मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरील कळसूबाई नवरात्रौत्सवाला वारली चित्रकलेचा साज मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी महाराष्ट्रातील उंच शिखरावरील कुलस्वामिनीच्या उत्सवाला वारली चित्रकलने अधिकच रंगत आणली आहे.
कळसूबाई शिखर. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. राज्यातील एव्हरेस्ट म्हणूनही ते ओळखलं जातं. या शिखरावरच वसलीय आई कळसूबाई. आदिवासी समाजाची कुलदेवता असलेल्या कळसूबाईच्या शिखरावर दरवर्षी लाखो भक्त पर्यटक भेट देतात. या कळसूबाई शिखरावर नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या उत्सवातही भाविकांची शिखरावर रिघ लागते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व १ हजार ६४६ मीटर उंच असलेल्या ह्या शिखराला सर करण्याचे सर्व ट्रेकर्स पर्यटकांचे स्वप्न असते. त्यामुळे या शिखराला राज्यातूनच नाही तर देशातूनही खूप लोक भेट देतात.
आदिवासींच्या कुलदेवता असणाऱ्या कळसूबाईच्या उत्सवाला आदिवासींच्या वारली चित्रकलेचा साज चढवण्याचा संकल्प पालघरमधील काही चित्रकारांनी केला. सफाळे केळवा रोड मैत्री ग्रूप मंडळीचे संदीप आंबात, श्विकास नडगे, महेंद्र लहांगे, प्रकाश कोम, नागेश पागी यांच्यासह चित्रकार किरण गिराणे, नयन धाडगा, प्रमोद धाडगा, सुनील सुरुम, नरेश पठारी यांनी घटस्थापनेच्याआधी कळसूबाई शिखर गाठले. तेथे मंदिरात वारली चित्रशैलीतील चित्रं काढून मंदिर सुशोभित केले.
या कामात शिखराच्या पायथ्याशी असलेल्या जहागीरदारवाडी गावातील सरपंच हिरामण खाडे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ खाडे हेही सहभागी झाले. तेही या कलाकारांसोबत दोन दिवस सोबत शिखरावर होते. एकप्रकारे या साऱ्यांच्या प्रयत्नांतून वारली चित्रकला महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर पोहचली.