गुन्हे महत्वाचे : 1) एकाच कुटुंबाती तीन महिलांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांची रोख रक्कम परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळती करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्यावर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 2)बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईच्या उपनगरी भागातील ग्राहकांना ड्रग्ज पुरवणाऱ्या विद्यार्थ्याला एनसीबीने अटक केली. विद्यार्थ्याला बेड्या ठोकण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घाबरवण्यासाठी बिलंदर आरोपीने त्यांच्यावर कुत्रे सोडले. 3)नांदेडमधील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात अवघ्या न्यायालयाने 64 दिवसांत शिक्षा सुनावली आहे. अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेला पळवून नेऊन अत्याचार करत खून केल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. 4) एका महिलेची रात्रीच्या सूमारास धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. दोन दिवसात या हत्येचा उलगडा करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश आलं आहे. एका तरुणाचे या महिलेच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र या महिलेने या प्रेम सबंधास विरोध केल्याने या तरुणाने या महिलेची गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या कटात अल्पवयीन मुलगी देखील सहभागी होती. दिलजीत यादव असं या आरोपी तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर जन्मदात्या आईच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 15 वर्षीय मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 5)पनवेल तालुक्यातील आकुर्ली भागात राहाणाऱ्या सागर चौधरी (२८) या विवाहित तरुणाने प्रेयसीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सागरने आत्महत्येपूर्वी प्रेयसीला व्हॉटसअॅपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज केल्याचे तपासात आढळले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी सुष्मिता यादव या तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.