डॉ. गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो!
१ मे म्हणजे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने “माझ्या मुंबई” बद्दल आज लिहितोय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत वाढलेल्या केसेस वेगाने कमी होताहेत. शासकीय प्रयत्नांसोबत मुंबईकरांची शिस्त सुद्धा याबाबतीत कारणीभूत आहे.
१९८५ मध्ये मी चोवीस वर्षांचा असताना सोलापूरहून मुंबईला आलो त्यांस ३६ वर्षे झाली. सांस्कृतिक भाषेत ‘तीन तपे’ झाली. पहिले तीन – चार महिने अवघड गेले पण नंतर ‘मुंबई’ ही अंगप्रत्यंग भिनू लागली. मी पक्का मुंबईकर केव्हा झालो ते कळलेच नाही ! व्यावसायिक करिअरच्या अर्थानं या शहरानं मला भरभरून दिलं. परंतु हे एकच कारण नाहीय मुंबई आवडण्याचं. अशी बरीच कारणं आहेत मुंबई माझ्यात पूर्णपणे भिनण्याची. हे सगळं साग्रसंगीत सांगण्यासाठी एक लेख नाही पुरणार. मुंबई हे अवाढव्य शहर जसं महाराष्ट्रीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतं तसंच ते संपूर्ण भारतदर्शन घडवतं. काळबादेवीतले मारवाडी, माहीमचे कोळी, माटुंग्याचे मद्रासी, दादर – परळचे कोकणी रहिवासी, मालाडचे भैये, महमदअली रोडचे मुस्लिम बांधव, घाटकोपरचे गुजराती, पार्ल्याचे सारस्वत, बांद्र्याचे कॅथोलिक, फाईव्ह गार्डनचे पार्सी इ.इ. सर्वधर्मीय, सर्वजातीय व सर्वपंथीय भारतीय तुम्हाला या बृहत् नगरात भेटतील. यातही तुम्हाला काळबादेवीचा मारवाडी व मालाडचा मारवाडी यांच्यामधील सूक्ष्म फरक कळेल. तसा फरक गिरगाव, दादर व पार्ल्यातील सारस्वतांमधलाही जाणवेल. (इथे ‘सारस्वत’ शब्दाचा उपयोग हा जातीय नसून गुणात्मक आहे.)
या शहराची किती वैशिष्ट्ये सांगायची! माझ्या मते पहिलं मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे शहर भल्याभल्यांचा माज उतरवितं आणि नाठाळांनाही शिस्त लावतं. इथे राव आणि रंक सारखेच. उद्योगपती, नट – नट्या, पुढारी, भिन्न भिन्न प्रकारचे व्यावसायिक इ. सर्व मंडळींना हे शहर ‘आरसा’ दाखवितं. अन्यथा आपल्या गावाकडे श्रीमंती, राजकीय पॉवर, ज्ञान आणि प्रशासकीय पदाचा दंभ दाखविणारे मुंबईत आले की गपगुमान आपल्या कामाशी मतलब ठेवतात नि गावी परततात. सामान्य मुंबईकर एकतर स्वतःच्या धावपळीत रोज व्यस्त असतो आणि त्याने असे रथी – महारथी बरेच पाहिलेले असतात. बरं, या मोठ्या मंडळींमुळे सामान्य चाकरमान्यांची रोजची दगदग काही कमी होत नाही. मरीन लाईन्सला किंवा जुहूच्या चौपाटीवर बसून समुद्राकडे नुसतं पहात राहिलं तरी माज उतरतो. हे शहर विविध समुद्रांचं शहर आहे – माणसांचा, संपत्तीचा, संधींचा, आव्हानांचा, पाण्याचा, कामाचा, मोबदल्याचा, माहितीचा, ज्ञानाचा इ. मला बऱ्याचदा अनुभव आला आहे (भारतात नि भारताबाहेरही) की “मुंबईहून मी आलोय” असं म्हणताच समोरील व्यक्तीच्या डोळ्यात ‘मुंबईकरा’ बद्दल आदर दिसतो. या आदरामागे पुण्याई असते ती या विविध समुद्रांची. अगदी चोखंदळ पुणेकर सुद्धा मुंबईकरांशी संवाद साधताना जपून असतात. (कृपया पुणेकरांनी राग मानू नये.)
हे शहर तुमच्या पराक्रमाचं भरभरून कौतुक करतं, परंतु नीटपणे जोखल्यावरच. ते टाटांचं, अझीम प्रेमजींचं, नारायण मूर्तींचं आणि गोदरेजचं कौतुक करताना काही बलाढ्य भ्रष्ट उद्योगपतींना अनुल्लेखानं मारतं. इथे तुमच्या कष्टाचं, हुशारीचं आणि कल्पकतेचं कौतुक तर होतंच, सोबतीने चांगले पैसेही मिळतात. हां, त्यासाठी थोडी सबुरी आणि थोड्या चातुर्याची गरज असते. इथे कृतघ्नता नव्हे, कृतज्ञतेचा अनुभव नेहमी येतो. काही अन्य शहरांमध्ये एखाद्याने तुमचा सल्ला विचारला आणि तो तुम्ही दिलात की हा सल्ला मागणारा कृतघ्नतेने व कुचकटपणे म्हणेल, “अरे, हे तर मला माहीत होतं”. म्हणजे सल्ल्याची फी द्यायची नाही आणि साऱ्या जगाचं ज्ञान आमच्याकडे आहे, असा दंभ मिरवायचा.(अर्थात असे सर्व ग्राहक व अशी शहरे मी टाळतो !) मुंबईत मोठमोठे डॉक्टर्स, उद्योजकीय सल्लागार, बँकर्स, उद्योगपती, कलाकार हे संकोच न बाळगता अडचणीत सापडल्यावर किंवा एखादं नवं आव्हान पेलताना एकमेकांचा सल्ला संपूर्ण आदर राखून सहजपणे घेतात. मित्रांनो, मी हे स्वानुभवाने लिहितोय. जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही किमान दोन – तीन वर्षे मुंबईत रहायला हवं. बरेच विदेशी व्यवस्थापक अनुभवासाठी मुद्दामहून मुंबईला काही वर्षांसाठी बदली करुन घेतात. इथला अनुभव त्यांना अन्यत्र कुठेही मिळत नाही.
मुंबई ही जरी भारताची छोटी प्रतिकृती असली तरी हिचा आत्मा हा आजही “मराठी” आहे. या मराठी माणसाने आईच्या प्रेमाने आणि वडिलांच्या शिस्तीने बाहेरच्या लोकांना आपलंसं केलंय. दिल्ली सारख्या राजधानीच्या शहराला कोणताही लडिवाळ असा ‘सामाजिक चेहरा’ नाही. मुंबईला मात्र असा सुंदर, सरळ, समंजस नि शिस्तीचा सामाजिक चेहरा आहे. इथे बाहेरून आलेला तीन – चार वर्षे जरी राहिला तरी तो इथेच कायम स्थाईक होण्याचा प्रयत्न करतो. (अर्थात आजची मुंबई प्रत्येकाला पोटात घेत सुजली आहे. या शहराने शेवटी किती ओझं सहन करायचं?) या अद्भुत नगरीत रुपये २० ते रु. २००० चं जेवण मिळेल, रु. ५० ते रू. ५००० चा शर्ट मिळेल, रु. ५ लाखाची झोपडी ते रु. ५०० कोटींचा बंगला मिळेल आणि रु. १० चं व्यसन ते रु. १०००० चं व्यसन करणारी ‘भोगी’ मंडळीही दिसतील. इथे पणशीकरांचा केशरी पेढा, महमदअली रोडवरील कबाब, किर्ती कॉलेजच्या गल्लीतला वडापाव, आस्वादची कोथिंबीर वडी, पार्सी डेअरीची मलई कुल्फी, माटुंग्याचा सांबरभात, तिथलाच बेंगाली रसगुल्ला व जामून, चर्चगेट समोरची अंडाभुर्जी, ताडदेवची सरदार पावभाजी, पार्ल्यातील फडकेंची मावाबर्फी, बोरीवलीचे बनपाव, सामंतांचं खर्वस, केडल रोडवरची थायी भाजी आणि काळबादेवीतल्या मारवाडी – गुजराती जेवणाच्या भरगच्च थाळ्या इ. इ. ही यादी न संपणारी आहे. यातले उपप्रकारही बरेच आहेत. मुंबईतील रस्त्यावरचं चविष्ट सॅण्डविच आजपर्यंत जगाच्या पाठीवर मला कुठेही मिळालेलं नाही! आणि तेही पोटभरीचं नि स्वस्त. मुंबई ही प्रत्येकाला त्याच्या चवीनुसार व पाकिटानुसार खाऊ घालते.
या आंतरराष्ट्रीय शहराचं आणखी एक मोठ्ठं वैशिष्ट्य म्हणजे अठरापगड जातींची, धर्मांची, रंगांची, श्रद्धांची, भाषांची, सवयींची, विचारसरणींची, पेहरावांची जगभरातील माणसं तुम्हाला इथे भेटतील. हे शहर एक प्रकारचं ‘विश्वरुप दर्शन’ तुम्हाला आस्तेकदम घडवत जातं. ज्यू, पार्सी, प्रोटेस्टंट ख्रिश्चन, इराणी, सिंहली बौद्ध, काश्मिरी पंडीत, गोंड आदिवासी, चिनी नास्तिक, बोहरा गुजराती मुस्लीम, नेपाळी हिंदू, आफ्रिकी शामवर्णीय असे अनेकोनेक लोक त्यांच्या विविध तर्हांनी तुम्हाला या शहरात भेटतील. इथे तुम्हाला एकाच वेळी अफाट श्रीमंती नि बेफाट गरीबी, असीम समुद्र आणि गुदमरणारे नाले, सर्वोत्तम आणि गलिच्छ वस्त्या दिसतील. तरीही तुम्ही नाक मुरडणार नाही कारण या सगळ्या गलबल्यात ‘सर्वधर्मसमभाव’ भरून राहिलाय. आपलेपणासोबत येथील व्यावसायिक शिस्त व वातावरण भारतातील अन्य कोणत्याही शहरात नाही. महिलांबद्दलचा आदर व त्यांची सुरक्षितता इथली चांगली असल्याने महिला आपलं उत्तम करिअर इथे करू शकतात. इथे तुम्ही अमिताभ आणि लतादिदीचं घर जसं पाहू शकता तसं टाटांचं देदीप्यमान ‘बॉम्बे हाऊस’ही पाहू शकता. हे असे आदर्श जवळ नि डोळ्यांसमोर असताना मुंबईत काम करणं हा एक अलभ्य अनुभवच असतो.
मुंबई शहर आवडण्याचं सर्वाधिक मोठं कारण या लेखाच्या शेवटी मांडतोय. इथे ‘स्थानिक’ मराठी जाणिवा व मराठी भूमीपुत्रांचा सांस्कृतिक ठेवा आजही रसरशीत आहे. गोपाळकाला आणि गणेशोत्सव ही मुंबईची अगदी खास मराठी ओळख. मुंबईसाठी बलिदान देणारे महात्मा जसे इथे स्मरणात असतात तसेच मुंबईला ओरखडे काढणाऱ्यांनाही हे शहर नीटपणे ओळखून आहे. योग्य वेळी अशा ओरखड्यांचा समाचार हे महानगर नेहमीच घेत आलंय. या शहरात ‘राष्ट्रीय भावना’ जशी पुनःपुन्हा जागृत होते तसेच आपण एक ‘वैश्विक नागरिक’ही आहोत हे जबाबदारीचे भान हे शहर करून देते. कष्ट, चातुर्य, हुशारी, स्वभावातील लवचिकता, नेटवर्किंग करण्याची इच्छा व कौशल्य आणि थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल तर हे ‘भाग्यदायी’ शहर तुम्हाला तुमची स्वप्ने साकार करण्यात जरूर मदत करतं. यासाठी वयाचे बंधन, लिंगभेद, जातीभेद व वर्णभेद हे शहर मानत नाही. मी काही महिन्यातच साठीला पोहोचेन पण हे अद्भुत शहर मला सांगतंय, “गिरीश, तुला अजून वीस वर्षे काम करायचंय !” या शहराच्या आणि माझ्या जनुकांमध्ये आता भेद राहिलेला नाही. “मी मुंबईकर” असण्याच्या सार्थकतेवर मला अजून खूप काम करायचंय !
(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात. सध्या मुख्य सल्लागार, जाखोटिया आणि असोसिएट्स, मुंबई – ५७ म्हणून कार्यरत आहेत.)
(महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या “श्रमकल्याण युग” या मासिकात हा लेख नुकताच प्रकाशित झालाय)
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.
संपर्क: girishjakhotiya@gmail.com