Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

शिर्डीच्या पर्यावरण संमेलनातील ‘मनोमंथन’

November 6, 2022
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
पर्यावरण रक्षणाची शपथ घेताना संमेलन प्रतिनिधी

धीरज वाटेकर

पर्यावरण संवर्धनासाठी मानवी विचार आणि भावनेच्या प्रदूषणावर काम करण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण संमेलनांसारख्या उपक्रमातून आपल्याला ‘मनोमंथन’ साधायचंय की ‘मनोरंजन’ हे ठरवण्याची उत्तम संधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील २८ जिल्ह्यातून शिर्डी येथे आलेल्या पाचशेहून अधिक पर्यावरणप्रेमी संमेलनार्थीना नुकतीच मिळाली होती. निमित्त होते, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांनी ‘आदर्श सरपंच’ भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्रीसाई आश्रम शताब्दी मंडप, साई आश्रम नंबर १ भक्तनिवास परिसरात २९-३० ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या सहाव्या पर्यावरण संमेलनाचे!

सहाव्या पर्यावरण संमेलनात 'वनश्री' विशेषांकाचे प्रकाशन करताना मान्यवर

संमेलनाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला पर्यावरण हा समाजाचा विषय असल्याचे म्हटले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांनी दिलेल्या शपथेप्रमाणे आपण वागत असून जीवात जीव असेपर्यंत कार्यरत राहाणार आहोत. सध्याच्या तीव्र प्रदूषणाच्या काळात सुसह्य मानवी जीवन जगण्यासाठी स्वच्छ पाणी प्या, मुलांना शिक्षण चांगलं द्या, स्वच्छता राखा, वडीलधाऱ्या, म्हाताऱ्या माणसांना त्या-त्या गावांनी स्वीकारा, सेंद्रिय शेती करा, वृक्षारोपण करा आदी कानमंत्र पेरे पाटील यांनी दिले. १९९५ पासून पेरे पाटील यांनी पाटोदा या साडेतीन हजार वस्तीच्या गावात काम सुरू केले होते. शिक्षण सातवीपर्यंत झालेल्या त्यांच्या घरी वारकरी वातावरण होते. लोक आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य जगले पाहिजेत म्हणून त्यांनी काम केले. ‘मूल जन्माला आले की, त्याला प्रथम ऑक्सिजन लागतो. झाडामुळे हे शक्य आहे. झाडे म्हणजे पावसाचे एटीएम आहे. प्रत्येक माणसामागे चार झाडे लावणे आवश्यक आहे.’ असा विचार त्यांनी मांडला. लग्नानंतर नवरीने माप ओलांडून येताना झाड लावले पाहिजे. झाड नाही तर लेकरं जगणार नाहीत हे सांगणे जरुरीचे आहे. पाटोद्यात माणशी चार झाडे लावली आहेत. पूर्वजांना नावे ठेवू नका, त्यांच्या काळात योग्य होते. आपण मोडतोड करून समस्या वाढविल्या. आज सर्वच प्रकारांत भेसळ वाढली आहे. समाजातील कर्त्या माणसांनी लक्ष दिले पाहिजे. समाज ऐकतो, सांगणारा योग्य दर्जाचा आणि प्रामाणिक पाहिजे. देशाचे राजकारण जातीपातीवर न करता विकासावर करायला हवे. प्रत्येक गावात विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती दुर्लक्षित करूनच विकास साधला पाहिजे. कष्टाशिवाय पर्याय नाही. शिर्डी सारख्या देशातील धार्मिक संस्थाननी भाविकांना रोपं भेट द्यायला सुरुवात करायला हवी. रोपांची विक्रीही करता येईल. लोकं इच्छेने प्रसाद म्हणून ती सोबत नेतील लागवड करून संगोपन करतील असा विचार पेरे पाटील यांनी मांडला.

संमेलनाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील मार्गदर्शन करताना

रघुनंदन रामकिशन लाहोटी यांनी ‘सर्वांगीण ग्रामीण विकास’बाबत बोलताना २०१२ साली दुष्काळ पाहिल्यावर एक गाव दत्तक घेतल्यापासून ची कहाणी सांगितली. जमिनीत पाणी मुरेल असं काम करायला पाहिजे असं ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी असंख्य प्रयत्नानंतर ‘गावात समृद्धी आली माणसं बदलली नाहीत’ अशी व्यथा बोलून दाखवत ‘काय चुकलं?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या उत्तरादाखल ‘माणूस घडविण्याच्या कामात आम्ही कमी पडलो’ असंही ते बोलून गेले. लाहोटी हे अरुणिमा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही संस्था मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात ग्राम जलसंधारण, वृक्षारोपण, शिक्षण, स्वच्छता, तरुणांमध्ये कौशल्य विकासवाढ, लहान बचत गटांद्वारे महिला सक्षमीकरण, भारतीय गायीवर आधारित सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेतमालाचे थेट विपणन आदी विषयात काम करते. या संस्थेने जलसंधारण प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून २५ हून अधिक वेगवेगळ्या गावांमध्ये २५० चेक dam बांधलेत. ही गावे पाणी टंचाईमुक्त झालीत. आगामी काळात असेच बंधारे आणखी १०० गावात उभारण्याचे संस्थेचे ध्येय आहे. यातून सध्या ५ हजार दशलक्ष लीटर पेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन आणि जतन केले गेले आहे. ज्याचा १० हजारपेक्षा जास्त कुटुंबांना दीर्घकालीन लाभ होतो आहे. पाणी या विषयावर खूप काम केलं तर पण गावं पाणीदार होईल. सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी येणारे उत्पन्न रासायनिक खताच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाइतके मिळेल याची काळजी घ्यायला हवी असंही लाहोटी यांनी नमूद केलं. ‘संत साहित्यातील पर्यावरण विचार’ या विषयावर प्रा. विशाल(महाराज) फलके यांनी मार्गदर्शन केले. २०१९ च्या चिपळूण पर्यावरण संमेलनात ‘शिवकालीन पर्यावरणीय विचार’ असा विषय होता. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. मानवाने निसर्गाला देवत्व दिलेले आहे. संतांच्या अभंगातून आपल्याला याची जाणीव होते. संत परंपरा मानणारा तिला प्रमाण मानून काम करणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. आपले सण, प्रार्थना निसर्गाशी निगडित! भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनदृष्टी लक्षात घेता पुन्हा एकदा आपले भावनिक अंगाने आपले पर्यावरणाशी नाते प्रस्थापित होण्याची गरज आहे. माणसाचा निसर्गाशी असलेला संवाद बदलत्या जीवनशैलीत आज हरवलाय. निसर्ग दुखावला गेलाय. म्हणून शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी ‘संत साहित्यातील पर्यावरण’ हा विषय निवडण्यात आला होता. यावेळी बोलताना ‘संत साहित्याचा विचार करा, अभ्यास करा’ अशी भूमिका फलके यांनी मांडली. विचार आणि भावनेचे प्रदूषण यावर काम व्हायला हवं आहे. आपल्याला मनोमंथन हवंय की मनोरंजन ते ठरवा असंही ते बोलले.

पर्यावरण रक्षणाची शपथ घेताना संमेलन प्रतिनिधी

‘शिर्डीतील पर्यावरण’ हा विषय ग्रीन एन क्लीन शिर्डी फाऊंडेशन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारक यांनी मांडला. ही संस्था शिर्डीमध्ये ताजी हवा आणि स्वच्छ वातावरण मिळावं यासाठी २०१२ पासून प्रयत्न करते आहे. संस्थेने आजवर ११ हजारहून अधिक झाडे लावलीत. तेवढ्याच स्थानिक जागरूकता मोहिमा राबविल्या आहेत. रक्षाबंधन निमित्ताने झाडाला राखी बांधणे (वृक्षबंधन), ‘एक सेल्फी झाडासोबत’, वृक्षपूजन, स्वच्छ शिर्डी हरित शिर्डी प्रकल्प उपक्रम राबवलेत. शिर्डीच्या सुशोभीकरणात ग्रीन एन क्लीन शिर्डी फाऊंडेशनचे योगदान आहे. पारख यांनी आपल्या भाषणात, अर्धवट तोडलेल्या झाडांना शेणाने ड्रेसिंग करावे आणि शालेय मुलांनी घरी परतताना पाण्याच्या बाटलीत शिल्लक राहिलेले पाणी झाडाला घालावं असा विचार मांडला. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. बी. जे. भोसले यांनी ‘जागतिक पर्यावरण, भारताची स्थिती आणि आपली जबाबदारी’ या विषयाची मांडणी केली. यावेळी बोलताना त्यांनी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम, औद्योगिक क्रांती, आर्थिक विकास आदी मुद्यांचा उहापोह करत शाश्वत विकासासाठी काम न केल्याने आपण विनाशाच्या उंबरठ्यावर असल्याचे नमूद केले. चिरकाल ठरणारा विकास विचारात यायला हवा, असं ते म्हणाले. समारोपप्रसंगी ‘वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने सन्मानित ‘स्‍त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया यांनी बोलताना निसर्ग, सामाजिक आणि मानसिक पर्यावरण विषयक उहापोह केला. सकस विचारांचं बीज वाढायला हवं असं त्या म्हणाल्या. सामाजिक पर्यावरण असल्याचे नमूद करून त्यांनी अतिशय भावनिक ओलाव्यात सामाजिक पर्यावरणाचं वास्तव मांडलं. उपाय म्हणून त्यांनी उपस्थितांना ध्यानधारणा करावयाची सूचना केली. प्राथमिक शिक्षणचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी मोफत पुस्तक वाटप योजनाबाबत बोलताना विद्यार्थ्यांची पुस्तके वापरण्याबाबतची स्थिती वर्णिली.

जिल्हा उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा मान

संमेलनाला श्रीसाईबाबा देवस्थान संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, चांगुलपणाची चळवळचे संस्थापक राज देशमुख, अहमदनगर जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने, डॉ. प्रकाश कांकरिया यांची उपस्थिती लाभली. संमेलनात विलास महाडिक, प्रमोद काकडे यांनी संपादित केलेल्या ‘वनश्री’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

धीरज वाटेकर

dheeraj watekar, mob. +91 9860360948
https://dheerajwatekar.blogspot.com

Tags: Dheeraj Watekarshirdiधीरज वाटेकरपर्यावरण संमेलनमनोमंथन
Previous Post

“नोटा म्हणजे भाजपाला मिळालेली मतं!” शिवसैनिकाची न्यूज चॅनलवर लाइव्ह प्रतिक्रिया प्रतिक्रिया!

Next Post

अंधेरीत भगवाच फडकला! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला विजय!!

Next Post
Rutuja Latke

अंधेरीत भगवाच फडकला! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला विजय!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!