क्रीडा थोडक्यात: 1) भारत आणि इंग्लंड यांच्यामधील ट्वेन्टी-२० मालिका सुरु असताना आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ट्वेन्टी-२० मालिकातील पाचपैकी दोन सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडले आहेत. पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. पण उर्वरीत तीन सामन्यांसाठी गुजरात क्रिकेट संघटनेने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. संघटनेच्या या निर्णयामुळे चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. 2) भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसाठी १६ मार्च ही तारीख खूप खास आहे. १२ मार्च २०११ रोजी विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले ९९वे शतक केले होते. त्यानंतर अनेक सामने खेळल्यानंतरही सचिनला शतक करता आले नव्हते. शेवटी, बांगलादेशच्या मुशरफी मुर्तझाच्या चेंडूवर फटका खेळत सचिनची मोठ्या विक्रमाची प्रतीक्षा संपली. या सामन्यात सचिनने ११४ धावांची धमाकेदार खेळी केली होती. सचिनचा शतकांच्या शतकाचा विक्रम आजही अबाधित असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू म्हणून सचिनची ख्याती आहे. 3) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या १५ वा सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजण्डस संघाने बांगलादेश लीजण्डस संघावर १० गडी राखून मात मिळवली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या मालिकेच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ पहिल्या स्थानावर असून इंडिया लीजण्डसचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशवरील विजयामुळे आफ्रिकेने तिसरे स्थान मिळवले आहे. तर, इंग्लंड आणि वेस्ट इंडिंज यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर चौथ्या स्थानी कोण येणार, हे स्पष्ट होईल. 4) फेडरेसन चषक राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अन्नू राणी हिने नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. राणीने ६३.२४ मीटर अशी कामगिरी करत स्वत:चाच ६२.४३ मीटरचा विक्रम मोडीत काढला. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष ६४ मीटर इतका आहे. त्यामुळे ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही. 5) भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल २०१९मध्ये या लीगची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. परंतु काही कारणांनी खो-खो लीग पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता पुन्हा या स्पर्धेच्या आयोजनाकरिता महासंघाने पावले उचलली आहेत. देश-विदेशातील पुरुष खो-खोपटू आणि १८ वर्षांखालील मुलांच्या समावेशासह खेळवल्या जाणाऱ्या अल्टिमेट लीगच्या लढतींचे हिंदी, इंग्रजी भाषेतील समालोचनासह थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने खो-खो प्रेमींसाठी चांगली पर्वणी असणार आहे.