मुक्तपीठ टीम
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलन शेतकऱ्यांना चिथवण्याचा आणि लाल किल्ल्यापर्यंत नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला १४ दिवसांनंतर अखेर पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.
२६ जानेवारीला देशाच्या राजधानीत झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचा आरोप असलेला अभिनेता दीप सिद्धूला अखेर जेरबंद करण्यात आलंय. शेतकरी आंदोलनाला बदनाम करणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारासाठी तोच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. दिल्ली पोलिसांनीही त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे त्याला प्रजासत्ताक दिनाचा खलनायक असेही संबोधले जात होते. अखेर त्याला १४ दिवसांनी अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांना सापडत नसतानाही दीप सिद्धू होता ऑनलाइन
अभिनेता दीप सिद्धूवर शेतकऱ्यांना नियोजित मार्गावरून दुसऱ्या मार्गावर नेण्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून करण्यात येत होते. पोलिसांनीही गुन्हा नोंदवला होता. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र, सोशल मीडियावर सातत्याने दीप सिद्धू सक्रीय असल्याचे पाहायला मिळत होते. “मी पुरवे शोधत आहे पुरावे मिळाल्यानंतर स्वत: पोलिसांना शरण येईन” असे त्यांनी शेअर केल्या व्हिडीओमध्ये म्हटले होता.
कोण आहे दीप सिद्धू?
• दीप सिद्धुवर खलिस्तान समर्थक असल्याचा आरोप झाला आहे.
• दीप सिद्धू सलग दोन महिने शेतकरी आंदोलनात सक्रिय होता.
• एनआयएने त्याला नोटीस दिल्याचीही चर्चा होती.
• काही दिवसांपूर्वी दीप सिद्धूला राष्ट्रीय तपास एजन्सीने शिख्स फॉर जस्टिस बरोबरच्या संबंधाबद्दलही नोटीस बजावली होती.
• गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनाच्या वेळी दीप सिद्धूने किसान युनियनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले.
• त्याने नवीन शेतकरी संघटना स्थापन केली होती. त्यांच्या मोर्चाला खलिस्तान समर्थक वाहिन्यांनीही पाठिंबा दर्शविला.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह फोटो व्हायरल
• २०१९च्या लोकसभा निवडणुकीत दीप भाजप उमेदवार अभिनेता सनी देओल यांच्यासाठी प्रचार केला होता.
• प्रजासत्ताक दिन हिंसाचारानंतर दीप सिद्धूची भाजपशी जवळीक असलेल्याचा आरोप करणाऱ्या पोस्ट मोठ्या संख्येने आल्या.
• तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि खासदार सनी देओल यांच्यासोबतची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
• कीर्ती किसान युनियनचे उपाध्यक्ष राजिंदरसिंग दीपसिंहवाला यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी आरोप केला आहे की, सुरुवातीपासूनच केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनाला जातीय रंग द्यायचा होता. दीप सिद्धूने त्यांची चांगली सेवा केली आहे.
प्रजासत्ताक दिनाचा ‘तो’ खलनायक भाजप नेत्यांच्या जवळचा! शेतकरी नेत्यांचा आरोप!
दीप सिद्धूसह इतर आरोपींवर होती बक्षिसं
• आंदोलनाला चिथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीप सिध्दूसह जुगराज सिंग,गुरजंट सिंहवर पोलिसांनी बक्षिस जाहीर केले आहेत.
• दीप सिद्धूची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी १ लाखाचे बक्षिस जाहीर केले.
• जजबीर सिंह, बूटा सिंह, सुखदेव सिंह आणि झकबाल सिंह यांच्या बद्दल माहिती दिल्यास ५० हजारांच्या बक्षिसाची घोषणा केली गेली.
प्रजासत्ताक दिनाचा घटनाक्रम
1. प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला होता.
2. नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडचे नियोजन केले होते.
3. ट्रॅक्टर परेडसाठी पोलिसांनी मार्ग ठरवून दिला होता.
4. मात्र, नियोजित वेळेआधी काहींनी अचानक भलत्याच रस्त्यांचा वापर करत ते लालकिल्ल्याकडे गेले
5. ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले
6. आंदोलक शेतकरी म्हणवणाऱ्या काहींनी लालकिल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावला होता.
7. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर अभिनेता दीप सिद्धू याचं नाव समोर आलं होतं.
8. दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता.
9. दीप सिद्धूला अटक करण्याची मागणीही सातत्यानं केली जात होती.
10. तरीही तो पोलिसांना सापडत नव्हता, पण सोशल मीडियावर दिसत होता.