डॉ. गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो ! गेली पंचेचाळीस वर्षे मी भारतभर हिंडतोय पण महाराष्ट्रासारखं “चतुरस्त्र” राज्य मला भारतात कुठेही आढळलं नाही. ‘चतुरस्रता’ हेच महाराष्ट्राचं वेगळेपण आहे. या चतुरस्त्रतेत संतुलनाची प्रगल्भता आहे. म्हणजे इथे उत्तर भारतातील आक्रमकता, उपभोगवाद, बेशिस्त आणि अडाणीपणा नाही. इथे दक्षिण भारतातील अवास्तव संकोच व संकुचितपणाही नाही. महाराष्ट्राची ही चतुरस्त्रता या राज्याच्या राजधानीत म्हणजे मुंबईत ठायी ठायी दिसते. यामुळेच भारतातील कोणतंही मोठं अथवा मध्यम शहर सर्व परिमाणांवर एकत्रितपणे मुंबईच्या तुलनेत कमी पडतं. संपूर्ण भारतातील कंपन्यांचे, बँकांचे आणि सरकारी यंत्रणेचे अधिकारी, मारवाडी वा मद्रासी व्यापारी, चार्टर्ड अकौंटंट्स, डॉक्टर्स इत्यादी व्यावसायिक मंडळी मुंबईला एकदा आली की इथेच स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतात. अर्थात हीच बाब थोड्या फरकाने महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर इ. शहरांना लागू होते.
ही ‘मराठी चतुरस्त्रता’ शिवरायांच्या स्वराज्याचंही मोठं वैशिष्ट्य होतं जे त्यांच्यानंतरच्या मराठी प्रशासकांनी व योध्द्यांनी बरीच वर्षे जपलं. मुघल सम्राट औरंगजेबाला मराठ्यांनीच अस्मान दाखवलं जो अपयशाने खंगून मराठी मातीत मेला. सन १८१८ पर्यंत इंग्रजही मराठ्यांना टरकून होते. आरमारी सैन्यसज्जता उभे करणारे आणि इंग्रजांना नीटपणे जोखून त्यांना एका मर्यादेत ठेवणारे शिवराय आपल्या समग्र कर्तृत्वातून या चतुरस्त्रतेचं आदर्श उदाहरण आपल्या समोर ठेवतात. परंतु १९४७ नंतर याच चतुरस्त्रतेचा वारसा चालविणाऱ्या महाराष्ट्रातून दिल्लीच्या तख्तावर कुणी ‘प्रधान मंत्री’ म्हणून विराजमान होऊ नाही शकलं. भारतीय कार्पोरेट जगतातही मी पहात आलोय की योग्यता असतानाही ‘मराठी माणूस’ कंपनीचा ‘मुख्याधिकारी’ बऱ्याचदा होऊ शकत नाही. अर्थात हे असं होण्याचं कारणही स्पष्ट आहे की ऋजुता, सर्वसमावेशकता, विरोधी मतांबद्दलचा आदर, स्पष्टवक्तेपणा, अधिकारांबद्दलची निरीच्छता आणि तर्कशुद्धतेचा आग्रह ही सर्वसाधारणपणे मराठी माणसाची ‘जणुकीय व सांस्कृतिक संपदा’ बऱ्याच अमराठी ताकदवरांसाठी अडचणीची ठरत आली आहे. ही संपदा इथे महाराष्ट्रात फार पूर्वीपासून चालत आली आहे.
१२ व्या शतकात प्राकृत मराठीतील ज्ञानेश्वरी मांडणारे बंडखोर ज्ञानेश्वर, १७ व्या शतकात आपल्या टोकदार अभंगांमधून संस्कृतीच्या ढोंगी ठेकेदारांना धोबीपछाड लावणारे तुकोबा, १९ व्या शतकात चौफेर बंड करीत स्री – शिक्षण, विधवा विवाह, अस्पृश्यांना पाणी आणि अन्य अनेक बदल घडविणारे फुले दाम्पत्य, याच काळात आपल्या बुद्धीप्रामाण्यतेचा सामाजिक आविष्कार करणारे आगरकर, स्री – उद्धारक महर्षी कर्वे व कुटुंब – नियोजन सांगणारे त्यांचे चिरंजीव रघुनाथ कर्वे, २० व्या शतकाच्या सुरुवातीला दुर्बळांसाठी राखीव जागा ठेवणारे राजर्षी शाहू महाराज, याच कालखंडात राजकीय असंतोषाचे जनक ठरलेले लोकमान्य टिळक, मनुस्मृतीचं दहन करणारे नि मार्क्सला टाळून बुद्धाच्या मार्गाने जाणारे डॉ. आंबेडकर, पत्री सरकार चालविणारे क्रांतीसिंह नाना पाटील, भूदान चळवळीचे नेते विनोबा भावे, प्राथमिक शिक्षण रयतेला उपलब्ध करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील, समान नागरी कायदा हा मुस्लीमांच्या हिताचा आहे असं सांगणारे बंडखोर हमीद दलवाई, गांधीजींच्या सत्याग्रहाला नि लोकचळवळीला जमेल तसा आधार देणारे उद्योगपती जमनालाल बजाज – ही सर्व लोकोत्तर व्यक्तीमत्वे आपापल्या क्षेत्रातील ‘बंडखोर मंडळी’ होती जी मराठी धरतीने देशास दिली. या सर्व थोरांच्या कर्तृत्वाला जवळून अभ्यासताना जाणवतं की महाराष्ट्रीय चतुरस्त्रतेची ही परंपरा किती अजोड नि अभूतपूर्व अशी आहे !
“इडापिडा टळो नि बळीचं राज्य येवो” हे रयतेचं सुभाषित महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. शेतीचा शोध घेणारी आद्य गणनायिका निऋती सुद्धा मराठी शेतकऱ्यांना माहीत आहे. मातृसत्ताकाचा “सिंधूजन वारसा” हा येथील ‘कुणबी संस्कृती’चा पाया आहे. येथील मराठी मुलखात तब्बल एक कोटी आदिवासी रहातात जे ‘निसर्ग – पूजकां’चा आनंददायी वारसा चालवतात आणि भारतातील अन्य सात कोटी आदिवासींच्या तुलनेत सामाजिक – आर्थिक बदलाबाबत अधिक अग्रेसर आहेत. या सगळ्या प्राचीन सांस्कृतिक मिश्रणाने महाराष्ट्राला ‘खास’ बनवलं. महाराष्ट्र हा सांस्कृतिक व वैचारिक दृष्ट्या इतका चतुरस्त्र आहे की नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि याच शहरात आपल्या लाखो अनुयायांसोबत डॉ. आंबेडकरांनी बुद्धाचा ‘धम्म’ स्विकारला होता. मुंबई जशी दादासाहेब फाळकेंच्या चित्रसृष्टीची नगरी आहे, तशीच ती उद्योगांचं विश्वविख्यात केंद्रही आहे. पुण्यात आगरकर – टिळक – कर्वे – फुले असे भिन्न भिन्न विचारवंत होऊन गेले ज्यांच्या प्रतिभेचा वारसा हा या शहराचा प्राण आहे. औरंगाबादेत डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक महत्तेची सुंदर स्मरणशिल्पे आहेत नि सोबतीला जवळच गौतम बुद्धाच्या आठवणींची चित्रे आहेत. म्हणजे महाराष्ट्र देशी अशा अनेक समांतर परंपरांचा ओजस्वी प्रवाह अनेकविध स्तरांवर वाहतो आहे. महाराष्ट्रातील हे ओजस्वीतेचे प्रवाह आणि स्तर इथलं चतुरस्त्र वेगळेपण जपतात.
दिल्लीश्वरांना गेली कित्येक शतके महाराष्ट्राचं हे वेगळेपण आव्हानात्मक वाटत आलं आहे. आगम – निगम, आस्तिक – नास्तिक, अनेकांतवाद – अद्वैतवाद, आत्मवाद – अनात्मवाद इत्यादी अनेक परस्पर विरोधी नि तरीही सुसंगत अशा विद्यापिठांनी महाराष्ट्राला आलंकृत केलं आहे. यामुळेच महाराष्ट्रात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक स्थलांतरीतास स्वतःला हवा तो आधार आपसुकपणे मिळतो. १९१० साली माझे पणजोबा राजस्थानातून पुण्यास स्थलांतरीत झाले. माझ्या मुलांची आज पाचवी पिढी इथे आहे. पिढीदरपिढी महाराष्ट्राचं चतुरस्त्र असं बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक (उद्योजकीय) वैभव आम्ही पहात व अनुभवत आलो आहोत. खेड्यातील समृद्ध “कुणबी” संस्कृती, कोल्हापूरचा रांगडा मोकळेपणा, पुण्यातील चिकित्सक वृत्ती, सोलापूरची सर्वभाषिक समाजरचना, मुंबईतील उद्यमशीलता आज पहाताना मात्र महाराष्ट्राची ही चतुरस्त्रता वेगाने कमी होत चाललीय असे हल्ली वाटू लागले आहे. देशाचं वैचारिक, शेतकी, उद्योजकीय, व्यावसायिक आणि सांस्कृतिक नेतृत्व करणारा महाराष्ट्र आज यांत्रिकपणे नियतीनं वाढलेलं दान स्विकारतोय असं दिसतंय. एक प्रकारचा वैचारिक विस्कळीतपणा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बदल घडविणाऱ्या विजीगिषू वृत्तीतला ढिसाळपणा हल्ली नजरेत भरतोय. निरीच्छता जी काल अधिकारांबद्दलची होती ती आता ‘बदला’बाबतची दिसते आहे. प्रचंड कुवत असणारे विविध प्रकारचे “कारभारी” आज स्वरचित अशा छोट्या वर्तुळात गोलमगोल फिरताना दिसताहेत. बदलाबद्दलची निराशा नि म्हणून “मी व माझा परिवार शिस्तीत वागतो आहोत,” इथपर्यंत आज सिमीत झालेली महत्त्वाकांक्षा ‘प्रारब्ध’ म्हणून स्विकारणारा महाराष्ट्रीय समाज आज पहाताना मी नाराज जरूर होतो पण निराश नाही. मुघलांचा माज उतरविणारा, अटकेपार झेंडा लावणारा, सिलिकॉन व्हॅली मध्ये पराक्रम गाजवून श्रीमान क्लिंटनना प्रभावित करणारा हुशार, धाडसी, कल्पक नि कर्तव्यकठोर महाराष्ट्रीयन एका कोषात आज का राहू पहातोय ?
हा बंदिस्त कोष मराठी माणसाने स्वतः बनवला आहे. सन १९९५ नंतरच्या जागतिक बदलांवर स्वार होताना आर्थिक आणि त्याशी निगडित बौद्धिक संधीचा जवळपास प्रत्येक मराठी माणसाने जमेल तसा – तितका उपयोग केला. परंतु ही वेगवान कसरत करताना मूळ “महाराष्ट्रीय सामाजिक व सांस्कृतिक सौष्ठवा”कडे दुर्लक्ष होऊ लागलं. आर्थिक सुबत्तेची (?) नवी चादर तर विनली गेली पण चादरीतले सामाजिक धागे हे कमकुवत आणि सांस्कृतिक रंग हे फिके दिसू लागले. “महाराष्ट्रीय चतुरस्त्रता” सांभाळणारे संख्येने कमी होऊ लागले. काही धडपडणारे योद्धे ‘किंकर्तव्यविमूढ’ झाल्यासारखे दिसतात. या धडपडणाऱ्यांमध्ये व्यवस्थेने बहुदा निर्माण केलेला संभ्रम त्यांना एकत्र येऊ देत नाही की स्वनिर्मित ‘कोषबद्ध’ अवस्थेमुळे ते ‘एकी’कडून ‘बेकी’कडे प्रवास करताहेत ? महाराष्ट्रीय समाजाने हा अवघड, थोडासा नावडता पण तितकाच आवश्यक असा स्वयंमूल्यमापनाचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वी एखाद्या व्यापारी समाजाची तुलना जेव्हा मी महाराष्ट्रीय समाजाशी करायचो तेव्हा येथील ‘भूमीपुत्रां’च्या सामाजिक व सांस्कृतिक सौष्ठवाचं मी भरभरून कौतुक करायचो. अलिकडच्या काळात मात्र या दोन समाजातील आर्थिक फरक वेगाने कमी होत असताना महाराष्ट्रीय समाज आपलं सामाजिक व सांस्कृतिक सौष्ठव आस्तेकदम हरवू लागलाय असं प्रामाणिकपणे वाटतं. आर्थिक सुबत्ता ही हवीच पण महाराष्ट्राचं वेगळेपण असणारी ‘चतुरस्त्रता’ अशी रोज थोडी थोडी कमी होताना मी जेव्हा पहातो तेव्हा मन क्षणभर विषण्ण होतं. हां, माझ्यातलं शंभर नंबरी ‘मराठीपण’ मी शाबूत ठेवलंय जे रोज मला महाराष्ट्रीय चतुरस्त्रतेची आठवण करून देतं. हा लेखन – प्रपंच याचसाठी ! बाकी चुकभूल देणेघेणे !!
ई-मेल – girishjakhotiya@gmail.com
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld per IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.