मुक्तपीठ टीम
दिल्ली उच्च न्यायालयाने मोबाइल मेसेजिंग अॅप टेलीग्रामला कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्व अॅप युर्जसची, चॅनेल आणि ऑपरेटरची नावे सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक, आयपी अॅड्रेससह माहिती सीलबंद कव्हरमध्ये देण्यास सांगितले आहे. त्यामुळे टेलीग्रामवरील गोपनीय सुविधेचा गैरवापर करत कंटेंट चोरी करणाऱ्यांवर कारवाई करणं पोलिसांना शक्य होणार आहे.
अधिकारांचा दावा फेटाळला!
टेलीग्रामने ही माहिती गोपनीयतेचा अधिकार आणि भाषण स्वातंत्र्याचा हवाला देत नाकारण्याचा प्रयत्न केला. पण उच्च न्यायालयानं त्यांना खडसावलं. कायदा मोडणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी अशा अधिकारांचा वापर करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
टेलीग्राम, कोचिंग क्लास आणि कॉपी राइट!
- विविध कोचिंग इंस्टिट्यूटनी टेलिग्रामवर आरोप केला होता की टेलीग्राम अॅप त्या शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक साहित्य प्रसारित करत आहेत, जे कॉपीराइटचे उल्लंघन आहे.
- त्याविरोधात तक्रार झाल्यानंतर टेलीग्रामने ते चॅनल्स बंद केले.
- पण त्यामुळे नुकसान होत असल्याने कॉपीराइट कंटेटची चोरी करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी कोंचिगवाले न्यायालयात गेले.
- कॉपीराईटचे उल्लंघन कोण करत आहे हे समोर आणल्याशिवाय पीडितांना दिलासा मिळणार नाही, असे न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
- भाषण स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार सध्याच्या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थितीत अप्रासंगिक आहेत.
- कायदेशीर उल्लंघन करणारे किंवा कोणताही नागरिक त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांचे परिणाम भोगू नये म्हणून त्यांचा अवलंब करू शकत नाही.
टेलीग्रामवरील चॅनल्स कोण चालवतं? ते सांगा…
- चॅनल चालवणाऱ्या ऑपरेटर्सची ओळख आवश्यक आहे, अन्यथा क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डेटा स्टोरेजच्या युगात देशांच्या सीमेपलीकडे असलेल्या शिक्षणतज्ज्ञांच्या नव्या उपक्रमाचे मोठे नुकसान होईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
गोपनीयतेच्या अधिकाराच्या आणि भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली कायदा मोडणाऱ्यांना वाचवता येत नाही.