डॉ. फरहान इंगळे
कोरोना व्हॅक्सीनचा पहिला आणि दुसरा डोस यांमध्ये किती अंतर असणे योग्य आहे याचा विचार करताय? भारताच्या लसीकरण कार्यक्रमानुसार कोव्हिशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असावे असे सांगण्यात आले आहे, मात्र जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अभ्यासानुसार आणि अनेक वैज्ञानिकांच्या मते हा कालावधी आणखी लांबवून 8-12 आठवडे लांबवला जायला हवा. अलीकडेच नॅशनल टेक्निकल अडव्हायसरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) ने भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोव्हिड लसींच्या दोन डोसेसमधील कालावधीबद्दल चर्चा करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती. सध्याच्या योजनेनुसार कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीनयांचा दुसरा डोस हा 28 दिवसांच्या अंतराने दिला जातो. असे असले तरीही या लसींच्या परिणामकारकतेबद्दल सुरू असलेल्या संशोधनांतून हाती आलेल्या नव्या पुराव्यांनुसार दुसरा डोस 8- 12 आठवड्यांनंतर दिला तर या लसीची परिणामकारकता अनेक पटींनी वाढते. इंटरनेटवर तर कोरोना लसीकरणाविषयीच्या माहितीचा अक्षरश: महापूर आला आहे, त्यामुळे गोंधळून जाणे स्वाभाविक आहे.
आतापर्यंत देशभरात 3.21 दशलक्ष लोकांना लस देण्यात आली आहे आणि अनेकांनी दुसऱ्या डोससाठी आपले नाव आधीच नोंदवले आहे. या पॅनडेमिकच्या काळात तग धरून राहताना आवश्यक बाबींची माहिती करून घेणे, त्याबद्दल सजग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लस घेणे किती महत्त्वाचे आहे? कोरोनाची लस घेणे हा या आजारापासून संरक्षण मिळविण्याचा अधिक सुरक्षित मार्ग आहे. तुम्ही आजारी पडलात, तर तुम्ही आपल्या मित्रपरिवारात, कुटुंबियांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये व तुमच्या अवतीभोवतीच्या इतरांमध्ये हा आजार पसरवू शकता. दुसऱ्या बाजूला लसींमुळे तुमच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार व्हायला मदत होते आणि संसर्गाची साखळी तोडण्यामध्ये त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतामध्ये उपलब्ध असलेल्या कोवॅक्सीन आणि कोव्हिशील्ड या लसी परिणामकारकता चाचण्यांच्या आणि चिकित्सेच्या अत्यंत खडतर प्रक्रियेमधून गेलेल्या आहेत व त्यांना सार्वजनिक स्तरावर वापरण्यासाठीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे. या लसी सुरक्षित आहेत आणि आपल्या फिजिशियनचा सल्ला घेतल्यानंतर त्या घ्यायला हव्यात.
लसीकरणातील अंतराविषयी विविध देशांमध्ये मतमतांतरे असण्याचे कारण इथे नोंदविण्याजोगी पहिली गोष्ट म्हणजे लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात अँटी-बॉडीज तयार होण्यासाठी 2-3 आठवड्यांचा कालावधी लागतो. पहिल्या डोसनंतर अँटीबॉडीज तयार होण्याचा वेग धीमा असतो पण दुसरा डोस घेतल्यानंतर या प्रक्रियेला वेग येतो. म्हणूनच किमान 28 दिवसांचे अंतर हे योग्य आहे. अनेक देशांमध्ये 3 महिन्यांचे अंतर राखले जात आहे, जेणेकरून त्यांच्या देशातील अधिकाधिक व्यक्तींचे लसीकरण व्हावे. भारतामध्ये आपला दृष्टिकोन वेगळा आहे. आपल्या लोकसंख्येचा आकार लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचा मार्ग निवडण्यात आला आहे आणि लोकांना सुनियोजित वेळेत लस मिळेल अशी आशा आपण बाळगून आहोत. पहिला आणि दुसरा डोस यांमध्ये किती अंतर असायला हवे? लक्षात ठेवा, लसीचा पहिला डोस घेतला याचा अर्थ तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होणार नाही असा नाही. दुसरा डोस घेतल्यानंतरही तुम्हाला कोरोनाची बाधा होऊ शकते, पण त्याची लक्षणे अत्यंत सौम्य असतील आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासणार नाही. असे असले तरीही सर्वकाळ दक्षता बाळगावीच लागणार आहे. बाहेर जाताना मास्क लावणे, गर्दीच्या, गजबजलेल्या ठिकाणी जाणे टाळणे आणि स्वच्छता व आरोग्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. जिथे आपल्या भोवतीच्या माणसांचे लसीकरण झाले आहे किंवा नाही याची माहिती नसेल अशा ठिकाणी प्रवास करणे अद्यापही जोखमीचे आहे.
लस घेतल्यानंतर तुम्हाला वेदना, हलका ताप, थकवा, शरीर दुखणे इत्यादी सर्वसाधारण साइड-इफेक्ट्स जाणवू शकतील. तेव्हा भरपूर द्रवपदार्थ घ्या, लस घेतलेल्या ठिकाणी स्वच्छ, थंड आणि ओल्या कपड्याने पुसून घ्या. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घ्या, चांगली झोप घ्या, मद्यमान, धूम्रपान करणे आवर्जून टाळा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपण या भीतीदायक विषाणूपासून सुरक्षित आहोत असे समजू नका, काळजी घेतली नाही तर लसींचे दोन्ही डोस घेऊनही तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील इंटरनल मेडिसीन विभाग संचालक डॉ. फरहान इंगळे