डॉ. गणेश नानासाहेब गोळेकर
महापुरुष ही आपल्या आराध्य दैवते. राज्याच्या, देशाच्या अस्मितेचे परमोच्च मानबिंदू व प्रतीके आहेत. छत्रपती शिवराय हे आपल्या नसानसात स्फुल्लींग बनून आहेत. आपल्या रक्ताचे पाणी आणि हाडाची काडे करून, अहोरात्र राबून, प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन मावळ्यांनी ही स्वराज्याची दौलत उभी केली आहे. अठरापगड जाती-जमातींना सोबत घेऊन हे महाकाय साम्राज्य छत्रपतींनी विस्तारले. हे करताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये याची काळजी घेणारे शिवराय. शिवरायांचे नाव उच्चारताच आपला माथा आदराने लवतो. हात कृतज्ञतेने जोडले जातात. आणि ओठावर शब्द येतात, “दिव्यत्वाची जेथ प्रचिती,तेथ कर माझे जुळती……” काय कारण की इतकी वर्ष झाली तरी शिवराय आपल्या हृदयात विराजमान झाले आहेत ? अशा गौरवशाली इतिहासाला नावे ठेवण्याची, तो खोटा सांगण्याची आज काल जनू स्पर्धाच लागली आहे. इतिहास वादात कसा सापडेल याची पुरेपूर काळजी काही मंडळी घेताना दिसून येत आहेत. अलीकडील काळात शाहू, फुले, आंबेडकर यांसारख्या महापुरुषांचा अवमान करायचा आणि प्रसिद्धी झोतात यायचे हे समीकरणच बनले आहे. महापुरुषांची बदनामी होईल अशी लेखणी चालवणाऱ्या किंवा त्यांना मदत करणाऱ्या विकृतींनी धंदाच मांडलाय. महान, तेजोवलयी इतिहास मोडून-तोडून माथी मारण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. कुठल्यातरी कपोलकल्पित साधनांचा आधार घेऊन दैदीप्यमान इतिहासाची वेगळी मांडणी करण्याचा तोकडा प्रयत्न करीत आहेत. मात्र या प्रवृत्तींना रोखण्यासाठी, समाजातील दुफळी थांबवण्यासाठी आजचे कायदे कमी पडत आहेत. अशा विकृतींवर कार्यवाही करण्यासाठी, महापुरुषांची बदनामी थांबवण्यासाठी कडक कायदा असलाच पाहीजे.
काही बाबींचे निरीक्षण केले असता जाणूनबुजून हे होत आहे असे म्हणण्यास वाव आहे. इतिहासाचा ‘इ’ माहीत नसलेली काही लोकं आपल्या बुद्धीच्या कुवतीपेक्षा जास्त बोलतात, तेंव्हा आपण काय आणि कोणाबद्दल बोलतो याचे भान त्यांना राहत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांचा नंगानाच सुरू आहे. अनेक वेळा बहुजनांच्या आराध्य दैवतांची बदनामी करण्याचे षडयंत्र घडते. त्यातोडीचे उत्तर मिळाले की, अपमानित होऊन माफी मागून मोकळे व्हायचे हे नेहमीचेच झाले आहे. अनेक वेळा महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना केली जाते. प्रतिमांची नासधूस केली जाते, ध्वजांची विटंबना केली जाते, अशा समाजकंटकांवर विशेष कठोर कायद्याद्वारे प्रतिबंध केला पाहिजे. इतिहासाच्या साधनांवर पोट भरणाऱ्या काही विकृती इतिहासच बदलायला निघाल्या आहेत, नव्हे जाणूनबुजून वाद वाढतील, माती भडकतील असा चिथावणीखोर खोटा इतिहास सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे.
जेम्स लेन प्रकरण:-
जेम्स डब्ल्यू लेन हा मूळ अमेरिकन लेखक व प्राध्यापक. मिनेओस्टा नावाच्या राज्यात मॅक्यालेस्टर कॉलेजच्या धार्मिक अभ्यास केंद्राचा तो प्रमुख. धर्मांचा अभ्यास करण्यासाठी तो भारतात आला. “शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया” असे भारतातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एक पुस्तक पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मदतीनं प्रकाशित केले. या पुस्तकात लेनने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अत्यंत अवमानकारक लिखाण केले आहे. शिवप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल अशा प्रकारचे घाणेरडे आरोप जिजाऊ आऊसाहेबांवर लावण्यात आले. या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्र पेटून उठला. राज्यातील देशातील विविध भागात त्याचे पडसाद उमटले. काही राजकीय नेत्यांनी निषेध केला. महाराष्ट्राच्या विधीमंडळात घनघोर चर्चा झाली. राज्य सरकारने त्यावर बंदी घातली. पुस्तक प्रकाशित करणाऱ्या न्यूयॉर्कमधील ऑक्सफर्ड प्रकाशनाने भारतीय समाज भावनेचा आदर करीत माफी मागितली व पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र लेखक लेनने माफी मागितली नाही. 1 सप्टेंबर 2003 रोजी बळवंत पुरंदरे यांनी जनता बँक व्याख्यानमालेत या पुस्तकाचे भरभरून कौतुक केले. नंतर काही इतिहासकारांनी या पुस्तकाला विरोध करण्याचे ठरवले, त्यावेळी मात्र बळवंत पुरंदरे यांनी त्या पुस्तकास विरोध करणाऱ्या पत्रकावर स्वाक्षरी केली. याच पुरंदरेने आपल्या राजा शिवछत्रपती या पुस्तकात मराठा समाज आणि मराठा स्त्रियांची बदनामी केलेली आहे. श्रीकांत बहुलकर भांडारकर संस्थेचे संशोधक व मानद सचिव होते. लेन च्या एका पुस्तकाचे सहलेखक देखील होते. बहुलकर यांनी लेनला संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगण्यासाठी मदत केली. याचा राग येऊन शिवसेनेचे शाखाप्रमुख रामभाऊ पारेख यांनी दि.22 डिसेंबर 2003 रोजी बहुलकरांच्या तोंडाला काळे फासले. मात्र राज ठाकरे यांना ते रुचले नाही. त्यांनी 27 डिसेंबर 2003 रोजी बहुलकर यांची फोनवरून वेळ घेऊन सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या घरी जाऊन माफी मागितली व पारेख यांना पदावरून काढून टाकले. एक मात्र खरे धर्मशास्त्राच्या अभ्यासकास विषयाची कलाटणी करायला लावणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींनी हे कारस्थान घडवून आणले. जेम्स लेनला भारतात फरफटत आणतो असे म्हणणाऱ्या तत्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी लेन समर्थकांनाच संरक्षण पुरवले.तर 72 मावळ्यांवर कारवाई केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने पुरंदरेला संरक्षण पुरवले. उस्मानाबाद मधील उमरग्यात अडवाणीच्या रथयात्रेत मावळ्यांनी त्याचा जाब विचारला. वाजपेयींनी तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या पुस्तकावरची बंदी झुगारून लावली. याचा राग येऊन मावळ्यांनी 20 मार्च 2004 रोजी ची बीड मधील सभा उधळली.
शिवजयंतीचा वाद:-
शिवरायांचा जन्म कोणत्या तारखेला, तिथीला तसेच कोणत्या वर्षी झाला यावरूनही वेगवेगळे विचारप्रवाह दिसून आले. शिवजयंती नक्की कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती होती, हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1966 साली एक समिती स्थापन केली. दत्तो वामन पोतदार, न.र. फाटक, आ.ग.पवार, ग.ह.खरे, वा.सि.बेंद्रे, ब.मो.पुरंदरे, मोरेश्वर दिक्षित यांचा या समितीत समावेश होता. या समितीने 19 फेब्रुवारी 1630 या शिवजन्म तारखेवर शिक्कामोर्तब केले. राज्य विधिमंडळाने त्यास मान्यता दिली. तरीही या समितीतील एक सदस्य ब.मो.पुरंदरे यांनी कालनिर्णयकार जयंत साळगावकर यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे पत्र दिले. तारीख अंतिम करण्यात सदस्य असलेल्या समिती सदस्याने तिथीचा आग्रह का धरावा, असा प्रश्न सर्वसामान्य शिवभक्त म्हणून आम्हाला पडतो.
जय भगवान गोयलांचे पुस्तक :-
छत्रपती शिवराय हे एकमेवाद्वितीय. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे कार्य निश्चितच चांगले आहे. मात्र दिल्लीतील जय भगवान गोयल नामक व्यक्तीने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ अशा प्रकारचे पुस्तक प्रकाशित करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. मोदी यांची तुलना शिवरायांची करण्याची आवश्यकता नव्हती. अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे. या पुस्तकावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर गोयल यांनी माफी मागितली आणि पुस्तक मागे घेतले.
फडके प्रकाशनाचा प्रताप
‘मराठ्यांचा इतिहास’ या व इतर दोन विषयांच्या पुस्तकांमध्ये फडके प्रकाशनाने छत्रपती संभाजी राजे यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केला. शिवप्रेमी आक्रमक होताच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी फडके प्रकाशनास त्या पुस्तकांची विक्री थांबविण्यास सांगितले. प्रकाशनास त्याचा जाब विचारला असता त्यांनी माफीनामा लिहून दिला. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित पुस्तकांची विक्री थांबवावी, विद्यापीठाची नावे असलेली आक्षेपार्ह मजकुराची सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत अशा प्रकारचा आदेश दिला. यापुढे शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा वापर करून महापुरुषांची बदनामी होईल असा कोणताही मजकूर प्रसिद्ध करण्यात येणार नाही याची खबरदारी घेण्याचे सांगितले आणि त्यासंबंधी केलेली कार्यवाही विद्यापीठास कळवावी अशी तंबी दिली.
सर्व शिक्षा अभियानाद्वारे अवमान:-
शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी राजांचा उल्लेख ‘दारुड्या’ ‘कलशाच्या कळपात सामील झालेला’ असा करण्यात आला. राज्यातील शिवप्रेमींनी यावर आक्षेप घेत तीव्र संताप व्यक्त केला. संतापाची वाढत असलेली तीव्रता लक्षात येताच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यात कोठेही हे पुस्तक वितरित न करण्याचे आदेश दिले.
सर्व शिक्षा अभियानातील ‘संतांचे जीवन प्रसंग’ या गोपीनाथ तळवलकर यांच्या पुस्तकात संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीची बदनामी करणारा लिखाणं असलेले पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकात तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम शिव्याच बाहेर यायच्या,असे गलिच्छ लिखाण करण्यात आले.
‘सद्गुणांच्या गोष्टी’ या प्रभाकर चौधरी लिखित पुस्तकात रामदास शिवरायांना म्हणतात,”सारं राज्य मला देऊन टाकल्यावर तुम्ही काय करणार……… ?” शिवाजी महाराज म्हणाले,” मी तुमच्या सोबत येईन, भिक्षा मागेन” आणि राजांनी डोक्याचा पटका सोडून त्याची झोळी केली, असा कपोलकल्पित आणि अवमानकारक उल्लेख या पुस्तकात करण्यात आला. परत परत त्या चुका मुद्दामहून होतातच कशा ?
अशा घाणेरड्या लिखाणाला शासनाचा सर्व शिक्षा अभियान कसा काय प्रसिद्धी देतो. शासनाचा सर्व शिक्षा अभियान हा मानवी बिंदूंची बदनामी करणारा अभियान आहे काय. अशी लेखक अवमानकारक लिखाण लिहितात, वाद निर्माण झाला माफी मागून मोकळे होतात. हे किती दिवस चालायचं.
मावळ्यांची विटंबना:-
अलीकडील काळात मोठेपणाचा डामडोल मिरवण्याची हौस झाली आहे. मात्र ही हौस भागवताना कोणाचा अवमान होतो काय? हे पाहण्याचे भान राहत नाही, हे दुर्दैव आहे. शिवरायकालीन मावळ्याच्या वेषातील पोषाखाचा लग्नसमारंभात वापर करीत जेवण वाढणारे वाढपी (वेटर) हे चहापाणी, जेवण वाढताना पाहून कोणत्याही स्वराज्यप्रेमी व्यक्तीला चिड येणारच. स्वराज्यात मावळ्यांना अत्यंत मानाचे स्थान देणारे छत्रपती शिवराय कुठे? आणि मावळ्यांचा अवमान करणारे स्वराज्यद्रोही कुठे?
कॉमेडियनचा प्रताप :-
स्वयंघोषित विनोदवीर (स्टैंड अप कॉमेडीयन) अग्रीमा जोशुआ आणि सौरभ घोष नावाच्या पांचट विनोद वीराने महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि बहुजनांचे जीव की प्राण असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून विनोद सादर केले. शिवरायांच्या पुतळ्याचे विडंबन सादर करून विनोद केला. यात तिने शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. पैसे कमावण्यासाठी महाराजांचा अशारितीने वापर होत असेल तर ते निश्चितच निंदनीय आहे.