Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

#व्हाअभिव्यक्त “राजा की लोकप्रतिनिधी?”

उद्योग सल्लागार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीश जाखोटिया यांचे रविवारीय चिंतन

February 21, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
King or leader?

डॉ. गिरीश जाखोटिया

 

आमच्याकडे तर गल्लोगल्ली अशी ‘खानदानी शिल्लक, रॉयल ब्लड’ वगैरे वगैरे आहे. आम्ही राजेशाही, हुकुमशाही नि सरंजामशाहीचा पुरेपूर अनुभव घेत आज लोकशाही पर्यंत पोहोचलो आहोत. अर्थात ‘लोकशाही’ शब्दात ‘शाही’ आहेच ! एखादा ‘देश’ हा ‘राष्ट्र’ बनतो जेव्हा लोकांच्या राज्यात निवडून आलेले नायक – नायिका हे फक्त आणि फक्त “लोकप्रतिनिधी” असतात. अशा राष्ट्रात राजवाडे, खानदानी परिवार, दासदासी, राजकुमार इत्यादी भानगडी नसतात. इथे “राजा आणि प्रजा” अशी व्यवस्था नसते. इथे “प्रजा आणि प्रतिनिधी” अशी प्रगल्भता असते. प्रजा सार्वभौम असते. म्हणूनच प्रजेचा अधिकारनामा आणि कर्तव्ये सांगणारी लिखित “घटना” असते.

 

नमस्कार मित्रांनो !
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. दक्षिण भारतातील एका शहरातल्या कापड दुकानात खरेदीसाठी बसलो होतो. अचानक दुकानाचा मालक आणि त्याचे सहकारी उठून उभे राहिले. त्यांनी मला आणि माझ्या बायकोलाही चेहरा कसनुसा करीत उभं रहायला सांगितलं. अर्थात आम्ही उठलो नाही. काही सेकंदानंतर मंडळी पुन्हा स्थानापन्न झाली. दुकानदार म्हणाला, “आमच्या महाराणी साहेब कारमधून गेल्या. आदरापोटी उभं रहावं लागतं. या शहराचा तो नियमच आहे. इथंच रहायचंय ना आम्हाला. तुम्ही बाहेरचे.” त्याने सांगितलेली वस्तुस्थिती आजही बऱ्याच संस्थानी गावांना लागू होते. हा आदर अनेकदा सक्तीपोटी असतो.

 

आजच्या लोकशाहीतही “तथाकथित राजांना, त्यांच्या व्यत्ययकारी चमच्यांना” भीतीपोटी ‘सलाम’ करावा लागतो. काही मतदारसंघात तर ऐतिहासिक राजांच्या वारसांची इतकी दहशत असते की सलाम करण्यासोबत ह्यांची तसवीर प्रत्येक ठिकाणी लावायची, प्रत्येक मोठा निर्णय यांना सांगून घ्यायचा, नव्या उद्योगात यांना आणेवारी द्यायची नि प्रत्येक घरगुती कार्यक्रमाचं आमंत्रण यांच्या ‘महाली’ सर्वप्रथम पोचवायचं. आबाबाबा, केवढा हा जुलमाचा रामराम ! मला बऱ्याचदा बरं वाटत आलंय की मी मुंबईत रहातो. हे शहर असे ‘फालतू सलाम’ करायला लावत नाही.

 

ऐतिहासिक काळात शंभर पैकी फारतर दहा राजे ‘प्रजाहितदक्ष’ होऊन गेले. त्यांच्याबद्दल आदर आहेच. परंतु लोकशाहीत आज त्यांच्या वारसदारांचा उल्लेख ‘राजे’ इत्यादी करण्याची गरज काय ? इतिहासातील एखाद्या अत्यंत आदर्श राजाच्या अतूट प्रेमापोटी आमच्या येथील निरागस प्रजा आजच्या पाळण्यातील वारसदारालाही ‘बाळराजे’ म्हणत विनाकारण आदर देते तेव्हा जाणवतं की ‘व्यक्तीपूजा’ ही आमच्या जनुकांमध्ये शिगोशिग भरलेली आहे. काही महान वाटणाऱ्या राजांनी तर काही अक्षम्य गुन्हे केले होते जे त्या काळातील व्यवस्थेकडे बोट दाखवून आम्ही हेतुपुरस्सरपणे दुर्लक्षण्याचा लबाड प्रयत्न करीत असतो. आमच्या पारंपारिक व्यवस्थेतच सांगितलं गेलंय की राजात देवाचा अंश असतो. आता देवांश, रॉयल फॅमिली, खानदान, स्वर्ग, नरक इत्यादी गोष्टी तर आमच्या तोंडपाठ असतात. अशाच एका व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून मित्राच्या आग्रहास्तव मी गेलो होतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष तेथील संस्थानिकाचे वारसदार होते. ते सभेत प्रवेशताच मित्र उस्फूर्तपणे म्हणाला, ” व्वा, काय खानदानी तेज आहे चेहऱ्यावर ! ” त्याच्या या विधानाने मी चाट पडलो. मग उस्फूर्तपणे मी मित्राला विचारलं, “लेका तू खानदानी नाहीस का ? आणि हे खानदान – बिनदान काय असतं ? लोकोपयोगी कर्तृत्व महत्वाचं. त्या कर्तृत्वाला आदर द्यायचा.”

 

लहानपणी मी राजांचे राजवाडे पहायचो नि त्यांना बांधणाऱ्या हजारो मजुरांच्या हालअपेष्टा ऐकायचो तेव्हा रागाने माझ्या कानाच्या पाळ्या गरम होत असत. राजा, राजवाडा, युवराज, राजकुमार, पट्टराणी, दास – दासी, पंचपक्वान्ने, दानधर्म, राजधर्म इ. गोष्टी लहानपणी पुस्तकातून वाचताना पहिला प्रश्न मला पडायचा, “हा राजा, याचा हा राजमहाल, याचे हे अधिकार ठरवले कुणी ?” म्हणजे आम्हीच एक ‘राजेशाही’ कल्पायची, तशी व्यवस्था बनवायची नि “होय राजे, होय राजे” म्हणत माना डोलवत, लाळ घोटत त्या रॉयल परिवाराच्या मागंपुढं करत रहायचं. सभ्य (?) ब्रिटिशांचाही राजपरिवार अजून शिल्लक आहे. जपानमध्येही अशी शिल्लक (!) आहे. आणि आमच्याकडे तर गल्लोगल्ली अशी ‘खानदानी शिल्लक, रॉयल ब्लड’ वगैरे वगैरे आहे. आम्ही राजेशाही, हुकुमशाही नि सरंजामशाहीचा पुरेपूर अनुभव घेत आज लोकशाही पर्यंत पोहोचलो आहोत. अर्थात ‘लोकशाही’ शब्दात ‘शाही’ आहेच ! एखादा ‘देश’ हा ‘राष्ट्र’ बनतो जेव्हा लोकांच्या राज्यात निवडून आलेले नायक – नायिका हे फक्त आणि फक्त “लोकप्रतिनिधी” असतात. अशा राष्ट्रात राजवाडे, खानदानी परिवार, दासदासी, राजकुमार इत्यादी भानगडी नसतात. इथे “राजा आणि प्रजा” अशी व्यवस्था नसते. इथे “प्रजा आणि प्रतिनिधी” अशी प्रगल्भता असते. प्रजा सार्वभौम असते. म्हणूनच प्रजेचा अधिकारनामा आणि कर्तव्ये सांगणारी लिखित “घटना” असते.

 

अलिकडच्या इतिहासात छत्रपती शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड आणि देवी अहिल्याबाई होळकर यांचं बालपण हे “शाही” नव्हतं. ते बहुजन समाजाची दुःखे जवळून बघत स्वकर्तृत्वाने “लोकनायक” बनले. पुण्यातील पेशवाईचा क्षय हा सर्वश्रुत आहे परंतु पहिले माधवराव पेशवे जे आगरकरांसारखेच तर्कनिष्ठ होते ते असाध्य व्याधीमुळे ऐन तारुण्यात निधन पावले. माधवरावांनी अल्पकाळात राज्याची घडी पुन्हा बसवली. ही अपवादात्मक उदाहरणे सोडली आणि प्राचीन इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न केला तर असे दिसते की भारतीय उपखंडात लोकशाही पद्धतीचे “गण” होते. स्री सुद्धा या गणांची प्रमुख होत असे. असे गणनायक व गणनायिका आपापल्या गणास म्हणजे लोकांना उत्तरदायी होते. असे ‘नायकत्व’ हे राजेशाही प्रमाणे वारसाहक्काने मिळत नव्हते. आजच्या व्यक्तीपूजक भारतात लोकशाही असूनही बहुतांश राजकारण्यांच्या मुलाबाळांना, नातवंडे – पतवंडेंना कर्तृत्व फारसे नसतानाही “गादी” मिळते. राजकीय पक्षाला तनमनधन सिंचून मोठे करणाऱ्या प्रगल्भ कार्यकर्त्यांना नाईलाजाने या ‘दिवट्यां’ची आरती ओवाळावी लागते. यापैकी बरेच ‘बाळराजे वारसदार’ हे बापाच्या दहशतीचा फायदा घेत जेव्हा दूरचित्रवाणीवर अकलेचे तारे तोडत असतात तेव्हा जाणवते की “प्रजा आणि प्रतिनिधी” ही लोकांना खरोखर सार्वभौम मानणारी प्रगल्भ संस्कृती आपल्याकडे अजून नीटपणे यायची आहे.

 

जगभरात बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी ‘पुरुषप्रधान’ व्यवस्थेने मोठा धुमाकूळ घातला. अमेरिकेसारख्या प्रगत देशाचा अध्यक्ष अजूनही एखादी महिला होऊ शकली नाही. भारतीय उपखंडातही या पुरुषी व्यवस्थेने बराच गोंधळ घातला. राजा एक पुरुष, त्याचा गुरु एक पुरूष, प्रधान एक पुरुष, सेनापतीही पुरुष, राजाचा वारसदारसुद्धा पुरुष, राज्यातील सर्व कुटुंबप्रमुख हे पुरुष, बहुतेक सामाजिक व सांस्कृतिक संस्कारही पुरूषांचेच लाड करणारे आणि देव व त्याचे बहुतांश अवतारही पुरुष ! राजेशाहीने या पुरुषप्रधानतेला खतपाणी घातले. बोलतानाच आम्ही ‘राजेशाही’ असा उल्लेख करतो, ‘राणीशाही’ नाही ! या पुरुषप्रधानतेने आमच्या कुटुंबांमध्ये तर हैदोस घातला. कमावणारा कुटुंबप्रमुख पुरुष हा ‘राजा’ आणि कुटुंबातील सदस्य हे ‘प्रजा’. राजा बोले, प्रजा डोले. उंडारायला पुरुष सांडासारखे मोकळे आणि खानदानी संस्कृती सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी ही स्रियांची. त्यातही या महिला राजघराण्यातील असतील तर तथाकथित मॅनर्स आणि एटीकेट्स हे पुष्कळसे यांनीच सांभाळायचे. संस्थानिकांचे बरेच आंग्ळाललेले आजचे वारसदार एका बाजूला आपल्या संस्थानातील स्वतःची पारंपारिक छवी आणि रूढी सांभाळून भाबड्या लोकांची भक्ती उपभोगत रहातात आणि दुसऱ्या बाजूला या लोकांपासून दूर असं ‘पश्चिमी’ जीवन जगत असतात. ही सर्कस खूप मजेशीर आणि तितकीच धोकादायक असते.

 

लोकांच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या नायकांना राजेशाही, राजवाडा, खानदानी पोषाख आणि रिवाजांची गरज नसते. अमेरिकेचे दोन अध्यक्ष मला याबाबतीत इथे आठवतात – अब्राहम लिंकन आणि बराक ओबामा. कुठेही, कोणत्याही प्रकारचा उठवळपणा नाही. आमच्याकडे तर जवळपास प्रत्येक पुढाऱ्याला ‘उठवळपणा’ हीच वागण्याची तर्हा वाटत राहिली आहे. हां, या गोष्टीला काही उत्तम अपवाद जरूर आहेत, जसे की लालबहादूर शास्त्री, यशवंतराव चव्हाण, मधु दंडवते, मनमोहनसिंग, अटलबिहारी वाजपेयी, गोव्याचे मनोहर पर्रीकर आणि तासगावचे आर. आर. पाटील. ही सारी मंडळी येथील रयतेशी आणि भूमीशी एकरूप झालेली ! सामान्य लोकांना म्हणूनच सदासर्वकाळ हवीहवीशी वाटणारी. लोककल्याणासाठीच फक्त सत्ता राबविताना या लोकप्रतिनिधींना जाहिरातबाजी, मेडिया – मॅनेजमेंट, श्रेय घेण्याचा खटाटोप आणि लाचार अनुयायांची कधी गरज भासली नाही. देशाचा इतिहास लिहिताना असे लोकप्रतिनिधी हे राजकीय पक्षांची वा विचारसरणीची मर्यादा तोडून इतिहासकारांच्या लेखनातून लख्खपणे दिसत असतात. याचं सर्वाधिक मोठं कारण असं की हे सदैव जनतेलाच सार्वभौम मानतात !

Dr Girish Jakhotiya -2

(लेखक डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार, ज्येष्ठ लेखक, विचारवंत आहेत. आपल्या अनुभवांच्या आधारे वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या विचारांसाठी ते ओळखले जातात)

ई-मेल – girishjakhotiya@gmail.com

Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld per IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख पुढे पाठविता येईल.


Tags: democracyDr. Girish Jakhotiyaleader or kingडॉ. गिरीश जाखोटियालोकप्रतिनिधी की राजेलोकशाही
Previous Post

“केवळ जय जवान, जय किसान नाही तर जय कामगार ही आवश्यक”

Next Post

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा फोन कोण टॅप करतंय?

Next Post
Jitendra Awhad phone tapping

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा फोन कोण टॅप करतंय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!