मुक्तपीठ टीम
चंद्रपूर जिल्हा दारुबंदी उठवण्याचा राज्यशासनाचा अन्याय्य निर्णय स्थगित करणे तसेच महाराष्ट्र शासनाचे व्यसन मुक्ती धोरण २०११ अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे बुधवारी सकाळी राजभवन येथे करण्यात आली. यावेळी मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, राज्य निमंत्रक वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या वसुधाताई सरदार, एड रंजना गवांदे, चंद्रपूर येथील गुरुदेव सेवा मंडळाचे सुबोधदादा उपस्थित होते.
व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी २७ मे रोजी महाराष्ट्र राज्य मंत्री मंडऴाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपुर जिल्हाची दारु बंदी उठविण्यात आली आहे. या जिल्ह्यात मागील सरासरी ६ वर्षापासून दारुबंदी लागू करण्यात आली होती. यासाठी सूज्ञ नागरिक व महिलांकडून मोठ्या संख्येने दीर्घकालीन लढा देण्यात आला होता. लाखो महिलांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करुन दारुबंदीची मागणी केली होती. याची दखल घेऊन तत्कालीन भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकारने दारुबंदी लागू केली होती.
मात्र, आज सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारातील मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या अट्टाहासी भूमिकेमुळे चंद्रपुर जिल्हाची दारुबंदी हटविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सध्या महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असलेले विजय वडेट्टीवार यांनी भारतीय राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या खुले आम विरोधात जिल्हा दारूबंदी उठवण्याचे आश्वासन देत निवडणूक लढवली होती. याबद्दल त्यांना योग्य समज देण्याऐवजी विद्यमान महाविकास आघाडी सरकार आल्यावर २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये बंदी उठवण्याचे एक निर्णय परिपत्रक काढून घेतला आहे. लोकक्षोभामुळे सदर निर्णय शासनाला मागे घ्यायला लावला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
मात्र कोरोना महामारीमुळे सामान्य जनता, विशेषतः महिला वर्ग, मागास जातीजमाती अभावग्रस्त, हवालदिल आहेत. शासकीय बंधनांमुळे विरोध व्यक्त करण्यासाठी एकत्र येणे सुद्धा अशक्य आहे. अशा कोंडीत सापडलेल्या गोरगरिबांचे जिणे आणखी अवघड करणारा हा क्रूर निर्णय, लादला गेला आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा दारूबंदी हटवितांना संतापजनक व खेदजनक कारणे दाखवली गेली याबाबतही व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे महामहीम राज्यपाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
दरम्यान, मंचाच्या शिष्ट मंडळाची महामहीम राज्यपाल कोश्यारी यांनी आस्थेवाईकपणे विचारपूर करत ते स्वत: दारुबंदी, व्यसनमुक्तीच्या बाजूने असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाला चंद्रपूरजिल्हा दारुबंदी उठविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबतचे पत्र देणार, राज्याचे व्यसनमुक्ती धोरण २०११ ची अंमलबजावणीसाठी यंत्रणा तयार करण्याचे तसेच व्यसनमुक्ती प्रचार- प्रसार- बंदी- उपचार यासाठी काम करणाऱ्यांना शासनाने पाठिंबा व मदत करण्याविषयीचे आश्वासन दिले. मंचातर्फे मागणी करण्यात आलेल्या रमानाथ झा समितीचा अहवाल जनतेसाठी खुला करुन देण्याबाबतचे आश्वासन यावेळी दिले.