धनंजय शिंदे / व्हा अभिव्यक्त!
गेल्या अनेक दशकांपासून राज्यात शेतकरी आत्महत्या सर्रास सुरू आहेत. सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक योजना केल्या परंतु त्या सातत्याने कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. नुकतेच नाशिक जिल्ह्यातील वडाळीभोई येथील शेतकरी दीपक जाधव यांच्या आई सत्यभामा जाधव यांनी सुलतानी सावकारी जाचाला आणि जीवघेण्या वसूलीला कंटाळून शेत तळ्यात उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. खरे तर ही आत्महत्या नसून राज्य सरकाने मोकाट सुटलेल्या सावकारांच्या माध्यमातून अन्नदात्याची केलेली निर्घृण हत्या आहे.
राज्य सरकार मधील प्रमुख नेते हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी दिल्ली, गुवाहाटी, उत्सव, सणवार यातच व्यग्र आहे.
कर्जाच्या पाशातून जर शेतकरी बांधवांची वयोवृद्ध आई आत्महत्या करत असेल तर उद्या आमदार, खासदार, सनदी अधिकाऱ्यांच्या शेतकरी नातेवाईकांवर सुद्धा ही वेळ येवू शकते. पोलिसांनी या प्रकरणी त्वरित चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावे.
राज्य सरकारने आता घोडेबाजाराच्या राजकारणातून वेळ काढत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी खाजगी सावकारांच्यावर प्रतिबंध लागावा यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात अशी आम् आदमी पक्षाची मागणी आहे.
(धनंजय शिंदे हे आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे सचिव आहेत.)