मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या खोलीत छुपे कॅमेरे लावल्याची घटना समोर आली होती. ही घटना समोर येताच संबंधित महिला डॉक्टरनं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात तपास करत छुपे कॅमेरे लावणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरला अटक केली आहे. महिलेच्या बाथरुम आणि बेडरुममध्ये स्पायकॅम लावण्याचं विकृत कारस्थान या डॉक्टरचेच असल्याचे उघड झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉक्टरचे विकृत प्रताप
- डॉ. सुजित जगताप (वय ४२) असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. या डॉक्टरांने छुपे कॅमेरे बल्ब अमेझॉनवरून मागवल्याचे तपासात समोर आले आहे.
- हा प्रकार ६ जुलै रोजी उघडकीस आला होता.
- आरोपी डॉक्टर हा एम. डी. असून न्युरोलोजी स्पेशालिस्ट आहे.
- तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात त्याचं स्वत:चं क्लिनिक आहे.
- पोलिसांनी संबंधित डॉक्टरची विकृती उघडं पाडून त्याला गजाआड केलं आहे.
- न्यायालयाने डॉक्टरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिला डॉक्टरच्या सतर्कतेमुळे उघड झालं विकृत कारस्थान
- पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणारी पीडित महिला डॉक्टर या खोलीत आपल्या आणखी एका महिला सहकाऱ्यासोबत राहते.
- पीडिता सकाळी ८.४५ वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती.
- सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास रुममध्ये परत आल्यावर वेळी त्यांना घरातील वातावरण संशयास्पद वाटलं.
- त्यांनी घरातील कानाकोपऱ्याची पाहणी केली असता त्यांना लाल लाईट चमकत असल्याचं आढळलं.
- महिला डॉक्टरने इलेक्ट्रीशिअनला बोलावलं.
- इलेक्ट्रिशीअन दुरुस्तीसाठी आल्यानंतर त्याने बाथरुममधील बल्बचे होल्डर उघडले असता त्यात छुपा कॅमेरा, मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला.
- यानंतर बेडरुमच्या बल्बमधील होल्डरमध्येही अशाच पद्धतीने छुपा कॅमेरा आढळून आला.
- त्यानंतर पीडित महिलेने ६ जुलै २०२१ रोजी तक्रार नोंदवली होती.
डॉ. नीलम गोऱ्हेंची पीडित महिला डॉक्टरांना मोलाची साथ
- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पीडितांना मिळालेली साथ मोलाची ठरली आहे.
- पुणे पोलीस आयुक्तांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते.
- अशाच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत, याची माहिती मिळावी, याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना नीलम गोऱ्हे यांनी निवेदन सादर केले.
- पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरांना न्याय मिळेल, असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
- आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये, याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महिलांनीच सतत राहावं सजग – डॉ. नीलम गोऱ्हे
- अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याला निश्चितच आळा बसेल असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले होते.
- महिलांनीही सजग राहून सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.