मुक्तपीठ टीम
कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी उपयोगी कॉल्किसीन या औषधाची सुरक्षितता आणि प्रभावीपणा तपासून पाहण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि लक्साई लाईफ सायन्सेस यांना भागीदारीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील दोन प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्याची परवानगी डीसीजीआयने दिली आहे.
या महत्त्वाच्या चाचण्यांमध्ये सीएसआयआरच्या हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) आणि जम्मू येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंटेग्रेटीव्ह मेडीसीन (आयआयआयएम) या संस्थाची लक्साई लाईफ सायन्सेस सोबत भागीदारी आहे.
गाऊट आणि संबंधित दाहकारक स्थितींवरील उपचारांसाठी या औषधाचा वापर होत असून, कोरोना वरील रुग्णांवरील उपचारांच्या चाचण्यांसाठी परवानगी मिळाल्याबद्दल सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. हृदयरोगाशी संबंधित सहव्याधी असलेल्या रुग्णांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि दाहकारक सायटोकिन्सचे प्रमाण कमी करण्यासाठी याचा वापर करणे शक्य होत असल्याने रुग्णांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा करण्यासाठी नियमित उपचारांसोबत कॉल्किसीनची जोड दिल्यास ते परिणामकारक ठरू शकते, अशी माहिती सीएसआयआरच्या महासंचालकांचे सल्लागार डॉ. राम विश्वकर्मा यांनी दिली. कोरोनाच्या संसर्गानंतर हृदयविकाराशी संबंधित समस्या वाढत असल्याने आणि कोरोना संसर्गापश्चातही निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे अनेकांना जीव गमवावे लागत असल्याची आणि त्याचबरोबर या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून नव्या किंवा एका व्याधीवरील औषधांचा इतर व्याधींवर नव्याने वापर करण्याबाबत विचार करण्याची सूचना अनेक जागतिक संशोधनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
कॉल्किसीनच्या वापराच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा प्रभावीपणा सिद्ध होण्याकडे आपण उत्सुकतेने पाहत असल्याचे सीएसआयर-आयआयसीटी, हैदराबाद चे संचालक डॉ. एस चंद्रशेखर आणि सीएसआयआर- आयआयआयएम, जम्मूचे संचालक डॉ. डी एस रेड्डी यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल असलेल्या अनेक रुग्णांचे जीव वाचवण्यात हे औषध मोलाची भूमिका बजावू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतामध्ये या महत्त्वाच्या औषधाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने ही चाचणी यशस्वी झाल्यास हे औषध रुग्णांना अतिशय कमी दरात उपलब्ध होऊ शकेल.
या चाचण्यांसाठी देशभरात विविध ठिकाणी अनेक रुग्णांची नोंदणी प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे आणि पुढील 8 ते 10 आठवड्यात या चाचण्या पूर्ण होतील, अशी माहिती लक्साईचे सीईओ डॉ. राम उपाध्याय यांनी दिली. या चाचण्यांचे निष्कर्ष आणि नियामक मंजुरीच्या आधारावर हे औषध खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करता येईल, असे त्यांनी सांगितले.
या औषधाबाबत अलीकडेच झालेल्या वैद्यकीय अध्ययनाबाबतची माहिती अग्रणी वैद्यकीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार हे औषध पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या हृदयविकारविषयक समस्या, हृदयविकारानंतर निर्माण होणाऱ्या समस्या आणि हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतर निर्माण होणारी पेरी प्रोसिड्युरल ऍट्रियल फायब्रिलेशन आणि एट्रियल फायब्रिलेशन अबलेशन या समस्या कमी करत असल्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत.