मुक्तपीठ टीम
सध्या बँकव्यवहारापेक्षा आता मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर करण्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. पण आता मोबाईलवरून व्यवहार करणे धोक्याचे ठरु शकते. यासंदर्भात सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर रजहरिया आणि फ्रेंच सायबर सुरक्षा तज्ज्ञ इलियट अँडरसन यांनी असा दावा केला आहे की, भारतातील तब्बल दहा कोटी लोकांचा वैयक्तिक डेटा हॅकर्स डार्क वेबवर विक्रीसाठी टाकला असून हा डेटा एक पेमेंट अॅप वापरणाऱ्या युजर्सचा आहे. दरम्यान, याआधीही पेमेंट अॅपना सावधगिरी बाळगण्याचे लक्षात आणून दिले होते पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, २६ मार्चपासून हॅकर्स लीक झालेला डेटा ऑनलाइन विकत आहेत. हॅकर्स ग्रुपच्या एका पोस्टवरून, हा ‘डेटा १.५ बिटकॉइन (सुमारे ६३ लाख रुपये) मध्ये विकला जात आहे. तसेच डार्क वेबवर शेअर केलेल्या या डेटाचा आकार सुमारे ३५० जीबी एवढा आहे. तसेच असे म्हटले जात आहे की, हा डेटा ‘मोबिक्विक’ या प्लॅटफॉर्मवरून लीक झाला आहे. देशात ‘मोबिक्विक’चे १२ कोटीहून अधिक युजर्स असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
मोबिक्विक या प्लॅटफॉर्मने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले असून त्यांनी म्हटले की, काही युजर्सनी आपला डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचे सांगितले आहे. पण युजर्स आपला डेटा बऱ्याच प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात त्यामुळे हा डेटा लीक आमच्याकडूनच झाला असे म्हणणे चूकीचे आहे. तसेच या अॅपमधील व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आणि ओटोपीवर आधारित आहे.
लीक झालेल्या डेटा?
- या लीक झालेल्या डेटामध्ये ९.९ कोटी मेल, फोन पासवर्ड, आयपी अॅड्रेस आणि जीपीएस लोकेशनचा समावेश आहे.
- तसेच पासपोर्ट डिटेल्स, पॅनकार्ड, क्रेडिटकार्ड नंबर, डेबिटकार्ड नंबर आणि आधारकार्ड नंबरचा समावेश आहे.