मुक्तपीठ टीम
कोरोनाविरूद्धच्या भारताच्या लढ्यात आणखी एक उल्लेखनीय पाऊल उचललं गेलं आहे. कोरोना नमुन्यांच्या जलद निदान चाचणीसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अंतर्गत असलेल्या नागपूर स्थित राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ पद्धती विकसित केली आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांद्वारे घेतलेल्या नमुन्यांची कोवीड चाचणी करणारे स्वदेशी ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ तंत्र केंद्र सरकारला हस्तांतरित केले आहे. सलाईन गार्गल आरटी-पीसीआर तंत्रज्ञान सोपे, जलद, किफायतशीर, रुग्णस्नेही आणि आरामदायी आहे; हे तंत्रज्ञान चाचणीचा अहवाल झटपट उपलब्ध करून देते आणि पायाभूत सुविधांची किमान आवश्यकता असलेले हे चाचणी तंत्र ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी सोयीस्कर आहे.
सीएसआयआर-नीरीने सांगितले की, संस्थेने विकसित केलेल्या नवतंत्रज्ञानाचे,समाजाच्या सेवेसाठी ‘राष्ट्रार्पण’ करण्यात आले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई ) कडे विना- विशेष आधारावर हे तंत्र हस्तांतरित करण्यात आले आहे. यामुळे खाजगी, सरकारी आणि विविध ग्रामीण विकास योजना आणि विभागांसह सर्व सक्षम उत्पादकांना या नवीन तंत्रज्ञानाचे व्यावसायिकरण करणे आणि परवाना मिळणे शक्य होईल.
परवानाधारकांनी व्यावसायिक उत्पादनासाठी सहजपणे वापरता येण्याजोग्या सुटसुटीत संचाच्या स्वरूपातील उत्पादनासाठी त्याअनुरूप उत्पादन सुविधा उभारणे अपेक्षित आहे. महामारीची सध्याची परिस्थिती आणि कोविड -19च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, सीएसआयआर-नीरीने देशभरात व्यापक प्रसाराच्या दृष्टीने संभाव्य परवानाधारकांना हस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने केली. ११ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया आणि ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ तंत्राच्या माहितीचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.
या प्रसंगी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, ”सलाईन गार्गल आरटी-पीसीआर पद्धत देशभरात विशेषतः किमान संसाधने असलेल्या ,ग्रामीण आणि आदिवासी भागांसारख्या क्षेत्रात राबवण्याची आवश्यकता आहे. यामुळे जलद आणि अधिक नागरिक-स्नेही चाचणी होईल आणि महामारीविरोधातला आपला लढा बळकट होईल.सीएसआयआर-नीरीद्वारे विकसित केलेल्या ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी , सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाने सीएसआयआर-नीरीशी संपर्क साधला होता.
नीरीचे शास्त्रज्ञ डॉ.कृष्णा खैरनार आणि नागपूरच्या सीएसआयआर-नीरी येथील पर्यावरणीय विषाणूशास्त्रातील संशोधन अभ्यासकांचा समूह ‘सलाइन गार्गल आरटी-पीसीआर’ तंत्रज्ञानाचे प्रमुख संशोधक आहेत.
सीएसआयआर-नीरीचे वैज्ञानिक आणि पर्यावरणीय विषाणूशास्त्र विभागाचे प्रमुख (सलाईन गार्गल आरटी-पीसीआरचे संशोधक ), डॉ कृष्णा खैरनार; सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. श्रीवरी चंद्रशेखर; सीएसआयआर-नीरीचे तंत्रज्ञान हस्तांतरण,अध्यक्ष डॉ.अतुल वैद्य; एमएसएमई विभागाचे संचालक श्री राजेश डागा आणि श्री कमलेश डागा हे एमएसएमई विभागाला तंत्र हस्तांतरित करताना उपस्थित होते.