डॉ. गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो ! नाताळच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
‘शंकर’ आठवला की ‘ओम नमः शिवाय’ हा मुलभूत मंत्र, महाशिवरात्री व लिंगोपासना इ. महत्त्वाच्या गोष्टी आठवतात परंतु खोलात जाऊन आम्ही या महागणनायक व महावैज्ञानिक असणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय ‘महादेवा’बद्दल फारशी माहिती घ्यायचा प्रयत्न करत नाही. मी अगदी लहानपणापासून शंकराला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. शंकर – शिव – महेश – महादेव – महेश्वर इत्यादी अनेक नावांनी पूजला जाणारा हा “देवाधिदेव” मला भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा खोलवर मागोवा घेताना अधिकाधिक समजत गेला. हां, भारतीय उपखंडातील या महानायकाला समजून घेण्याची माझी ही प्रक्रिया अजून चालूच आहे. प्राचीन काळात मोठी समस्या उद्भवली की अंतीम सल्ला हा महादेवाचाच असायचा. संकटातून सोडवणूक करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले की शेवटी शंकरच त्या संकटातून मुक्तता करायचा. भारतीय उपखंडात उत्तर ते दक्षिण आणि पश्चिम ते पूर्व ज्याचं दर्शन सर्वत्र होतं नि ज्याची आराधना कोणताही भेदाभेद न बाळगता सारेच करतात, तो “शंकर” विवेकाने समजून घ्यायला हवा. मनोभावे प्रार्थना केली की हा भोलेनाथ प्रसन्न होतो ही सर्वसाधारण धारणा – श्रद्धा सहस्त्रो वर्षांची आहे. या धारणेचा गाभा आपण समजून घ्यायला हवा.
माझ्या तार्किक विश्लेषणानुसार शंकर हा गणनायकांचा महानायक होता. शंकरासोबतचे गण पाहिले की “गणतंत्रा”ची जाणीव होते. गणांमध्ये लोकशाही तत्वांची अंमलबजावणी केली जायची. प्रत्येक गणपती अथवा गणनायक हा आपल्या गणाचे ज्ञानाधारित असे कार्यव्यवस्थापन पहायचा. बऱ्याच ठिकाणी गणनायिकाही असायच्या. स्री – पुरुष समानतेच्या धोरणामुळे (मातृसत्ताक वा स्रीसत्ताक व्यवस्थेचा आधार) शेती, नगर व्यवस्थापन, वाणिज्य, ज्ञानोपासना इ. महत्वाच्या क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीने असायचा. या संपूर्ण प्रगल्भतेचे दर्शन आपणांस सिंधूजनांच्या संस्कृतीमध्ये दिसून येते. “अर्धनारीनटेश्वर” हे नामाभिधान या स्री – पुरुष समतेचे द्योतक आहे. गणांमध्ये दिसणारा “नंदी” हा कृषिसंस्क्रुतीचं प्रतीक म्हणून नेहमीच आपल्यासमोर येतो. मोहेंजोदडो – हरप्पाच्या उत्खननात व अन्यत्र शैवसंस्क्रुतीचा सूचक म्हणून हा बैल ठळकपणे दिसतो. भारतातील माहेश्वरी समाजात “पिंडोपासना” ( पिंड + उपासना) ही ‘बडी तीज’ या उत्सवात केली जाते जी अर्धनारीनटेश्वराचे उत्कट आराधन पती – पत्नीने मिळून करण्याची एक अध्यात्मिक प्रक्रिया असते. शंकर आणि पार्वती या आदर्श जोडप्याने प्रपंच आणि अध्यात्म यामधील अत्त्युच्च संतुलन साधलेले होते. एक प्रकारचा हा आसक्ती ( Attachment) आणि विरक्ती (Detachment) यामधील आदर्श समतोलच म्हणावा. आमच्याकडे “ब्रम्हचारी” साधकाला वा नेत्याला वारेमाप महत्त्व दिले जाते. काही ब्रम्हचारी गुरु तर नेटका प्रपंच कसा करा यावरही सल्ले देत असतात. लाखो साधकांचा ‘गुरू’ असणारा शंकर हा पार्वतीसोबत उत्तम प्रपंच करायचा.
शंकराला ‘भोलेनाथ’ म्हणण्याचा प्रघात मी तपासला. शंकर हा त्या काळातील “महावैज्ञानिक” मानला जायचा. शंकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वैज्ञानिक संशोधनाची परंपरागत अशी संस्थाच चालवलेली असणार. अस्सल ज्ञानोपासक हे जाती – धर्म – पंथ – प्रांत यांच्या पलिकडे गेलेले असतात. त्यांची अव्याहत चालणारी ज्ञानसाधना ही कोणत्याही चौकटीत बंदिस्त नसते. योगशास्त्र, तंत्रशास्त्र, युद्धशास्र, कला – नृत्य, आरोग्यशास्र इ. अनेक शास्रांमधील संशोधनांचा उद्गाता हा ‘शंकर’ होता. यास्तव भेदाभेद न पाळता ज्ञानोपासना (तपश्चर्या) करण्यास उत्सुक असणाऱ्या प्रत्येकाला शंकराच्या या अलौकिक संस्थेत प्रवेश मिळायचा. महादेवाच्या ज्ञानाचा लाभ घेणारे परशूराम विख्यात आहेतच. कृष्णाच्या सल्ल्यानुसार अर्जुनही शंकरास भेटून अद्ययावत युद्धशास्र शिकला. रावणानेही याच शंकराच्या संस्थेत भरपूर कष्ट करीत नाना कला प्राप्त केल्या. याच रावणाने मग आपल्या या गुरुच्या गौरवार्थ “शिवतांडव स्तोत्र” रचले जे अभूतपूर्वच म्हणायला हवे. इक्ष्वाकू वंशातील रामानेही रामेश्वरमला शंकराची प्रार्थना केली होती. पाणिनीने चौदा शैवसूत्रे ( महेश्वर सूत्रे) वापरून संस्कृतचे पक्के ( Prescreptive ) व्याकरण बनवले होते. ज्ञानाचं असं मुक्त वाटप कोणत्याही अपेक्षेविना करणारा शंकर हा मतलबी लोकांना “भोळा शंकर”च वाटणार !
शंकराच्या या असिमित ज्ञानाचा चतुरस्त्र प्रभाव हा आसेतुहिमाचल असा होता. परंतु आजच्या २१ व्या शतकातील पेटंट्स आणि कॉपीराईट्स मध्ये तो बांधला गेलेला नव्हता. मुक्तहस्ते आपल्या ज्ञानाचे वाटप करणारा हा महावैज्ञानिक शंकर म्हणूनच बहुतेकांना प्रचंड भावतो. युद्धशास्राचा गुरु असलेला हा शंकर महाराष्ट्रात “हर हर महादेव” आणि राजस्थानात “जय एकलिंगजी”च्या जयघोषाने आठवला जातो. बाराव्या शतकातील संत बसवण्णानी ज्ञानप्रिय शंकराला नीटपणे जाणले होते. यास्तव त्यांनी “ईष्टलिंगा”ची संकल्पना मांडली. चराचराला व्यापणाऱ्या त्या ज्ञानाधारित शैवतत्वाला म्हणूनच बसवण्णांनी मंदिरात आणि मूर्तीत बंदिस्त नाही केले. लिंगोपासकांसाठी बसवण्णांनी शंकराचे ईष्टलिंग स्वरूप मांडले जे लिंगायत तत्वज्ञानाचा आधार बनले. बसवण्णांना हे माहीत होते की भव्यदिव्य मंदिरातील शंकराचे दर्शन शूद्रांना मिळणार नाही. यास्तव चराचरात ज्ञानस्वरूपाने व्यापलेल्या शंकराच्या अस्तित्वाची अनुभूती त्यांनी आपल्या “वचनां”मधून सामान्य लोकांना दिली. त्यांच्या अनुभव मंटपात सर्व जातींचे स्री – पुरुष येऊन शिवतत्त्वावर खुली व उपयोगी चर्चा करीत असत.
सांख्य या नास्तिक तत्ववेत्त्याने आयुष्यातील चार आश्रमांच्या टप्प्यांची व तीन मानवी गुणांची प्रभावी मांडणी केली होती. शंकर व पार्वती या जोडप्याच्या अद्वैताने सांख्यसुद्धा प्रभावित झाला असणार. पुरुष व प्रकृतीची सैद्धांतिक मांडणी करताना “शिव + शक्ती”या आदर्श युगुलाचे उदाहरण त्याच्या डोळ्यासमोर असणार. आयुष्य आनंदी, समाधानी व उच्चतम कोटीच्या सामंजस्याने बनते जर “स्री – पुरुष समानता” कार्यरत असेल तर. नंतरच्या काळात चातुर्वर्ण्यव्यवस्थेतील शूद्र व स्रियांच्या अत्यंत वाईट अवहेलनेमुळे भारतीय उपखंडात या समानतेला व सामाजिक सौख्याला तडे गेले. चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या या विनाशी मांडणीने भारत कमजोर झाला. बाहेरच्या आक्रमकांनी याच कमजोरीचा फायदा उचलला. आजही आम्ही महावैज्ञानिक शंकराचे ज्ञान विवेकी पद्धतीने लक्षात घेत नाही व आत्मसात करत नाही. आम्ही अवडंबर, पुस्तकी पोपटपंची, काल्पनिक प्रतिके व प्रतिमा आणि काल्पनिक चमत्कारांमध्ये अडकून राहतो. चमत्कारांच्या अहंकाराने व अंधश्रद्धांनी वैज्ञानिक संशोधन होत नसते. चमत्कारांच्या वल्गनांनी फक्त ‘विश्वगुरु’ बनण्याच्या घोषणा करता येतात. आत्मप्रौढी व आत्मवंचनेच्या गराड्यातून आम्ही तात्काळ बाहेर यायला हवे. प्रत्येक समस्येच्या उत्तरासाठी जसे सारे भारतीय त्या काळात शंकराकडे यायचे, त्याच शंकराची ज्ञानाधारित कामगिरी आमची आज व्हायला हवी. यासाठी अहंकार व अंधश्रद्धा सोडून ज्ञानार्जनाचे प्रखर सामूहिक प्रयत्न आम्ही केले पाहिजेत. हे फक्त भूतकाळात रमून होणार नाही. सर्वसाधारणपणे भारतीय पीएचड्यांचा आजचा दर्जा (काही अपवाद सोडता) पाहिल्यास प्रामाणिक कष्टाची कमतरता खूप जाणवते. शंकराचा वारसा आम्ही पुन्हा मिळवायला हवा.
शंकर अर्जुनाला किराताच्या स्वरूपात भेटतो. शंकराचं बाह्यदर्शन खूपच लोभसवाणं आहे, जे “साधी रहाणी, उच्च विचारसरणी”चं दर्शन घडवतं. शंकराच्या तिसऱ्या डोळ्याबद्दल खूप बोललं जातं. ती त्याची “ज्ञानदृष्टी”च म्हणायला हवी. प्रचंड पराक्रमी नागवंशीय सुद्धा शंकरालाच आपला गुरु मानायचे. ‘अशोक सुंदरी’ ही शंकर – पार्वतीची कन्या महाराज नहुशाची पत्नी होती. त्यांचा पुत्र ययाती आणि ययातीचा पुत्र यदू. याच यदूवंशात कृष्णाचा जन्म झाला. म्हणजे कृष्णाचे मातुल संबंध अगदी शंकरापर्यंत जाऊन पोहोचतात. कृष्णसुद्धा विवेकवादी व विज्ञानवादी होता. आयुष्यभर त्याने चातुर्वर्ण्यव्यवस्थेला प्रखर विरोध केला व स्री – पुरुष समानतेवर भर दिला. ज्यांनी ज्यांनी शंकराला विवेकानं समजून घेतलं आणि त्याचा ज्ञानाधारित मार्ग स्विकारला त्यांनी त्यांनी समाजाचं ज्ञानाधिष्ठित नेतृत्व केलं. खरे ज्ञानी लोक अलिप्त आणि आपल्याच ज्ञानसाधनेत आनंदी असतात. दिखाऊगिरी, कपट, ढोंगीपणा, लपूटगिरी, अहंकार, खोटारडेपणा, भिती, नैराश्य, सर्व प्रकारचे भ्रष्टाचार इ. वाईट गोष्टी व वाईट गुण अशा ज्ञानसाधकांपासून कोसो दूर असतात. आजचे बहुतेक नोबेल पुरस्कार विजेते पाहिले तर ते असेच अथांग ज्ञानसागरात स्थिरचित्ताने पोहणारे वाटतात. आज जगाला आणि विशेषतः भारताला शंकराच्या “ज्ञानयोगा”ची नितांत गरज आहे !
श्री जाखोटिया नमस्कार,
आपले भगवान शंकरावरील विश्लेषण आवडले.भगवान शंकराचे आपण केलेले वर्णन बरोबर आहे.साधी राहणी आणि प्रचंड शक्तिशाली महादेव आहे.त्याच्या तिसऱ्या नेत्रात हजारो अणू बॉम्बची शक्ती सामावलेली आहे.तरीही महादेव शांत असतो.शंकराने वर देताना कधीही हा राक्षस,देव,ऋषी,मानव, स्री,पुरुष असा भेदभाव केलेला नाही.यावरूनच तो सर्व श्रेष्ठ देव असल्याचे सिद्ध होते.जगाला नष्ट करू पाहणाऱ्या विषाचे प्रश्न करून शंकर देवेश्वर ठरतो.