मुक्तपीठ टीम
देशी तांदळाच्या वाणांना असलेली मागणी वाढत चालली आहे. त्यातच त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांची निर्यातही वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या लागवडीस चालना मिळाली आहे. संरक्षित तांदळाच्या अनेक वाणांची उत्पादकता वाढवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत अनेक संस्थांमध्ये संशोधन केले जात आहे. आनुवंशिक सुधारणेद्वारे देशी तांदळाची गुणवत्ता आणि सुगंध राखण्याबरोबरच उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जात आहे. स्थानिक वाणांच्या संवर्धनात शेतकऱ्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. कृषी मंत्रालय शेतकऱ्यांना त्यासाठी विशेष प्रोत्साहन देत आहे.
तांदळाच्या देशी वाणांसाठी प्रोत्साहन
- सध्या आयसीएआर आणि दिल्लीच्या नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्स (एनबीपीजीआर) मध्ये ४५,१०७ देशी तांदळाचे वाण जतन केले गेले आहेत.
- तांदळाच्या संरक्षित वाणांपैकी ४ हजारहून अधिक प्रजाती पारंपारिक शेतकर्यांनी संरक्षित केल्या आहेत.
- शेतकऱ्यांनी जतन केलेल्या अशा एकूण १६४५ तांदळाच्या वाणांना जीआय टॅग प्राप्त झाला आहे.
- यामध्ये पोषण, गुणवत्ता आणि आरोग्याच्या बाबतीत चांगल्या आणि सुगंधित वाणांची उत्पादकता वाढविण्यात यश मिळाले आहे.
- एकूण २६ सामुदायिक बियाणे बँका स्थापन केल्या आहेत.
भारतीय तांदळाचा सुगंध अरबांना भावला
भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक आणि तांदळाच्या संशोधनात महत्वाची भूमिका बजावणारे संशोधक डॉ. एके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील देशांमध्ये सुगंधित वाण असलेल्या भारतीय भाताच्या मागणीत वाढ झाली आहे. अन्न उत्पादने निर्यात करणारी एजन्सी एपीडाने ही या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.
पारखून खाणार, त्याला देशी तांदूळ भावणार!
- देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तांदळाच्या जवळपास १५० देशी वाणांची ओळख पटली गेली असून त्यांना भौगोलिक संकेत (जीआय) टॅगदेखील मिळाला आहे.
- असे वाण विकसित करण्यासाठी संशोधन कार्य चालू आहे, जेणेकरून तांदूळ लागवड सुलभ होईल आणि उत्पादकता वाढेल.
- महाराष्ट्रातील आंबे मोहर, छत्तीसगडचा टिळक चंदन केरळचा जीरकशाला, गंधकशाला, आंध्र प्रदेशचा चित्तमुती आत्मा, जम्मू-काश्मीरचा मुश्क-बुडजी आणि मणिपूरचा चखव पॅराडान या गुणवत्तेचा विचार केल्यास ते व्यावसायिक लागवडीसाठी तयार होऊ शकतात.
- काला नमक या वाणाचं रोप आता उंचीनं कमी झालंय पण त्याचे उत्पादन वाढले आहे.
- जेनेटिक सुधारणेद्वारे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- ओडिसाचे काळा जीरा, बंगालचा गोविंदभोग, रंधुनी पागल आणि बिहारच्या कतरणी यांना जीआय टॅग मिळाला आहे.
- सध्या देशातील १० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतात या प्रकारच्या तांदळाची (भात) लागवड केली जात आहे.