मुक्तपीठ टीम
बंगळुरूस्थित औषध कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेडने कोरोनाच्या काळात डोलो-६५०च्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टरांना १००० कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा आरोप निराधार आणि खोटा असल्याचे म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की, जेव्हा कोरोनाचा संसर्ग खूप होता, तेव्हा कंपनीने केवळ ३५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता आणि अशा परिस्थितीत मोठी रक्कम खर्च करून औषधाचा प्रचार करणे अशक्य होते.
कंपनीचे मार्केटिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष जयराज गोविंदराजू यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात ३५० कोटींचा व्यवसाय करणाऱ्या ब्रँडच्या मार्केटिंगसाठी कोणत्याही कंपनीला १००० कोटी रुपये खर्च करणे अशक्य आहे. केवळ डोलो गोळीचच नाही तर विविध कंपन्यांची इतर अनेक उत्पादनेही कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
ते म्हणाले, हे फक्त डोलो ६५० नाही तर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन कॉम्बिनेशनसारख्या इतर कोरोना प्रोटोकॉल औषधांनी देखील खूप चांगले काम केले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एका गैर-सरकारी संस्थेने (एनजीओ) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) डोलो बनवणाऱ्या एका सुप्रसिद्ध फार्मा कंपनीद्वारे तापावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना डोलो ६५० मिलीग्राम लिहून देण्यासाठी १००० कोटी रुपये भेटवस्तू दिल्याचा आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपाला ‘गंभीर मुद्दा’ म्हणून संबोधले.