मुक्तपीठ टीम
माणसाची भौतिक प्रगती होत असतानाच विकृतीही वेगानं फोफवत आहेत. चाइल्ड पोर्नोग्राफी ही अशाच घृणास्पद अमानुष विकृतींपैकी एक मानली जाते. देशात इंटरनेटचा प्रसार वाढतानाच चाइल्ड पोर्नोग्राफीचं डार्कवर्ल्डही फोफावत आहे. त्याची गंभीर दखल घेत सीबीआयने देशातील १४ राज्यांमधील ७६ ठिकाणी धाडी घातल्यात. त्यात महाराष्ट्रातील काही ठिकाणांचाही समावेश आहे. ओडिशाच धाड घालण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या टीमवर हल्ल्याचीही घटना घडली आहे.
कोरोना महामारीत जगभरात होणाऱ्या गुन्ह्यांना मोठे उधाण आले आणि गुन्हे वाढू लागले. यात लहान मुलांवरील अत्याचाराचे गुन्हेही मोठ्याप्रमाणात वाढताना दिसत आहेत.
चाइल्ड पोर्नोग्राफीच्या डार्कवर्ल्डवर धाडी
- केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने १४ राज्यांमध्ये धाडी घातल्या.
- सीबीआयला माहिती मिळालेल्या ८३ लोकांच्या ७६ ठिकाणांवर शोध सुरू केला.
- या ठिकाणांहून इंटरनेटवर चाइल्ड पोर्नोग्राफीचा प्रसार केला जात होता.
- सीबीआयने १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी आणि छळात सहभागी असलेल्या ८३ लोकांविरुद्ध २३ वेगवेगळे गुन्हे नोंदवले आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये शोध घेण्यात येत असल्याचे सीबीआयचे प्रवक्ते आरसी जोशी यांनी सांगितले. ही छापेमारी कारवाई समन्वित पद्धतीने केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सीबीआयने ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणांमध्ये मोठी कारवाई केली. यामध्ये १४ राज्यांमधील ७६ ठिकाणी छापे टाकण्यात आले. सीबीआयच्या टीमने ओडिशातील भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी छापे टाकले आहेत. तेथे एका ठिकाणी सीबीआयच्या टीमवर हल्लाही झाला आहे.