डॉ. गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो ! ‘भारतीय ग्राहक दिना’च्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही मूर्ख बनण्याचं जगातलं सर्वात मोठं कारण म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहाच्या किंवा अशा समूहाने निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या वरवरच्या चांगुलपणावरील आमचा अंधविश्वास. दुसरं कारण असतं आमच्या भावनाशीलतेचं. आम्ही अगदी भावविभोर झालो की तर्काने विचार नाही करत. तर्क संपला की मूर्खपणा आलाच म्हणून समजा. आपण ‘चांगले’ आहोत म्हणून सारं जग चांगलं आहे, हे गृहीतक बऱ्याचदा मोठी गडबड करतं. एखादा मनुष्य सात्विक दिसतो, सात्विक बोलतो, सात्विक आहार घेतो आणि सात्विक सवयी दाखवतो म्हणजे तो आर्थिक – सामाजिक – राजकीय व्यवहारातही सात्विक असेल याची ‘ग्यारंटी’ नसते ना भाऊ ! भोलेभाले दिखनेवालेभी गजबके गोले हो सकते हैं. सामाजिक क्लबांच्या व्यासपीठावरून आरोग्यसेवेवर ग्यान देणारे बरेच मातब्बर डॉक्टर घबडू- तबडू बील आकारत आपल्या पेशंटला मूर्ख बनवतातच. सातत्याने शेतकऱ्यांचं भलं करण्याची भाषा करणारे बऱ्याच शेतकऱ्यांना गेली कित्येक वर्षे कसं मूर्ख बनवताहेत हे आपण बघत आलोच आहोत. आत्मशुद्धीवर आणि आत्मशांतीवर थोर थोर प्रवचन देणारे बरेच बाबा, आचार्य, मौलवी, फादर इ. महानुभाव आपल्या अनुयायांना भावविभोर बनवत हातोहात गंडवत राहतात. बरेच प्रतिष्ठित हॉटेलवाले बिलात हळूच सर्विस टॅक्स जोडून घाईत असलेल्या किंवा संकोची असणाऱ्या ग्राहकाला मूर्ख बनवतात. प्रचंड भ्रष्टाचार करणारे उद्योगपती हे धर्मशाळा, धर्मसंमेलने आणि धर्मोत्सवांचे “आर्थिक आश्रयदाते” बनून भाबड्या भक्तांना हातोहात मूर्ख बनवीत असतात. हे म्हणजे लोकांचेच शंभर रूपये लुबाडून त्यातील दहा रुपये लोकांना दान देण्यासारखे असते ! आणि हो, ‘शब्दफुलोरे’ वापरणारे पुढारी अलगदपणे स्वप्नांची चादर लपेटत जनतेला ज्या प्रकारे पुनःपुन्हा मूर्ख बनवतात, ते ‘असाधारण’ अशी किमया करणारे ( भयंकर !) अवलिया असतात, हे सर्वश्रुत आहेच.
“जग चांगले आहे” ही धारणा जगण्यास बळकटी देते हे मान्य परंतु “सारे जग काही परफेक्ट नसते.” साधारणपणे ९०% लोक हे भले असतात जे १०% लोकांकडून सातत्याने मूर्ख बनवले जातात. आपल्या जनुकांमध्येच भाबडेपणा असेल तर ‘मूर्ख बनणे’ टाळता येणे अवघडच. यासाठी नेहमीच गरज असते ती सज्जन परंतु चतुर मित्रांची आणि नातेवाईकांची. सतर्क तर असायलाच हवे. ढोबळमानाने काही समाज, काही शहरे व काही संस्था – संघटना सुद्धा सामान्यांना मूर्ख बनविण्यात माहीर असतात. हे यांचे एक ‘सार्वजनिक’ वैशिष्ट्य असते. अशा सामूहिक लबाडीला भिडताना मी खूप सावध होतो. अर्थात ‘नियमाला अपवाद असतो’ या न्यायाने या मूर्ख बनविणाऱ्या कौरवांमध्ये एखादा सज्जन ‘युयुत्सू’ असतो जो पांडवांच्या बाजूने लढतो. ‘कृष्ण सखा’ जेव्हा जेव्हा सोबतीला नव्हता तेव्हा तेव्हा पांडव हे कौरवांकडून मूर्ख बनवले गेले होते. प्राचीन काळातील भारतीय उपखंडात जे निरागस लोक रहायचे ते चांगुलपणावर प्रचंड भरोसा करणारे असल्याने आस्तेकदम मूर्ख बनवले गेले. मूर्ख बनविण्याच्या प्रक्रिया या जेवढ्या आर्थिक व राजकीय होत्या, त्या तेवढ्याच सांस्कृतिक व धार्मिकही होत्या. सर्व प्रकारच्या मूर्खपणांमध्ये “आर्थिक मूर्खपणा” हा सर्वाधिक हानिकारक असतो. बहुजन हे पद्धतशीरपणे आर्थिकदृष्ट्या मूर्ख बनविले गेले आणि पुरेशी आर्थिक साक्षरता व एकी नसल्याने ते आजही याच मूर्खपणाचा बळी ठरताहेत.
मूर्ख बनविण्याचा व होण्याचा सर्वाधिक प्रचलित मार्ग असतो तो अंधश्रद्धांचा. अनाकलनीय घटनांच्या, चमत्कारांच्या आणि रोजच्या जगण्याच्या समस्या सोडवून देणाऱ्या अंधश्रद्धांनी सुशिक्षित लोकही मूर्ख बनतात हे आपण नेहमीच पहातो. काही अन्यथा हुशार व सावध असलेले महाभाग जेव्हा भ्रष्ट बाबा – बापूंच्या कच्छपी लागतात तेव्हा तो एक प्रकारचा ‘मनोवैज्ञानिक मूर्खपणा’ असतो. तथाकथित मानसिक समाधान किंवा आर्थिक चिंतांमधून मुक्ती मिळविण्यासाठी हा एक “कॅलक्युलेटेड मूर्खपणा” हेतूपुरस्सरपणे केला जातो. इथे ‘उपयोगिते’चा सिद्धांत लागू होतो. मूर्खपणामागे हिशेबीपणा असा असतो की झालाच तर फायदा होईल, नुकसान होणार नाही. तथाकथित प्रतिष्ठितांचा हा मूर्खपणा जेव्हा अर्धशिक्षित गरीब अनुसरतात तेव्हा त्यांचे मोठे आर्थिक नुकसान तर होतेच, सोबतीला मानसिक खच्चीकरणही होते. गरीबीच्या शापातून मुक्त होण्यासाठी जो ‘अंधश्रद्ध मूर्खपणा’ गरीब लोक करतात तो त्यांना अधिकच गरीबीच्या गाळात रुतवत जातो. अंधश्रद्धा पिकविणारे, पसरविणारे व रूजविणारे धूर्त लोक हे स्वतःची आर्थिक तरतूद केल्यानंतरच इतरांना मूर्ख बनविणारी नौटंकी वटवीत असतात हे भाबड्या गरीबांच्या लक्षातही येत नाही व तसे ते येऊही दिले जात नाही. बहुजनांनी आपले आर्थिक अधिकार जाणू नयेत म्हणून निरंतरपणे त्यांना अंधश्रद्धांच्या गुंगीत ठेवले जाते. गुंगीत ठेवणारे हे प्रतिष्ठित लोक मात्र समांतरपणे अध्यात्मिक अंधश्रद्धांनी भरलेले बाह्य आचरण करीत असतात नि छुपेपणाने अर्थार्जनासाठी वैज्ञानिक व व्यवहारी विचार – आचार वापरीत असतात.
अनेक सुसंपन्न, सुशिक्षित व सुप्रतिष्ठित समाजातील लोक सांस्कृतिक व धार्मिक मार्गाने मूर्ख बनत रहातात कारण यांचे स्वतःचे वाचन, मनन व चिंतन नसते. ज्या संदर्भांचा दाखला देत हे स्वतःला व इतरांना मूर्ख बनवत असतात ते संदर्भ यांनी वाचलेलेही नसतात. यातीलच काहीजण जेव्हा असे संदर्भ वाचण्याचे कष्ट उचलतात तेव्हा आपण इतकी वर्षे कसे गंडले गेलेलो होतो याचा यांना उलगडा होतो. परंतु हे ‘सत्यदर्शन’ मान्य करायचे नसते कारण आपण मूर्ख ठरू ही भिती यांना सतावू लागते. मनाचा धीरोदात्तपणा व प्रामाणिकपणा ज्या लोकांकडे असतो ते प्रांजळपणे आपल्या मूर्खपणाची कबूली देतात व असा मूर्खपणा पुन्हा न करण्याचा प्रण करतात. काही थोर लोक अहंकार, अवडंबर, आडमुठेपणा व अविवेकीपणामुळे तोच तो मूर्खपणा करीत रहातात. याचे महाभारतातील उत्तम उदाहरण म्हणजे महापराक्रमी भीष्म. भीष्माला जेव्हा स्वतःचा मूर्खपणा कळला तेव्हा खूप उशीर झालेला होता. काही अत्यंत अभ्यासू मंडळी स्वतःला कळलेला व पटलेला मूर्खपणा सोडत नाहीत कारण आयुष्यभर जे तत्वज्ञान यांनी अंगिकारलेले होते त्याचाच पराभव पहाणे यांना शक्य नसते. मेंदू मूर्खपणाची ग्वाही देत असते परंतु थरथरलेले मन ती कबूल करत नाही. हे लोक मग आपल्या मूर्खपणाचे कृत्रीम समर्थन करण्यासाठी त्याच्या अवतीभवती अधिकाधिक मूर्खपणाचे मुद्दे पेरु लागतात आणि त्या दलदलीत आणखीनच फसत जातात.
जगात नेमकं काय चाललंय, आपलं आर्थिक भलं कशात आहे आणि आपण कसे मूर्ख बनवले जातो हे माहीत नसल्याने अनेक बहुजन नागवले जातात. जंगलांचं, जंगली वनस्पती व प्राण्यांचं अथांग ज्ञान असलेले भूमीपुत्र हे संशोधनासाठी मोठ्या कंपन्यांकडून तुटपुंज्या पगारावर वापरले जातात. आपल्या संशोधनाचं मोल त्या निरागसांना माहीत नसतं. उत्तम चित्रकाराचं उत्तम पेंटिंग कवडीमोलाने घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड किंमतीस विकणारे अनेक दलाल असतात. आणि हो, मूर्खपणा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कुठे कमी आहे ? यांना ‘किमान हमी किंमती’चा फॉर्म्युलाही माहीत नसतो. आडमुठेपणा असला की स्वतःचे नुकसान करणारा मूर्खपणा हा सोबतीला असतोच ! आमच्या भाबड्या शेतकऱ्यांवरून माझ्याच एका जुन्या कवितेच्या काही ओळी आठवल्या –
” मूर्ख झाडांना हे माहीतच नाही
की ती झाडे आहेत.
लबाड, लोभी, आक्रमक व रसशोषक
बांडगुळांनी झाडांना करकचून
वेढे घातलेत.
बांडगुळेच झाड म्हणून मिरवताहेत !”
जगातील बहुतेक देशांमधील मुठभर लोकांनी त्या त्या ठिकाणच्या बहुजनांचा चांगुलपणा (नि म्हणून मूर्खपणा) वापरत त्यांच्या शोषणाची एक अजस्त्र व्यवस्था उभी केली आहे. “मूर्ख” सामान्य माणसे या व्यवस्थेत उद्याची खोटी स्वप्ने दाखविणाऱ्या त्या मुठभर जादुगारांच्या नादी लागलेली आहेत.
न्यूनगंड व मूर्खपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, बौद्धिक असा न्यूनगंड हा मोठ्या चलाखीने रुजविला जातो. एकदा असा न्यूनगंड खोलवर रुजला की तो रुजविणारे न्यूनगंडग्रस्तांना सहजपणे मूर्खात काढू शकतात. “We are good for nothing” अशी आपली धारणा झाली की आपण साधा विवेकही वापरण्याचे विसरतो. विवेक आणि विज्ञान दूर गेले की मूर्खपणा हा सहजगत्या वाढत जातो. “व्यक्तीपूजा” व “क्षेत्रपूजा” हा आमचा एक मोठा सार्वजनिक दोष असल्याने मोठमोठाल्या व्यक्तींच्या छुप्या उद्देशांना व अपराधांना न तपासता आम्ही वाहवत जातो नि अलगदपणे मूर्ख बनतो. “हे मोठे कसे झाले” या गोष्टीचा छोटा जरी धांडोळा आम्ही घेतला तरी मूर्ख बनण्याची शक्यता कमी होऊ शकते. यासाठी योग्य माहितीचे स्रोत उपलब्ध असायला हवेत. अशा स्रोतांसाठी विविध क्षेत्रातील मित्रांचे नेटवर्क असायला हवे. साधा तर्क जरी वापरला तरी आपल्या लक्षात येते की “अतिमहत्वपूर्ण” म्हणून गणलेल्या उत्तर भारतीय क्षेत्रातील लाखो लोक महाराष्ट्रात येऊन नोकऱ्या का करतात. जिथे ‘सामाजिक मूर्खपणा’ केला जातो तिथे आर्थिक सुबत्ता येणार कुठून ? “आपण मूर्ख बनवले जातो आहोत” याची मुळात चाहूल लागली पाहिजे. यासाठी Early Warning Signals आणि Benchmarking ची आवश्यकता असते. असे सिग्नल्स व बेंचमार्क्स हे विवेक आणि विज्ञानाने मिळू शकतात. “आर्थिक मूर्खपणा” टाळणे ही सुजाण होण्याची पहिली पायरी असते. यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची असते. आर्थिक साक्षरतेसाठी आधी आडमुठेपणा व आळस सोडावा लागतो. बरेच बहुजन हे स्वतःच्या आडमुठेपणामुळेच मूर्ख बनवले जातात, हे न पचणारे कटूसत्य आहे. एकदा आर्थिक ताकद आली की सांस्कृतिक व सामाजिक न्यूनगंड आस्तेकदम नाहिसा होण्यास प्रारंभ होतो. यासाठी बहुजनांनी एक कठोर बाब लक्षात ठेवली पाहिजे की मूर्ख बनविणारे मुठभर लोक स्वतःची आर्थिक सत्ता किंवा सुबत्ता कधीही गमवत नाहीत. सत्यशोधक महात्मा जोतिबा फुल्यांनी हीच बाब ‘शेतकऱ्याचा असूड’ व ‘गुलामगिरी’ या आपल्या दोन ग्रंथांमधून प्रभावीपणे मांडलीय. किती बहुजनांनी हे दोन ग्रंथ काळजीपूर्वक वाचलेत ?
-डॉ. गिरीश जाखोटिया.
(Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.)