मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात संसर्ग तोडण्यासाठी जेव्हा साऱ्यांनाच घरी बसवले जातं तेव्हा पोलीस आणि डॉक्टर मात्र ड्युटीवर असतात. त्यांची कोरोना संकटापासून आपल्या माणसांना वाचवण्याची ड्युटी मृत्यूचा धोका पत्करतही सुरुच असते. देशभरात असे लाखो पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आहेत, जी अशी ड्युटी करत आहेत. पण इंदुरमधील डॉ. राजेश सहाय हे पोलीस उपायुक्त मात्र सर्वात वेगळे आहेत. कारण ते केवळ एक ड्युटी करत नाहीत, तर डबल ड्युटी करत आहेत. दिवसा पोलीस अधिकारी आणि रात्री डॉक्टर अशी त्यांची अहर्निश सेवा सुरु आहे.
इंदूर पोलिसांच्या स्पेशल ब्रॅंचमध्ये एसपी म्हणून तैनात असलेले राजेश सहाय सध्या पोलीस ड्यूटीही करत आहेत त्याचबरोबर डॉक्टर बनून कोरोना संसर्गित रूग्णांवर उपचार करत आहेत. त्यांनी पोलीस सेवेत येण्यापूर्वी एम.बी.बी.एस. आणि एम.डी. या दोन्ही वैद्यकीय पदव्या मिळवल्या होत्या. त्यानंतर ते थेट भरतीतून पोलीस सेवेत आलेत. आता कोरोना संकटात आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर कोरोना रुग्णांसाठी करणे हे ते डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य मानतात. त्यातूनच ते दिवसा पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य बजावतात. त्यानंतर डॉक्टर म्हणून कोरोना रूग्णांवर कोणत्याही स्वार्थाशिवाय उपचार करीत आहेत.
इंदूर पोलिसांच्या फर्स्ट एड सेंटर ते कार्यरत आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांची तेथे भरती केली जाते. या पोलीस लाइनमध्ये पूर्वी फक्त एकच डॉक्टर होता, पण जेव्हा कोरोना रुग्ण झपाट्याने वाढू लागले तेव्हा सहाय यांनी डॉक्टर म्हणूनही कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला. आता डॉ. सहाय यांच्यासाठी रोज कोरोनाने संसर्गित पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपचार हा दिनक्रमाचा एक भाग झाला आहे.
पाहा व्हिडीओ: