मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बांधकाम प्रमुख, रायगडाचे शिल्पकार हिरोजी इंदुलकर यांच्या वंशज लेखिका गौरी इंदुलकर लिखित ‘देवाच्या शोधात…’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजिला आहे. विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने येत्या गुरुवारी (दि. २० ऑक्टोबर) सायंकाळी ५.३० वाजता सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात प्रख्यात भागवत निरुपणकार आणि अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अध्यक्षस्तेखाली हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लेखिका गौरी इंदुलकर, विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्वकर्मा पब्लिकेशनचे सहसंपादक संदीप तापकीर, गौरी यांचे पती अनिल इंदुलकर आदी उपस्थित होते.
गौरी इंदुलकर म्हणाल्या, लहानपणापासून वाचनाची गोडी होती. त्यातून कुतूहल वाढत होते. स्वत्वाचा शोध घेण्याचा ध्यास लागला होता. त्यातच परमहंस योगानंद यांचे पुस्तक वाचनात आले आणि माझ्या मनाची कवाडे उघडली. ध्यानधारणा करू लागले. त्यातून मला अद्भुत अनुभव येत होते. या अनुभवांची नोंद ठेवत गेले. डायरी लिहीत गेले. ध्यान करताना जे दिसे ते मी डायरीत चित्ररूपात काढून ठेवत असे. चेन्नईच्या भगवती स्वामींच्या सान्निध्यामुळे मला दिव्यत्वाची अनुभूती येऊ लागली. ‘नर्मदे हर हर’ व हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ ही पुस्तके वाचल्यानंतर आपल्याला आलेल्या दैवी अनुभवांचे पुस्तक लिहावे, अशी प्रेरणा मिळाली. विश्वकर्मा पब्लिकेशनने प्रकाशनाची जबाबदारी घेतली. माझे पती अनिल यांनी पाठिंबा दिला आणि त्यातून हे पुस्तक साकार झाले.”
विशाल सोनी म्हणाले, “उच्चविद्याविभूषित, बांधकाम क्षेत्रात अमेरिकेत १० वर्षे आणि नंतर भारतात उद्योजिका म्हणून काम केलेल्या गौरी इंदुलकर यांना वाचनाची, अध्यात्माची आवड आहे. या काळात त्यांना आलेल्या अद्भुत अनुभवांच्या नोंदी त्यांनी डायरीमध्ये केल्या होत्या. परंतु सर्वच वाचकांना त्यांचे हे अनुभव अध्यात्माची, ध्यानधारणेची अनुभूति देणारे आहेत. त्यामुळे याचे सुंदर पुस्तक करण्याचा निर्णय झाला. इंदुलकर यांनी प्रत्यक्ष अनुभवांतून हे पुस्तक साकारले आहे. हे पुस्तक आपल्या प्रत्येकाला आपलेसे करणारे ठरेल. कारण प्रत्येकाला आयुष्यात असे अद्भुत अनुभव येत असतात.”