मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या संकटकाळात लोकांना देवाएवढेच किंवा काहीवेळा तर देवापेक्षाही जास्त वाटले ते डॉक्टरच. कोरोनाविरोधातील युद्धात दोन्ही लाटांमध्ये देशातील किमान १५०० डॉक्टरांनी प्राणार्पण केले. त्यांना ठाऊक होते, कोरोना रुग्णांवर उपचाराचं कर्तव्य बजावताना काळजी घेऊनही आपल्याला संसर्ग होऊ शकतो, तरी ते लढले. त्यांच्या सेवायज्ञात त्यांची स्वत:चीच आहुती पडली. या डॉक्टरांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांचं स्मारक उभारण्याची मागणी जोर धरत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड वेलबिंग (आयएचडब्ल्यू) कॉन्सिलने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांसाठी राष्ट्रीय कृतज्ञता स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. अशीच मागणी महाराष्ट्रातील जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
डॉक्टरांचे स्मारक कशासाठी?
- कोरोना साथीत लोकांच्या आरोग्य रक्षणासाठी लढा देण्यात सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे.
- देशभरात कोरोनामुळे किमान १५०० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
- सन २०२० मध्ये आयएचडब्ल्यूच्या नॅशनल थँक्सगिव्हिंग इनिशिएटिव्हच्या पहिल्या लाटेत ग्रॅटिट्यूड वीक फॉर हेल्थ गार्डियन्स दरम्यान ही मागणी करण्यात आली होती.
- तेव्हापासून आयएचडब्ल्यू विविध आरोग्य मंचांमध्ये ही मागणी करत आहे.
- महाराष्ट्रातही जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी सातत्यानं आवाज उठवला आहे.
- त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वीही कोरोनाविरोधी युद्धात प्राण गमावलेल्या डॉक्टरांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी केली होती.
- जीवाला धोका आहे तरीही जे डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्यरक्षक कोरोना रुग्णांची सेवा करणे थांबवले नाही, उलट प्राणार्पणही केले, त्यांना शहीदच म्हणावं अशी त्यांची मागणी आहे.
- आता राज्य सरकारने याडॉक्टरांची स्मृति जागती राखण्यासाठी जे.जे.सारख्या एखाद्या मोठ्या रुग्णालय संकुलात शहीद डॉक्टर स्मारक उभारावे, अशी मागणी जिजाऊच्यावतीने निलेश सांबरे यांनी केली आहे.
डॉक्टरांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी पत्र पाठवणार आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जलाल आणि आयएचडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमल नारायण यांनी सांगितले की, या मोहिमेमध्ये त्यांना इतर अनेक संघटनांचे सहकार्य मिळत आहे.
ही बातमीही वाचा:
कोरोना रुग्णसेवेत प्राण गमावलेल्या डॉक्टरांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी