मुक्तपीठ टीम
भारतात होळी हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भारतात होळी रंगाची उधळण करत थाटामाटात साजरी केली जाते. काही ठिकाणी होळी तर जगप्रसिद्ध आहे. मथुरा, वृंदावन, बरसाणे, ज्याला कृष्ण नगरी म्हणतात, याठिकाणी होळी पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. या ठिकाणी होळीचा सण होळीच्या प्राचीन काळापासून खेळला जातो. असचं एक शहर आहे ते म्हणजे महादेवांची काशी. काशी हे असं शहर आहे जिथे होळी अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. ती कशी केली जाते ते आपण जाणून घेऊया…
चितेच्या राखेने खेळली जाते होळी
- काशीमध्ये होळीचा सण काही दिवस आधी एकादशीच्या दिवशी सुरू होतो.
- या दिवशी शिवभक्त भोलेनाथसोबत होळी खेळतात, एकादशीच्या दिवशी काशीच्या स्मशानभूमीत खेळली जाणारी होळी बाकीच्या होळींपेक्षा खूप वेगळी असते.
- कारण इथे रंगांनी नव्हे तर राखेने होळी खेळली जाते.
- मोक्षदायिनी काशी शहरातील स्मशानभूमी हरिश्चंद्र घाट येथे चितेची आग कधीच थंड होत नाही, कारण तेथे चिता जाळण्याची आणि अंत्ययात्रा येण्याची प्रक्रियी चोवीस तास सुरुच असते.
- स्मशानभूमीत रंगभरी एकादशीच्या दिवशी चितेच्या राखेने होळी खेळली जाते.
- यावेळी डमरू, घंटा, आणि मृदंग वाजवत होळी राखेने साजरी केली जाते.
तब्ब्ल ३५० वर्षे जुनी ही परंपरा
- ही परंपरा अलीकडची नाही तर तब्ब्ल ३५० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.
- यामागची कथा अशी आहे की, लग्नानंतर माता पार्वती शिवशंकराबरोबर काशीला पोहोचली.
- त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ शिवगणांनी स्मशानातील राख उधळून होळी साजरी केली.
- भगवान शंकरासकट सगळे शिवभक्त स्मशानवासी असल्याने त्यांनी धुळवडीसारखी स्मशानातील राखेने होळी खेळली.
- भूत, प्रेत, पिशाच आणि अघोरीं शक्तीही सामील झाल्या.
रंगभरी एकादशीला आरतीने केली जाते सुरुवात
- तेव्हापासून सुरु झालेली परंपरा आजतागायत सुरू आहे.
- रंगभरी एकादशीला हरिश्चंद्र घाटावर महा स्मशान नाथांच्या आरतीने सुरुवात होते.
- त्याआधी एक मिरवणूक देखील काढली जाते.
- कीनाराम आश्रमातून बाबांची मिरवणूक काढली जाते आणि स्मशानभूमी, हरिश्चंद्र घाट येथे पोहोचते.
- यानंतर महाश्मशान नाथांची पूजा आणि आरती होते.
- त्यानंतर राखेने होळी खेळतात.