प्रेम करणाऱ्यांना हे कळून चुकले आहे. कि हा देश नथुरामाचा नाही… तर गांधींच्याच नावाने ओळखला जातो. त्यामुळे जगभरात फिरताना त्यांना फक्त एकच माल विकायला मिळतो. त्या मालाच नाव आजही मोहनदास करमचंद गांधी आहे.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. )