गौरव सळी
प्रेरणा कुठूनही मिळू शकते. फक्त ती मिळाल्यानंतर त्यासाठी प्रामाणिकपणे परिश्रम घेतले पाहिजेत. जालन्यातील दीपज्योत हातमाग उद्योग सुरु करणाऱ्या दिनेश शांतीलाल लोंढे व नीरज शांतीलाल लोंढे या तरुणांनी ते दाखवून दिलं आहे.
नोकरी पेक्षा उद्योग व्यवसायाला प्राधान्य देत जालन्यातील युवकांनी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेउन हातमाग उद्योग सुरू केला आहे. सर्वोदय सार्वजनीक संस्थे अंतर्गत जालना शहरातील शिवनगर येथे दिपज्योत हातमाग या नावाने सुरू झालेला हा पहिलाच उदयोग. या उदयोगातून आता पर्यंत ५ ते ६ जणांना प्रशिक्षण दिले असून सध्या ३/४ रोजगार येथे काम करतात.
दिनेश शांतीलाल लोंढे व नीरज शांतीलाल लोंढे असं या युवकांच नाव असून दिनेशचे वडील शांतीलाल यांनी औरंगाबादमध्ये एका हातमाग प्रदर्शनाला भेट दिली होती.या ठिकाणी महाकवी पंडित भुरामल शास्त्री सामाजीक सहकारी हातमाग प्रशिक्षण केंद्र कुंथलगीरी यांची माहिती त्यांना मिळाली. शांतीलाल यांनी मुलांशी चर्चा करून दोन्ही मुलांना प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. मुलांनी इंटरनेटवरून या व्यवसायाच्या भविष्यातील संधी जाणून घेतल्या व कुंथलगीरी येथील हातमाग प्रशिक्षण केंद्रात ६ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यावेळीच प्रशिक्षणासोबत हातमाग प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री पुरवण्यात येईल असे सांगीतले होते.त्यामुळे प्रशिक्षण केंद्राने त्यांना संबंधित साधनसामुग्री दिल्याने घराच्या छतावर शेड उभारून लोंढे यांनी हातमाग प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पच्या माध्यमातून सुरुवातीला टॉवेल, साडी, रुमाल,या वस्तूचे उत्पादन सुरू झाले.बघता बघता या प्रकल्पाने बाळसे धरले आणी आता शाल, चादर,शर्ट पीस, धोती दुपट्टा ते मोदी जॅकेटपर्यत मजल मारली आहे. सुरुवातीला त्यांनी कच्चा माल हा कुंथलगीरी केंद्राकडून विकत घेतला व तयार केलेल्या कपड्यांची विक्री त्यांनाच केली.मिळालेल्या मोबदल्यातून त्यांचे भांडवल वाढत गेले आणी महत्त्वाचे म्हणजे माल विकण्याची चिंता मिटली.
आता या उद्योगाने आपली पावले पसरली असून ३/४ रोजगार व घरातील ३ असे मिळून हा प्रकल्प चालू आहे. रोजंदारीने काम करणाऱ्यांना ५०/- प्रती मीटर प्रमाणे मोबदला दिला जातो व एक रोजंदार दिवसाकाठी १० मीटर कापड तयार करतो त्याचा त्याला ४५०/५०० रुपये एवढा मोबदला मिळतोच मिळतो.
सध्या या प्रकल्पाला जालन्यातील लोक भेट देतात व आवडीने हातमागावर बनवलेल्या उत्पादनाची खरेदी करत आहे.जालन्यातील प्रसिध्द जैन मंदिरात येणारे मुनी तसेच भाविक येथूनच कपडे खरेदी करतात त्यामुळे त्यांच्या उत्पादनाची खप वाढली आहे.
लोंढे यांनी घेतलेल्या योग्य निर्णयाने त्यांची २ मुले,घरातील सदस्य व काही रोजगारांना रोजगार मिळाला आहे. याठिकाणी आलेल्या ग्राहकांनी हातमागावरील वस्तूंना पसंती दिली असून नेहेमी इथूनच टॉवेल, बेडसीट,शर्ट पीस खरेदी करत असल्याचे सांगितले.