मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात संतापाचा वणवा भडकवणाऱ्या जेम्स लेनच्या पुस्तकानंतर आता लोकसत्ताचे संपादक गिरिश कुबेर यांच्यावरही आक्षेर्पाह लिखाणाचा आरोप होत आहे. त्यांच्या नव्या इंग्रजी पुस्तकात त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयरबाई राणीसाहेब यांच्याविषयी कुबेरांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप आहे. त्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक विचारांच्या आणि अनेक वर्गामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या पुस्तकावर बंदीची मागणीही करण्यात येत आहे. तसेच त्यांनी असे लेखन कोणत्या हेतूने केले त्याच्या तपासाचीही मागणी होत आहे.
संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कुबेरांच्या पुस्तकावर तात्काळ बंदीची मागणी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार अतुल भातखळकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रिपाईचे नेते सचिन खरात यांच्यासह अनेकांनी कुबेरांचा निषेध करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून बंदीची मागणी केली आहे. त्यांच्या पत्रातील मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे आहेत:
कुबेरांवर जाणीवपुर्वक बदनामीकारक लिखाण करून तेढ निर्माण केल्याचा आरोप
• गिरिश कुबेर नामक लेखकाने छत्रपती संभाजी महाराज यांनी मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांचा खुन केला अशा पध्दतीचे अत्यंत आक्षेपार्ह लिखाण Renaissance State:The Unwritten story of the Making of Maharastra या पुस्तकामध्ये केले असून यावर बंदी घातली पाहिजे. ‘शाहू महाराजांना तो दूरदृष्टीचा अभाव असणारे व कर्तृत्व नसणारे छत्रपती होते.
• महादजी शिंदेंना तर विश्वासघातकी, दगाबाज होते असे पुस्तकात संबोधले आहे.
• स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज चारित्र्यसंपन्न व स्वराज्य निष्ठीत असणाऱ्या राजावर रयतेचेसुध्दा प्रचंड प्रेम होते. अशा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणं हा जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे.
• संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याच काम आजही कथा, कांदबऱ्या, मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होत आहे.
कुबेरांच्या पुस्तकावर बंदीची मागणी
• छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींची बदनामी सहन करणार नाही.
• या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो.
• माझी आपल्याला विनंती राहील की “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाने ताब्यात घ्यावीत.
• लेखक गिरिश कुबेर आणि प्रकाशक हार्पर कॉलिंस हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीमागे कुबेरांचा हेतू तपासा!
• कुबेर हे एका दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात. ते अभ्यासून प्रकटतात असेही बोलले जाते. ते संभाजी महाराजांविषयी केवळ अज्ञानातून लेखन करतील असे वाटत नाही. त्यामुळे कुबेर हे या त्यांच्या पुस्तकात छ. संभाजी महाराजांविषयी असे बिनबुडाचे लिखाण करतात या मागे त्यांचा हेतू काय आहे? याचीही चौकशी झाली पाहीजे.
• आपण या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालवे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
• अन्यथा महाराष्ट्रात लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात आम्ही फिर्याद दाखल करु व संपूर्ण राज्याव्यापी आंदोलन करु याची आपण नोंद घ्यावी.
• सरकारने सदर पुस्तकावर तात्काळ ‘बंदी’ घालावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
• वादग्रस्त लेखक गिरिश कुबेर यांना कुणीही पाठीशी घालू नये…