गुन्हे महत्वाचे : 1)लाकडी बॅटने केलेल्या मारहाणीत एका श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना गोवंडी परिसरातून समोर आली आहे. याबाबत प्राणीमित्राच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी श्वानाची हत्या करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2)’कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलवायचे झाल्यास आगाऊ तीन दिवसांची (सुट्यांचे दिवस वगळून) स्पष्ट नोटीस द्यावी. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करायची झाल्यास आगाऊ ७२ तासांची स्पष्ट नोटीस द्यावी, जेणेकरून त्यांना योग्य न्यायालयासमोर दाद मागता येईल’, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे गोस्वामींना दिलासा मिळाला आहे. 3)’लिव्ह इन रिलेशन’मध्ये गेल्या अठरा वर्षांपासून राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्रासोबत संगनमत करून बाबासाहेब पिराजी सातदिवे (४९, रा. बजाजनगर) याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी महिला व तिच्या साथीदाराविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4)रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणं किती जीवघेणं ठरु शकतं, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलंय. दरवाजात लटकून प्रवास करताना रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून शिर धडावेगळं झाल्याची घटना मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ लोकलमध्ये रात्री एक वाजता धड नसलेलं शिर लगेजच्या डब्यात सापडल्याने ही घटना उघडकीस आली. 5)कल्याणमध्ये शिवसेना माजी नगरसेवकाचा वाढदिवस गाजावाजा करत साजरा करण्यात आला. शेकडो समर्थक जमले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याच दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे