गुन्हे महत्त्वाचे : 1) मुंबईच्या किनारपट्ट्यांवरील तस्करीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. मुंबईत छुप्या मार्गाने येणारे अमली पदार्थ असोत वा करचोरी करुन येणाऱ्या वस्तू, त्या प्रामुख्याने न्हावा-शेवा किंवा अन्य बंदरातून आणल्या जात आहेत. यामुळे महसुल गुप्तचर संचालनालयाने किनारपट्ट्यांवर मोठी मोर्चेबांधणी केली आहे. 2) मुंबईमध्ये दोन दिवसांत तब्बल ८३ कोटी रुपयांची जीएसटी करचोरी उघड झाली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळांच्या टीमनेकेंद्रीय जीएसटीअंतर्गत टाकलेल्या छाप्यात ही करचोरी समोर आली आहे. केंद्रीय जीएसटी विभागाने मुकेश अहुजा नावाच्या व्यापाऱ्याला या प्रकरणात अटक केली. 3) ३ लाखांमध्ये १ हजार ४४० अमेरिकन डॉलर देतो असे सांगून भामट्यांने डॉलरऐवजी वृत्तपत्राचे कागद देऊन भाईंदरमधील एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून भामट्यांचा शोध सुरू आहे. 4)भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने कोपरी गावातील एका वृद्धेच्या हाताला व नाकातोंडाला चाकूच्या धाक दाखवून चिकटपट्टी लावून तिच्या अंगावरील सुमारे ४ लाखांचे दागिने लुटून फरार झालेल्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पकडण्यात यश मिळाले आहे.