लेखिका डॉ. सोनल कुमता / डॉ. मंजिरी मेहता
डब्ल्यूएचओने ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाला जागतिक सार्वजनिक आरोग्य आपत्ती म्हणून आणि त्यानंतर ११ मार्च २०२० रोजी महामारी म्हणून जाहीर केले होते. महामारीमुळे आरोग्यसेवा पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. कोरोना विरोधात लसीकरणामुळे संसर्ग, तीव्रता, संसर्गाचे दीर्घकालीन परिणाम आणि इतर व्यक्तींमध्ये संक्रमित होण्याचा धोका कमी होईल.
सध्या भारतामध्ये कोरोना विरोधात संरक्षक म्हणून कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींचा वापर केला जात आहे. नुकतेच जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शकसूचनांमध्ये सरकारने गरोदर महिलांचे लसीकरण करण्याला मान्यता दिली आहे. हे अत्यंत प्रगतीशील पाऊल आहे. यामुळे भारतातील ५० दशलक्ष जीवनांवर अनुकूल परिणाम होईल. प्रत्येक व्यक्तीला वाढत्या कोरोना संसर्गांपासून संरक्षणाची गरज आहे आणि लसीकरण हा सर्वोत्तम व दीर्घकालीन उपाय आहे. आता सर्व गरोदर महिलांचे कोरोना पासून संरक्षण होऊ शकते. गरोदर महिलांना लस देण्यासंदर्भात लसीकरणाचा कोणताही सैद्धांतिक व विपरित धोका आढळून आलेला नाही.
गरोदर महिलांना माहित असाव्यात अशा काही बाबी:
गरोदर महिलांच्या लसीकरणाची गरज – प्रथम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, प्रसूतीकाळामध्ये कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढत नाही. बहुतांश गरोदर महिलांमध्ये लक्षणे दिसून येणार नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतील, पण त्यांचे आरोग्य झपाट्याने खालावत जाऊ शकते आणि त्याचा गर्भावर परिणाम होऊ शकतो. त्यांनी संसर्ग होण्यापासून संरक्षणासाठी सर्व खबरदारी घेणे देखील महत्त्वाचे आहे आणि निश्चितच कोरोना विरोधात लसीकरण उपयुक्त ठरू शकते. म्हणून सल्ला आहे की, गरोदर महिलांनी कोरोना लस घ्यावी.
गरोदर महिलांवर कोरोनाचा परिणाम – जवळपास ९० टक्क्यांहून अधिक संसर्गित गरोदर महिला हॉस्पिटलमध्ये न जाता बऱ्या होऊ शकत असल्या तरी काही गरोदर महिलांचे आरोग्य खालावत जाऊ शकते. लक्षणे असलेल्या गरोदर महिलांना गंभीर आजार व मृत्यू होण्याचा अधिक धोका आहे. गंभीर आजाराच्या स्थितीमध्ये इतर रूग्णांप्रमाणे गरोदर महिलेला देखील हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. तसेच उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असे आजार असलेल्या व ३५ वर्षांवरील गरोदर महिलांना आजाराचा उच्च धोका आहे.
कोरोना संसर्गामधून बरे झालेल्या गरोदर महिला – कोरोना आजारामधून बऱ्या झालेल्या गरोदर महिला लसीकरणासाठी पात्र आहेत. अशा महिलांनी संसर्ग झाल्याच्या १२ आठवड्यांनंतर किंवा बरे झाल्याच्या ८ आठवड्यांनंतर लस घ्यावी.
लसींचे दुप्परिणाम – उपलब्ध कोरोना लसी सुरक्षित आहेत आणि लसीकरण गरोदर महिलांचे इतर व्यक्तींप्रमाणेच आजारापासून संरक्षण करते. कोणत्याही औषधाप्रमाणे लसीचे देखील दुष्परिणाम असू शकतात, जे सामान्यत: सौम्य असतात. लसीचे इंजेक्शन घेतल्यानंतर गरोदर महिलेला सौम्य ताप, इंजेक्शन घेतलेल्या जागी वेदना होऊ शकतात किंवा १ ते ३ दिवस बरे वाटणार नाही.
गरोदरपणमध्ये कोरोना लस घ्यावी की नाही याबाबत संभ्रमात असाल तर या गोष्टी लक्षात घ्या:
- कोरोना होण्याचा धोका
- गंभीर आजार होण्याचे धोके
- लसीकरणाचे ज्ञात लाभ
- गरोदरपणामध्ये लसीकरणाच्या सुरक्षिततेबाबत मर्यादित, पण विकसित पुरावे
गरोदर महिलांसाठी लसीकरण नोंदणी – सर्व गरोदर महिलांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याची गरज आहे किंवा त्या कोरोना लसीकरण केंद्रावर ऑन-साइट नोंदणी करू शकतात. गरोदर महिलांसाठी नोंदणी प्रक्रिया सामान्य लोकांप्रमाणे आणि एमओएचएफडब्ल्यूने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शकसूचनेनुसार आहे. विशेषत: अॅण्टे–नॅटल (प्रसूतीपूर्व) केअरसाठी नोंदणी केलेल्या गरोदर महिलांसाठी ग्यायनेकोलॉजिस्ट्सनी ऑन-साइट समुपदेशनाची व्यवस्था करणे काळाची गरज आहे. दीर्घकालीन फॉलो-अप व डेटा कलेक्शनसाठी लसीकरण झालेल्या गरोदर महिलांचे नोंदणीपुस्तक देखील ठेवले पाहिजे.
घ्यावयाची खबरदारी
- दुहेरी मास्क घाला.
- वारंवार हात स्वच्छ धुवा.
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
कृपया लक्षात घ्या, गरोदर महिलेला कोरोना आजार होऊन गेला असेल तर तिने प्रसूती झाल्यानंतर लवकरात लवकर लस घ्यावी. तसेच डॉक्टरांशी बोलून सर्व शंकांचे निराकरण करावे. तसेच लक्षात घ्या की, तुम्ही आता किंवा भविष्यात गरोदर राहणार असाल तर आई-वडिल होणाऱ्या पालकांनी कोरोना लस घ्यावी. कोणत्याही लसींबरोबरच कोरोना लसीमुळे महिलांमध्ये किंवा पुरूषांमध्ये वंधत्व येते किंवा गर्भधारणा होण्यामध्ये समस्या निर्माण होतात याबाबत कोणताच पुरावा नाही. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरणामुळे तुम्हाला कोरोना संसर्ग होऊ शकत नाही!
(लेखिका डॉ. सोनल कुमता या मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सीनियर कन्सल्टण्ट ऑब्स्टेट्रिशियन अॅण्ड ग्यायनेकोलॉजिस्ट तर लेखिका डॉ. मंजिरी मेहता या वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल – हिरानंदानी हॉस्पिटलमधील कन्सल्टण्ट गायनेकोलॉजिस्ट अॅण्ड ऑब्स्टेट्रिशियन आहेत.)