मुक्तपीठ टीम
देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचे मतदान सुरु आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल काय लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र निवडणुकीत निकाल काहीही लागो यावेळी फायदा होतो तो सोशल मीडिया कंपन्याचा. निवडणुकीवेळी प्रचार हा सोशल मीडियावरही होत असतो यावेळी राजकीय पक्ष कोट्यावधी रुपये खर्च करून आपल्या जाहीराती सोशल मीडियावर देत असतात. भाजपा, आम आदमी पार्टी, सपा, काँग्रेस यांनी फेसबुकवरील जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. पक्षाव्यतिरिक्त विविध पक्षांच्या उमेदवारांनीही वैयक्तिक पातळीवर या व्यासपीठावर लाखोंचा खर्च केला आहे.
गेल्या चार महिन्यात पक्षांचा जाहीरातींवर खर्च
फेसबुक अॅड लायब्ररीनुसार, गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर ते यावर्षी २३ फेब्रुवारीपर्यंत भाजपाने सर्वाधिक सात कोटी, सपा-आरएलडी युतीने सुमारे एक कोटी, आम आदमी पार्टीने सुमारे दोन कोटी, काँग्रेसने एक कोटी आणि तृणमूल काँग्रेसने २२ लाख रुपये खर्च केले. यावेळी भाजपाने सुमारे तीन हजार, सपाने दोनशे जाहिराती दिल्या.
मुख्यमंत्री पदांच्या उमेदवारांनी भरपूर पैसा खर्च केला
- केवळ पक्षच नव्हे तर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांनीही डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रचंड खर्च केला.
- मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांमध्ये सुखबीर सिंग बादल (१४.८९ लाख) आणि आपचे लोनी उमेदवार सचिन कुमार शर्मा (४.६४ लाख) यांनी सर्वाधिक खर्च केला.
- आरएलडी प्रमुख जयंत सिंह यांनी ७.६९लाख, हरीश रावत ६.४७ लाख, पुष्कर सिंह धामी५.६७ लाख आणि चरणजीत सिंह चन्नी यांनी ३.२२ लाख रुपये खर्च केले.
- उमेदवारांमध्ये मेरठ भाजपाचे सोमेंद्र तोमर आणि किथोर भाजपाचे सत्यवीर सिंग त्यागी यांनी प्रत्येकी तीन लाख रुपये खर्च केले.
या फेसबुक पेजेसवरही खर्च
- वेगवेगळ्या पक्षांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक पेजच्या जाहिरातीवर खूप खर्च केला.
- भाजपाने भाजप उत्तर प्रदेशवर सुमारे पाच कोटी, मोदी इलेव्हन पेजवर सुमारे ४४ लाख, बुआ-बाबुआ पेजवर सुमारे २२ लाख खर्च केले.
- आपने हक्क पंजाब दा पेजवर सुमारे १२ लाख खर्च केले, काँग्रेसने हमारी प्रियंका दीदीवर सुमारे साडेसहा लाख आणि लड़की हूं लड़ सकती हूं पेजवर सुमारे ८८ लाख रुपये खर्च केले.
विरोधातही पेजवर खर्च
- पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या पक्षांच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी पैसा खर्च केला.
- जसं की, ढोंगी आप पेजवर सुमारे १५ लाख रुपये, केजरी के बवालवर सुमारे नऊ लाख रुपये, भयंकर जुमला पार्टीच्या पेजच्या प्रचारावर सुमारे ४ लाख रुपये, सीएम का मुखौटा पेजवर तीन लाख रुपये, पंजाब बोल दा सुमारे २१ लाख रुपये खर्च करण्यात आले.
- या क्रमात चरणजीत चन्नीच्या चाहत्यांवर ६.८१ लाख, इक मौका आप नुवर ३.१७ लाख, मणिपूर विथ मोदीवर ३.३० लाख आणि देशभक्त भारतीय पेजवर सुमारे ९ लाख खर्च करण्यात आले.