मुक्तपीठ टीम
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर खरं तर चर्चा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल असेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
- या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती.
- त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली.
- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
- उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं.
- म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि १६ अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.
- एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजपा बाहेरून पाठिंबा देणार आहे.
फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर रोष!
- गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला.
- या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला, या सरकारचे दोन मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे.
- एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्यात आलं नाही.
- शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं.
- राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही, पण ती घेतली.
बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद दिलं, एकनाथ शिंदे
- या संबंधी भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिलं.
- हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
- देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहे.
- ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत.
- त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.