मुक्तपीठ टीम
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत ठाकरे सरकारविरोधात आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.
गृहमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, “अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी फडणवीस सरकारने दाबली असा खोटा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यासंदर्भात आरोप फेटाळून लावताना मी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सभागृहात वाचून दाखवला होता. त्यानुसार, या सरकारच्या कार्यकाळात अन्वय नाईक प्रकरणात जो एफआयर दाखल करण्यात आला तोच सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा ठरवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्णयाची मी माहिती दिली.”
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही अशा प्रकारचं विधान न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं फडणवीस म्हणाले. शिवाय ही बाब आपण काल निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ते वारंवार तेच बोलत राहिले. असे करून अनिल देशमुख यांनी माझ्या बोलण्यावर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अशोक चव्हाण यांच्याविरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव
फडणवीस म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अशोक चव्हाण यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली. अटर्नी जनरल यांनी जे म्हटले नाही ते देखील त्यांच्या तोंडात शब्द टाकून अशोक चव्हाण यांनी सभागृहात विधाने केली आहेत. यामुळे अटर्नी जनरल आणि माझा देखील हक्कभंग झाला आहे. प्रत्यक्षात कायदा नाही तर केवळ दुरुस्ती केली होती. हा मुद्दा उच्च न्यायालयात गेला होता. १०२ व्या घटनादुरुस्तीचा महाराष्ट्राच्या कायद्यावर परिणाम होणार नाही, हे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यावर २ पाने लिहिली आहेत. मात्र या सर्व बाबी विचारात न घेता ते महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे आमच्या काळात झालेला कायदा निरस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी मी अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.