मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरु येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत आज नव्या सरकार्यवाहांची घोषणा करण्यात आली आहे. दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानुसार त्यांची निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालकानंतर सरकार्यवाह हे दुसरे सर्वात महत्त्वाचे पद आहे. दत्तात्रय होसबळे हे केवळ २०२४ची निवडणूक होईपर्यंतच नाही तर, २०२५ मध्ये संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाच्या वेळीही संघाच्या संघटनात्मक रचनेवर नियंत्रण ठेवतील.
२००९ ते आतापर्यंत सुरेश भैयाजी जोशी हे सरकार्यवाह म्हणजेच महासचिव म्हणून जबाबदारी सांभाळत होते. तीन वर्षांपूर्वी ते पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात होते, परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुका पाहता त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला. नेहमी नागपुरमध्ये होणारी अखिल भारतीय प्रतिनिधींची बैठक प्रथमच बाहेर बंगळुरुमध्ये पार पडत आहे. या बैठकीत साधारणत: १,५००
प्रतिनिधी उपस्थित असतात, परंतु या वेळी कोरोना संसर्गाचा विचार करता केवळ ४५० प्रतिनिधी बंगळुरूमध्ये सहभागी झाले आहेत.
बालपणापासून आजवर…संघासाठीच कायम दक्ष!
• दत्तात्रय होसबळे यांची मातृभाषा कन्नड आहे, परंतु त्यांना हिंदी, इंग्रजी, संस्कृत, तामिळ आणि मराठी याव्यतिरिक्त अनेक परदेशी भाषा देखील माहित आहेत.
• कन्नड भाषेतील मासिक ‘असीमा’ चे ते संस्थापक आणि संपादकही आहेत.
• १९६८मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी ते स्वयंसेवक झाले.
• १९७२ मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले.
• ते १५ वर्षे अभाविपचे सरचिटणीस म्हणून होते.
• १९७५-७७च्या जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आणीबाणीविरोधी आंदोलनातही होसबळे सहभागी होते.
• त्यांना मिसा या कायद्याखाली २१ महिन्यांसाठी तुरूंगात टाकले गेले.
• तुरुंगात त्यांनी दोन हस्तलिखित पत्रिकांचे संपादित केले.
• १९७८ मध्ये ते विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले.
• दत्तात्रय होसबळे यांनी अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड आणि नेपाळचा दौरा केला आहे.
• २००४ मध्ये, त्यांना संघाचे अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख केले गेले.