मुक्तपीठ टीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी २०१९ व २०२० च्या जाहीर केलेल्या ४०० विद्यार्थ्यांच्या निवड यादीव्यतिरिक्त आमरण उपोषण सुरू केलेल्या १०९ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मकता दर्शवली असून त्याबाबत बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना माहिती दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संकेतस्थळावर प्रत्येकी २०० याप्रमाणे एकूण ४०० विद्यार्थ्याची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि उर्वरित १०९ विद्यार्थ्यांनी सरसकट फेलोशिप मिळणेबाबत आमरण उपोषण सुरु केले होते. श्री. मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून १ मार्च २०२२ रोजी केलेल्या टि्वटमध्ये या १०९ विद्यार्थ्यांच्या फेलोशिप बाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून शासन स्तरावरून आदेश प्राप्त झाल्याननंतर फेलोशिप देण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१९ व २०२० सर्व विद्यार्थ्यांची सरसकट निवड करण्याबाबत केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने, कोविड-१९ ची परिस्थिती पाहता विशेष बाब म्हणून सहानुभूतीपूर्वक विद्यार्थ्याना फेलोशिप मिळणेबाबत शासन स्तरावरून उचित निर्णय घेण्याची विनंती शासनास बार्टीमार्फत करण्यात आली होती, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी दिली आहे.