मुक्तपीठ टीम
नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधांच्या विकासासाठी मी वचनबद्ध असून केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.
तळोदा येथील आदिवासी विकास भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खा.डॉ.हीना गावित, आ.राजेश पाडवी, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. डॉ.अशोक उईके, जनजातीय राज्यक्षेत्र संपर्कप्रमुख किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी आदी उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाल्या की, नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात. राज्य सरकारने याकडे त्वरीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या आदिवासी कल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास करण्यावर अधिक भर देईन.
या यात्रेदरम्यान डॉ. पवार यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. माजी वनमंत्री स्वर्गीय दिलवरसिंग पाडवी यांच्या समाधीस भेट देऊन अभिवादन केले. खापर, अक्कलकुवा मार्गे गुजरात राज्यातील देवमोगरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर दोंडाईचा येथे गिरीश महाजन, आ.जयकुमार रावल, आ.काशीनाथ पावरा, धुळे ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले.