मुक्तपीठ टीम
आज भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्यानं उत्साह खूपच जास्त आहे. त्यातही सरकारने राष्ट्रध्वजसंहितेत काही बदल केल्याने घरोघरी तिरंगा डौलानं फडकत आहेत. स्वातंत्र्य दिनी दिल्लीतील लालकिल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवला जातो. राष्ट्रीय सण मानल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवसांमध्ये केवळ फडकवणाऱ्यांमध्ये नाही तर फडकवण्याच्या पद्धतीतही फरक आहे. चला तर मग जाणून घेऊया दोघांमधील फरक…
राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात फरक काय?
ध्वजारोहण
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात, तिरंगा दोरीच्या मदतीने खालून वरच्या दिशेने खेचून मग तो फडकवला जातो. या कृतीला ध्वजारोहण म्हणतात. स्वातंत्र्यदिनी केल्या जाणाऱ्या ध्वजारोहणाला इंग्रजीत Flag Hoisting म्हणतात.
ध्वज फडकवणं…
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन सोहळ्यात तिरंगा ध्वजस्तंभाच्या वर घडी करून बांधलेला असतो. मग तो तिथं थेट फडकवला जातो.याला ध्वज फडकवला असं म्हणतात. या प्रक्रियेला इंग्रजीत Flag Unfurling म्हणतात.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान, तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती असं का?
- देशाचे पंतप्रधान १५ ऑगस्ट रोजी दिल्लीत ध्वजारोहण करतात. तर २६ जानेवारीला राष्ट्रपती.
- त्यामागील कारण म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा त्या ऐतिहासिक क्षणी भारत स्वतंत्र झाला हे प्रतिकात्मकरीत्या नोंदवण्यासाठी ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले.
- कारण त्यावेळी भारतीय राज्यघटना लागू झाली नव्हती आणि राष्ट्रपती जे राष्ट्राचे घटनात्मक प्रमुख आहेत त्यांनी पदही स्वीकारले नव्हते.
- स्वातंत्र्यदिनाच्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आपला संदेश देशाला देतात.
- २६ जानेवारीला भारतीय संविधान लागू झालं, लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात आली.
- त्यामुळे त्या दिवसी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशाचे संविधानिक प्रमुख म्हणून राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.
देशाच्या राजधानीतील मुख्य सोहळा कुठे आणि कसा?
- स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात.
- प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर तिरंगा ध्वज फडकवला जातो.
- प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात थाटामाटात कार्यक्रम आयोजित केले जातात.
- प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर लष्करी संचलन, राज्यांचे, विभागांचे चित्ररथही असता. स्वातंत्र्यदिनी तसं नसतं.
- मात्र प्रजासत्ताक दिनाच्या तुलनेत स्वातंत्र्यदिनी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत नाही.