मुक्तपीठ टीम
आज कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन पार पडले. खासदार संभाजी छत्रपतींच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक आंदोलन काढण्यात आला होता. या आंदोलनाला कोल्हापुरातील सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी सलाईन लावून मराठा आंदोलनात सहभागी झाले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले की, “महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतले आहे. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकरसुद्धा कोल्हापूरमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबले, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही? असे प्रश्न समाजाला पडले आहेत. महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावे आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावे. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन” अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती नाजूक असतानाही ते सलाईन लावून भर पावसात मूक आंदोलनात सहभागी झाले होते.