मुक्तपीठ टीम
अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या ठाकरे सरकाराच्या अर्थसंकल्पात मराठीची उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते खूपच भावनावश झाले. ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भेटले आणि तू मराठीसाठी काय करून आलास, असे विचारले तर मी काय उत्तर देऊ? असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. शिवसेनेत रावते, कदम या ज्येष्ठ नेत्यांना काहीसे बाजूला केले गेले आहे. त्या उपेक्षेतूनच ही उद्विग्नता व्यक्त झाल्याची शक्यता आहे. याआधी रामदास कदम यांनीही पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तणुकीबद्दल आक्रमक भूमिका घेतली होती.
मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि अर्थसंकल्पात मात्र मराठीसाठी काहीच नाही, अशी जाहीर तक्रारही त्यांनी मांडली.
मनसे हिंदुत्वासोबतच मराठीच्या मुद्द्यावर आक्रमकतेनं सक्रिय होत असताना रावतेंची जाहीर खंत शिवसेनेसाठी अडचणीची ठरणार आहे.
नेहमी मराठी भाषेसाठी आग्रही असणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माझी मंत्री दिवाकर रावते यांनी स्व:तच्या महाविकास आघाडी सरकारलाच लक्ष्य केले आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरू असताना, सभागृहात इंग्रजी शब्दांचा वापर होण्याबाबत भाष्य केले. सभागृहाच्या कामकाजात इंग्रजी शब्दांचा वापर करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. मराठीमध्ये शब्द संग्रह असताना देखील इंग्रजीचा वापर करणे हास्यास्पद प्रकार असल्याचे ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल एक शब्दही व्यक्त करण्यात आला नाही,असे सांगत रावते यांनी जाहीरपणे खंत व्यक्त केली.
मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना रावते यांनी शिवसेनेला घरचा अहेर दिला आहे. “मराठी ही राजभाषा आहे म्हणून मराठीचा वापर प्रशासकीय कामकाजात करणे बंधनकारक आहे,परंतु आजही तसं होताना दिसत नाही, असे ते म्हणाले. मुंबईतील बॉम्बे क्लबचे नाव अजूनही तेच आहे. मुंबईत इतर सर्व भाषा आणि परप्रांतीयांसाठीचे भवन उभारले जातात पण मराठीचे भवन का नाही?”, असा सवाल करत शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चारता आला नाही आणि हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
दिवाकर रावते पुढे म्हणाले की, “या अर्थसंकल्पात मराठी विद्यापीठाबाबत तरतूद करण्यात आलेली नाही. आणि मला याबाबत बोलावे लागत आहे हे वाईट आहे.”
“मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि अर्थसंकल्पात मात्र मराठीसाठी काहीच नाही, असे नमूद करताना मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर मला त्यांनी विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं, तर मग मी त्यांना काय उत्तर देणार?”, असा सवालही रावते यांनी विचारला.
उपेक्षा कशी काय?
दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, सुभाष देसाई अशा विधान परिषद सदस्यांनी शिवसेनेचा गेल्या टर्ममधील मंत्रीपदांचा वाटा भरला गेला होता. त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांनाच संधी दिली असती तर नाराजी उफाळली असती. अशा खूप काही मिळालेल्या ज्येष्ठांनाच देत राहायचं, त्यामुळेच त्यांना उपेक्षा नाही, असं वाटणार असेल तर लोकांमधून निवडून आलेल्यांनी काय करायचं? असा प्रश्न शिवसेनेच्या एका विधानसभा सदस्यानं विचारला.