डॉ. गिरीश जाखोटिया
” ओ सत्यशोधक महात्मा ! ”
ओ महात्मा,
तुमचं सत्यशोधनाचं काम
आम्ही नक्कीच तडीस नेऊ.
पितळाला सोनं संबोधण्याची लबाडी
आम्ही आता हुशारीने संपवू.
शंभर नंबरी सोनं बहुजनांचं,
दिसायला हवं या अहंमन्य जगाला !
झाडांचं सत्व शोषणाऱ्या बांडगुळांना
आम्ही शिताफीने वेचून दूर करु.
तुम्ही चालू केलेलं ‘सत्यशोधन’
आम्ही पुर्णत्वास नेऊ.
ओ महात्मा, ‘सत्यान्वेशी’ प्रयत्नांनी
झाडांना त्यांचे न्याय्य हक्क
आम्ही मिळवून देऊ.
सभ्यता, संस्कृती आणि समृद्धी,
भरतखंडाचा बहुजनी वारसा –
अश्लाघ्य, अतर्क्य नि अन्यायी
पापुद्र्यांखाली दबलेला होता,
आता आदराने तो ‘दृष्य’ व्हायला हवा.
ओ महात्मा,
बाजारातील खोटी नाणी
आम्ही काढून टाकू.
खऱ्या नाण्यांची महत्ता
आता स्थापित व्हायलाच हवी !
निरागस बहुजनांना
आपल्या खऱ्या मुळांची ओळख
आता होऊ लागली आहे.
त्यांच्या पराक्रमाचं नि विद्वत्तेचं श्रेय
त्यांना मिळायलाच हवं.
या मातीतली मूळ सांस्कृतिक मुल्ये
ही बहुजनांनीच साकारली होती.
तुमच्या ‘सत्यशोधना’चं कार्य
आजही पुढे नेटाने चालू आहे.
हां, भाषणातून नि लेखनातून
तुमचं स्मरण करणारे काही महाभाग मात्र
आज ‘असत्या’च्या वळचणीला
जाऊन बसलेत.
ओ महात्मा,
निरागसांची ‘गुलामगिरी’
समूळ घालविण्यासाठी नि
त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी
‘शेतकऱ्याचा आसूड’ हा
भ्रष्ट, मदमस्त व्यवस्थेवर
पुन्हा त्वेषाने उगारावा लागेल !
(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात.)
ई-मेल – girishjakhotiya@gmail.com
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld per IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.