प्रणव ढमाले
राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती जास्तच गंभीर आहे. मृतांचा आकडाही नेहमीपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत आरोग्यव्यस्थेवर ताण येत आहे. पुणे मनपाच्या यंत्रणेवरील कामाच्या ओझ्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना त्रास होऊ लागला होता. ही समस्या ओळखून गेली अनेक दशके पुण्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, सेवा सहयोग आणि ‘स्व’-रूपवर्धिनी या संस्था मृत नातेवाईंकांना मयत पास देणे व अंत्यसंस्काराच्या कामात मोठी मदत करीत आहे.
पुण्यात कोरोना रुग्ण अंत्यविधी कामातील पहिला टप्पा ससून रुग्णालयातून सुरू होतो. शेवटचा टप्पा वैकुंठ स्मशानभूमीत पूर्ण होतो. यासाठी दोन्ही ठिकाणी सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, सेवा सहयोग आणि ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थांचे दत्तात्रय खडके, हर्षद सोनवणे, विवेक शेलार, परशुराम हाके, रविराज शेलार, ओमकार खडके, विकास पोळ तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. त्यांनी पाच दिवसात साधारणत: ९५० मयत पास काढून दिले आहेत. तर वैकुंठ स्मशानभूमीत स्वयंसेवकांनी २५६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
या संस्थांमुळे पुणे शहरातील ससून रुग्णालयातील ‘मयत पास’ तब्बल २८ वर्षांनंतर ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांचा शारिरीक व मानसिक त्रास कमी झाला आहे. अंत्यसंस्काराची प्रक्रिया अधिक सुरळीत सुरू रहावी, नातेवाईक व मित्रपरिवार यांना वेळेत सर्व विधी पूर्ण करता यावे यासाठी २४ तास प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सुराज्य सर्वांगीणचे विजय शिवले यांनी दिली. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर स्मशानात अनेक तास वाट पाहावी लागणे, काही मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीच नसल्याने अडचण होणे या समस्या दूर झाल्या आहेत, असे ‘स्व’रुपवर्धिनीचे निलेश धायरकर यांनी सांगितले. थोडक्यात कोरोना मृतांनाही आता सन्मानानं अखेरचा निरोप दिला जात आहे. पुण्यात पुण्याचं काम घडतंय ते असं.
गेल्या काही दिवसात पुण्यात कोरोनाचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यासोबतच कोरोना मृत्यूंचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. ससून हॉस्पिटलमध्ये आणि वैकुंठ स्मशानभूमीत काम करणाऱ्या महापालिका कर्मचारी यासाठी रात्रंदिवस झटत आहे. परंतु कामाचा व्याप मोठा आहे. यासाठी याकामात युवकांची गरज होती. त्यासाठी सुराज्य सर्वांगीण विकास, ‘स्व’-रूपवर्धिनी आणि सेवा सहयोग या संस्थांच्या माध्यमातून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मदतीला स्वयंसेवकांचा संघ उपलब्ध करून दिला आहे. हे स्वयंसेवक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आधारकार्डसह माहिती देणाऱ्यांचे आधारकार्ड, शवागृहातील डॉक्टरांचे घोषणापत्र, नमुना क्रमांक दोन (सांख्यिकी) हे चार कागदपत्रे घेऊन पाच प्रतिमध्ये ‘मयत पास’ अवघ्या काही मिनिटात ऑनलाइन देतात. या मयत पासमुळे नातेवाईकांना पार्थिवाचे दहन करणे व मृत्यू दाखला मिळविणे यासाठी उपयोगी पडतो.
ऑनलाइनमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी
ऑनलाइनमुळे मयत पासमुळे सामाजिक अंतर राखता येते. यासह कागदपत्रांची हाताळणी करण्याची आवश्यकता नाही. व्हॉटसॲप वेबमुळे झेरॉक्स घेण्यासाठी फिरण्याची गरज नाही. मोबाईलवर गावकडील कागदपत्रे सुद्धा सहज मागविता येतात. या सुविधेमुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांचा त्रास कमी होऊन कोरोनाचा संसर्गाची शक्यता कमी असल्याचेही सुराज्य सर्वांगीण संस्थेचे विजय शिवले यांनी सांगितले.
ससून मयत पास केंद्र व वैकुंठ स्मशानभूमीत प्रत्यक्ष काम करण्यासाठी, भेटीसाठी व अन्य साहाय्य व मदतीसाठी नक्की संपर्क करावा.
निलेश धायरकर – 9029074521
नितीन भांगरे – 9579587510
मल्लेश मोरे – 9545235757
पाहा व्हिडीओ: