मुक्तपीठ टीम
अल्प भूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
भुसे यांनी आयआयटी, मुंबई येथे भेट दिली. त्यांनी आयआयटीच्या रुरल टेक्नॉलॉजी अँक्शन ग्रुप, सितारा ग्रुपच्या प्राध्यापक, संशोधक यांच्याशी संवाद साधला. या ग्रुपच्या सहाय्याने शेती तंत्रज्ञानावर केल्या जात असलेल्या संशोधनाची माहिती घेतली, प्रकल्पांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. आयआयटी, मुंबई येथील जलविहार सभागृह येथे ही बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) संचालक इंद्रा मालो, आयआयटीचे संचालक डॉ. सुभाषिश चौधरी, प्रा. आनंद राव आदी उपस्थित होते.
भुसे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता यावी यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. अल्प भूधारक शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांना उपयुक्त ठरतील आणि निविष्ठा खर्चात कपात होईल, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीने भर द्यावा. राज्यातील विविध भागांत अनेक प्रयोगशील शेतकरी आपल्या अनुभवातून विविध तंत्रज्ञान, यंत्रसामग्री विकसित करतात. त्यांच्या संशोधनाला तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीने विकसित करण्यासाठी आयआयटी आणि कृषी महाविद्यालयांनी एकत्रित यावे, असे आवाहनही भुसे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक गणेश पाटील, कृषी संचालक (गुणवत्ता) दिलीप झेंडे, संचालक (विस्तार आणि शिक्षण) विकास पाटील, पोकराच्या मेघना केळकर, विजय कोळेकर, डॉ. मिलिंद राणे, डॉ. सतिश अग्निहोत्री, डॉ. बकुळ राव आदी उपस्थित होते.