मुक्तपीठ टीम
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिपाली चव्हाण यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ४ पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती कळतेय. त्यात तिने डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. तरीही त्यांच्याशी परिचय असणाऱ्या, त्यांचा धाडसी, उत्साही स्वभाव जाणणाऱ्यांना दिपाली चव्हाणांनी आत्महत्या केलीच कशी, असा प्रश्न पडला आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. २५ मार्च रोजी सायंकाळी साडे सात वाजता ही घटना उघडकीस आली. त्याच्या निवासस्थानातून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्या जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळल्या. या आत्महत्येने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे.
दिपाली चव्हाणांचं चटका लावणारं जाणं…
• दिपाली चव्हाण २०१५ मध्ये महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या.
• पाच वर्षांपासून त्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागात हरिसाल येथे कार्यरत होत्या.
• धाडसी अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिपाली दोन वर्षापूर्वी राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या.
• राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळीचे राहिवासी असून कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत.
डीएफओ शिवकुमारांविरोधात गंभीर आरोप
• दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरक्षक रेड्डी यांच्या नावाने चार पानांची सुसाईड नोट लिहिली आहे.
• यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी डीएफओ विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्या समोर अश्लील शिवीगाळ करतात, अशी तक्रार आहे.
• शिवकुमार त्यांना रात्री-बेरात्री भेटायला बोलावतात. त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचे लिहिले आहे.
• यापूर्वी शिवकुमार यांची रेड्डी यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचं उल्लेखही या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
• दिपाली चव्हाण यांना शिवकुमार यांनी ट्रेकला बोलावले होते. आपण गर्भवती असल्याने ट्रेक करु शकत नव्हती, तरी मुद्दामहून तीन दिवस मालूरच्या कच्च्या रस्त्याने फिरविले. यामुळे आपला गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप देखील या नोटमध्ये महिला अधिकाऱ्याकडून करण्यात आला. काम केल्यानंतरही अनेक बिल काढली नसल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला.
दरम्यान, धारणी पोलिसांकडून दिपाली यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. तसेच दिपाली यांच्या आत्महत्येचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विलास कुलकर्णी व त्यांच्या टीमकडून केला जात आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे.