मुक्तपीठ टीम
अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासोबतच रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस होमप्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. परंतु, रेल्वे लाईनच्या हद्दीलगत असलेल्या दोन्ही बाजूस म्हणजे पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बीकेबीन कडे जाणारा रस्ता आणि पश्चिम येथील स्टेशन पासून ते कल्याण – बदलापूर कडे जाणारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. या डी.पी. रस्त्यांचे काम झाल्याशिवाय ट्राफिकची समस्या दूर होऊ शकणार नाही. यासाठी डी.पी.रस्त्यांचे काम तसेच डी.पी. रस्त्यावरील घरांच्या बांधकामाचे एस. आर. ए. योजनेंतर्गत पुनर्वसन करणे यासंदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी बैठक घेतली.
अंबरनाथ वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कृती आराखडा
• शहरातील पूर्व भागातील रेल्वे हद्दीलगत असलेल्या बॉम्बे हॉटेल पासून जी.बी.के. कार्यालयाच्या मागील बाजूने बी केबीन रोडवरील हनुमान मंदिराकडे जाणारा डी.पी. रस्ता,
• पश्चिम भागातील रेल्वे हद्दीलगतच्या स्वामी नगरपासून ते कल्याण – बदलापूर रोड कडे जाणाऱ्या डी.पी. रस्त्याचे काम करण्यात आल्यास रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूस होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकेल.
• रहदारीकरिता ही जागा उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या सोयीचे होऊ शकेल.
• याकरिता नगरपालिकेच्या डी.पी. रस्त्यावरील बांधकामाचे एस.आर.ए. योजनेंतर्गत पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सर्वे करून अहवाल तयार करण्यात यावा तसेच शहरातील दोन्ही बाजूची ट्राफिक समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार डॉ. किणीकर यांनी दिल्या.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख परशुराम पाटील, पुरषोत्तम उगले, गणेश कोतेकर, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, रवी पाटील, सुनिल सोनी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, शहर अभियंता अशोक पाटील, सहायक नगररचनाकार प्रकाश मुळे, राजेंद्र हेले आदि उपस्थित होते.